आधुनिक गणेशोत्सव
आधुनिक गणेशोत्सव
गणपती गणराया
आगमन होता हर्ष
तूच बुद्धीचा देवता
करू स्वागत सहर्ष
अशा लाडक्या बाप्पाचे आगमन झाले.सर्व भक्तगण आनंदात आहेत. बाप्पाचे स्वागत जल्लोषात घरोघरी झाले.दहा दिवस प्रचंड उत्साहात गणेशोत्सव साजरा होईल यात शंका नाही.
स्वातंत्र्य पूर्व काळात टिळकांनी समाजजागृती व्हावी या निखळ हेतूने गणेशोत्सव सुरू केला. सर्व लोक एकत्र येऊन स्वातंत्र्याचे बीज मनी रोवण्यासाठी गणेशोत्सव सुरू करण्यात आला. तो बऱ्यापैकी यशस्वी झाला.
गणेशोत्सवा निमीत्त लोक एकत्र येऊ लागले.समाज प्रबोधन होऊ लागले. वेगवेगळ्या ठिकाणी मंडळ स्थापन झाले. अनेक लोक एकत्र येऊन दहा दिवस पूजाअर्चा करून विविध कार्यक्रमाचे नियोजन करू
लागले. कुठे किर्तन,कुठे गाण्याचे कार्यक्रम तर कुठे विविध रंगाने नटलेले मेळे होऊ लागले. ते पाहतांना खूप मजा येत असे. लहान मोठी माणसे एकत्र येऊन दहा दिवस आनंदाने गणेशोत्सव करत असत. यात धार्मिक पावित्र्य राखले जात असे.
हल्ली मात्र गणेशोत्सव जवळ आला की छातीत धडकी भरायला लागते.याचे कारण म्हणजे गणेशोत्सवाला आलेले ओंगळवाणे स्वरूप. गणपती म्हटले की गल्लीतील उडाणटप्पू टोळक्याची जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे.दिली नाही तर मनमानी करून त्रास देणे. जमवलेल्या पैशातून दहा दिवस गणपती समोर हिडीस नाचगाणे, पिणे, भांडणे, मंडळा मंडळात भांडणाचा कलह,कर्णकर्कश डिजे, दहशत तर एवढी असते की कोणी तोंड उघडण्याची हिंमत करत नाही.जर एखाद्याने केलीच तर त्याचे पुढे काय होईल हे सांगणे कठिण आहे. अशा वेळी आजारी माणसं,बालके,वृध्द लोकांना खूप त्रास होतो. डिजेचा आवाज तर एवढा भयानक असतो की आख्यी बिल्डींगच हादरायला लागते. डोक फुटेल की काय असा त्रास लोकांना होत आहे.हे सगळे बघीतल्या वर एक प्रश्न सतावत आहे खरच यात धार्मिक पावित्र्य आहे का?
असे वाटते कशाला हवे सार्वजनिक गणपती?
हे बदलते स्वरूप खरच फारसे कोणाला रूचले
नाही.
एकच मागणे मागते
द्यावी बुद्धी गणराया
धार्मिक भावना जपावी
होईल तुझी कृपाछाया
