कामाचे महत्त्व
कामाचे महत्त्व
आज-काल मुलांना एखादे काम सांगितले की मुले लगेच तोंड वाकडेतिकडे करतात आणि टाळाटाळ करून नजरेआड होतात. काम म्हटले की त्यांना खूप कंटाळवाणे वाटते. अर्चु चे ही असेच आहे. आईने एखादे काम सांगितले की पुस्तक घेऊन बसायची.
"माझा दहावीचा वर्ष आहे, मग यावर्षी काम नाही." अश्या ठेक्यात अर्चु अभ्यासाला बसायची. आईने जरा दुर्लक्ष केले की लगेच टीव्ही, मोबाइल याकडे वळायची. असे रोजच होत होते. आईने खूप वेळा कान बजावून सांगितले तरी तिच्यात काहीच फरक दिसत नव्हता. आता मात्र आईला चिंता वाटू लागली, कारण असेच जर कामचुकारपणा वाढत गेला, तर मग भविष्यात तिचे कसे होईल ? ही काळजी आईला सतत वाटत होती. निदान स्वतःचे तरी छोटीमोठी कामे वेळेत केली पाहिजे.
एक दिवस आईने तिची खोली स्वच्छ करायला तिला सांगितले. अर्चु ने देखील हो करते म्हणाली आणि तीही विसरून गेली. खोलीत सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेले होते. ओले कपडे गादीवर तसेच ठेवलेले होते. जिथे ती अभ्यासाला बसलेली असायची तिथे तिचे सर्व वस्तू, पुस्तके, पेन, वह्या पडलेले असायचे. खेळणी देखील सर्वत्र विखुरलेली असायची. सकाळी चहा- नाश्ता केलेले कप, प्लेट्स, ग्लास आहे त्याच जागी होते. तिने काहीच आवरले नाही. स्वतःची खोली देखील झाडून घेतली नव्हती. तिच्या अंगात आळसपणा घुसलेला होता. परत खोली आवरेन असा विचार करत ती मोबाईलवर गेम्स खेळण्यात गुंग झाली होती.
एवढ्यात तिच्या शाळेतल्या मैत्रिणी तिच्याकडे अभ्यासासाठी आलेल्या होत्या.
"काकू, अर्चु घरात आहे का ?" त्यातील एका मैत्रिणीने आईला विचारले.
" हो ! आहे तिच्या खोलीत. अभ्यास करत बसली असेल."आईने सांगितले. सर्व मैत्रिणींचा घोळका अर्चुच्या खोलीकडे निघाला. खोलीत येताच सर्व पसारा पाहून तिच्या मैत्रिणीने तोंड वाकडे तिकडे केले आणि एकमेकींच्या कानात कुजबुज करायला सुरुवात केली. अर्चु ने जेव्हा हे पाहिले तिला खूप लाजल्यासारखे झाले. ती भरभर एकेक वस्तू उचलण्याचा प्रयत्न करत सैरावैरा पळत होती. परंतु तिचा कामचुकारपणा तिच्या मैत्रिणी पुढे आला. तिला स्वतःलाच अपराध्यासारखे वाटत होते. त्या दिवशी तिच्या मैत्रिणी तिच्याशी नीट बोलल्या नाही व तात्काळ निघून गेल्या. या गोष्टीने ती खूप दुःखी झाली.
खिडकीजवळ अर्चु एकटीच विचार करत बसली होती. आज जे झाले होते, त्यातून तिने एक धडा शिकला होता. आपली कामे आपणच वेळेवर करावी. दुसऱ्या दिवशी आईने हाक मारताच ती झोपेतून उठली. सकाळची सर्व कामे आटोपून लगेच अभ्यासाला बसली. आज सगळेजण अर्चू कडे कुतूहलाने बघत होते. स्वतःची खोली आवरून तिने आजी-आजोबांची खोली देखील आवरली. आईकडे स्वयंपाक घरात थोडी मदत करायला गेली. हे सगळे बघून आई तर चकित झाली , पण घरातले ही चकित झाले. तिच्यातला हा बदल घरच्यांना आणि आईला खूपच सुखावत होता.
शेवटी आईने आखलेली योजना यशस्वी झाली. अर्चू ला कामाचे महत्त्व समजले व तिच्यात सकारात्मक बदल झाला. ती आता तिचे काम वेळेवर करू लागली. अभ्यासाला देखील तिने वेळ द्यायला सुरुवात केली. मोबाईल टीव्ही पाहण्याचे टाळून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले. आता तिच्या सर्व वस्तू जागेवर दिसत होत्या. तिच्या सर्व मैत्रिणी देखील तिच्याशी मिळून-मिसळून वागत होत्या. शेवटी आईने आपले कर्तव्य चांगल्या रीतीने पार पाडले. संस्काराची शिदोरी अनुभवाच्या आणि प्रयोगाच्या चटक्यांनी दिले. कोणाचेही मन न दुखावता आईने अर्चुच्या मनात कामाचे महत्त्व बिंबवले.
