जिगरबाज
जिगरबाज




भर दुपारची वेळ होती. रेल्वे स्टेशनवर तुरळक गर्दी होती. तसं पाहिलं तर सहसा रेल्वे स्टेशन असं शांत नसतं पण कोरोनाच्या धास्तीमुळे असेल, गर्दी कमीच होती.
एक बाई आपल्या एका चिमुरड्याला कडेवर घेवून व चार पाच वर्षाच्या दुसऱ्या मुलाचा हात पकडून हळूहळू प्लॅटफॉर्मवरून जात होती. अचानक काय झाले काही कळले नाही, हात पकडलेल्या मुलाचा पाय घसरला व तो खाली रुळावर मधोमध पडला आणि समोरून जलद ट्रेन भरधाव येत होती. आता काय होईल बापरे! तेवढ्यात एक माणूस, हातात हिरवा झेंडा होता त्याच्या, सुसाट धावत आला. एका देवदूतासारखे त्या मुलाला उचलून
प्लॅटफॉर्मवर ठेवले व तेवढ्याच गतीने स्वतःही वरती चढला. तेवढ्यात धडधड करत ट्रेन रुळावरून गेली. काही सेंकदांची दिरंगाई झाली असती तर काय झाले असते विचार सुध्दा नको रे बाबा!
नंतर कळले त्या मुलांची आई आंधळी होती. आणि तो जिगरबाज रेल्वे कर्मचारी, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, त्तक्षणी जिवाच्या आकांताने त्या मुलाला वाचवण्यास धावला ही अत्यंत धाडसी कर्तबगारी दाखवली. अशा प्रकारची माणसे कुठला ही मागचा पुढचा विचार न करता धाडसी कृत्य करतात ती खरोखर देवदूतच असतात. त्या तरुणाने मुलाला वाचवले ही गोष्ट सगळीकडे प्रसिद्ध झाली. त्या तरुणाच्या धाडसी कृत्याबद्दल त्याला पन्नास हजार रूपयांचे बक्षीस दिले गेले.
तो तरुण धडाकेबाज होताच, त्याच बरोबर अतिशय दयाळू वृत्तीचा ही होता हे कळून चुकले. त्याला मिळालेल्या पन्नास हजारातले पंचवीस हजार त्याने त्या मुलाच्या आईला देवून तिची गरिबी थोडी दूर करायचा प्रयास केला. एक गरीबच जाणू शकतो गरीबाची स्थिती. अशी मवाळ हृदयाची माणसे दुनियेत आहेत. ती देव तुल्य आहेत.
त्या तरुणाचे सदैव चांगले होवो अशी मी देवापाशी प्रार्थना करते. त्या मुलालाही उदंड सुखी आयुष्य लाभो ही शुभेच्छा व्यक्त करते.