जिद्द.
जिद्द.
गेली तीन महिन्यापासून आजारी असणारी आई आज दवाखान्यातून घरी येते. अशक्य वाटणारी गोष्ट घडते. तेव्हा हा मुलगी नी आई मधला संवाद...
हेमा : आई ,ये आई... कशी आहेस गं ? किती तब्येत खालावली आहे बघ...
आई: काय करू गं हेमा .. मला वाटत होते मी काही या आजारातून बरी होऊन घरी येते की नाही? कोण जाणे...
हेमा: अग आई असा का विचार करते?
आई: अग खरच माझी स्थिती फारच बिकट होती...
हेमा : हो गं आई, सध्या असे भयानक आजार येत आहेत.. खरच खूप सहन केलेस गं...
कशी झाली तुझी तब्येत..
आई: मन फारच कासावीस होत होते गं, या कोरोनानी माणसांची बघ ताटातूट केली...
हेमा: डोळ्यातले अश्रु लपवत... खर आहे गं आई..मला तर रात्र रात्र झोप लागत नव्हती गं....
आई: बाळ रडू नकोस गं, देवाचे आभार मान.आज तुझी आई यमाच्या दारातून परत आली आहे...
हेमा : खरच गं आई ... मी रोज स्वामींना मनापासून प्रार्थना करून सांगत होते... माझ्या आईची नी आमची अशी ताटातूट करू नकोस...
आई: हो गं बाई माझी बायडी.. अग मला जाण्याच दु: ख नाही गं पण एवढे गणगोत असतांना भूतासारखे एकटीच सर्व यातना भोगत बसावे लागत होते...कोणी बोलायला नाही का दुखते म्हणून सांगायला मायेचं माणूस जवळ नव्हते... याचे वाईट वाटत होते... आईला रडू आवरत नव्हते...
हेमा: आई गं... म्हणत आईला मिठी मारते... रडू नको...तू फार हिम्मतवाली आहेस म्हणून तर एवढे वय असतांना ही तू अशा भयानक आजाराला टक्कर देऊन त्यातून सही सलामत बाहेर आलीस...तुझ्या या जिद्दीला शतशः सलाम.....
आई: हो गं बाई.मी तुला न भेटता जाणार नव्हतेच गं... त्या यमदूताला सुध्दा मी खडसावून सांगीतले.. मी तुझ्या बरोबर येण्यास तयार आहे पण ...पण... माझ्या लेकरांची भेट होऊ दे...
हेमा: आई.. ये आई गंं...
आई: हो हेमा... मला मरणाची भीती वाटत नव्हती गं..पण...पण तुम्हा सर्वांना न भेटता जाणे.... मला पटत नव्हते... तुम्ही सर्वांसोबत असतांना मी आनंदाने निरोप....
हेमा: आई... ये आई.. पुरे झाले... अग मला ऐकवत नाही गं..असे बोलू नकोस...
तुला आता काही होणार नाही...
आई: बाळ, अग मी पिकले पान, केव्हा तरी गळून पडणारच, हाच तर सृष्टीचा नियम असतो...
तो सर्वांनाच लागू पडतो...
पण तुम्हा सर्वांना मी हसत हसत निरोप देईल...
हेमा: हे बघ तू असे काही बोलणार असशील तर ...तर ..मी निघून जाईल...
आई: बर बाई... राहिले...
नाही काही बडबड करत... आता खूष माझी बायडी..
.
हेमा: हो खूप खूष आहे मी आज... स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली... आज मला अशक्य ते शक्य करतील स्वामी... या गोष्टीची प्रचीती आली आहे... असे म्हणून हेमा आईला मिठी मारते...
