झुंजार झुमरी
झुंजार झुमरी


""झुमरी ,अगं झुमरी sssssss""
""अगं कुठे आहेस तू? कधीची आवाज देतेय मी".
"कुठे गेली ही मुलगी?"असे स्वतः शीच पुटपुटत झिनत म्हणजे झुमरीची आई पदराला हात पुसत घराबाहेर आली . पाहते तर काय ? झुमरी वाघाच्या एका जखमी पिलाला औषधोपचार करत होती.झिनत खुप घाबरली.लगबगीने जाऊन तिने झुमरीला पिलापासून दूर केले . झुमरीला आपल्या आईची काळजी घेणे पाहून गंमत वाटली. तिने आईला समजाऊन सांगितले.
झुमरी 10 वर्षाची अतिशय लाघवी मुलगी . घारे व बोलके डोळे , कुरळे आणि भुरे केस, बुटकासा बांधा, रंग सावळा आणि लालचुटुक ओठ. घराच्या बाजूला काही रानफुलांची झाडे होती . झुमरी ती रानफुले केसांत माळायची. चालताना तिच्या पायातील चाळ छुमछुम वाजायचे. अशी ही पोर जणू वनकन्याच भासायची. बोलक्या आणि धाडसी स्वभावामुळे ती सगळ्यांना आपलेसे करायची.
झुमरीचे वडील वनखात्यात कर्मचारी होते.त्यामुळे गावालगतच्या घनदाट जंगलाच्या बाहेर एका छोट्या टुमदार घरात ती तिची आई आणि वडील राहत होते . जंगलापासून गावाचे अंतर बरेच होते . झुमरी आपल्या वडिलांसोबत जीप मध्ये बसून गावातील शाळेत जायची . ती चौथीच्या वर्गात शिकत होती.अभ्यासातही ती हुशार होती.
सुट्टीच्या दिवसांत आणि इतर रिकाम्या वेळेत ती वडिलांबरोबर जंगलात फिरायची , प्राण्यांचे निरिक्षण करायची , त्यांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करायची , वडाच्या पारंब्या आणि झाडावरून खाली आलेल्या वेलींवरुन झोके खेळणे हा तिचा आवडता उद्योग. त्यामुळे जंगल तिला परिचयाचे झाले होते.
एक दिवस दुपारच्या वेळी वडील काही कामासाठी शहरात गेले असताना आईचा डोळा चुकवून झुमरी जंगलात झोके खेळायला गेली. झोके घेत घेत ती आज जंगलाच्या बरीच आत आली .अचानक तिने पाखरांचा थवा आकाशात उंच उडताना पाहिला . तिच्या मनात कसलीशी शंका आली . ती थोडी सावध झाली . झूले घेणे थांबवून शांत उभी राहून नक्की काय घडले असावे याचा अंदाज घेऊ लागली. तितक्यात हरणांचा घाबरलेला एक कळप तिला धावताना दिसला . काय होतेय हे कळायच्या आतच एक भला मोठा वाघ तिच्या नजरेच्या टप्प्यात आला .वडिलांसोबत जंगलातून गाडीत फिरताना तिने दुरुन वाघ पाहिले होते . पण आज असे एकटे असताना एवढ्या जवळ वाघ पाहून ती जरा घाबरली . पण आता घाबरून उपयोग नव्हता . तिथून निसटण्यासाठी झुमरी विचार करू लागली .
वाघ जिभल्या चाटत चाटत एक एक पाऊल पुढे टाकत होता . आज माणसाची शिकार मिळणार हे पाहून जणू काही त्याला आनंदच झाला होता . इकडे झुमरी हळूहळू मागे सरकत झुडुपात लपायचा प्रयत्न करत होती. तिची हालचाल पाहून शिकार निसटते की काय या विचाराने झडप घालण्यासाठी वाघ धावू लागला . झुमरीने इकडे तिकडे बघितले आणि जवळच्या एका लटकणाऱ्या वेलीचा पीळा हातात धरला आणि झोका घेत वाघाच्या समोरून निघून गेली.हातात आलेली शिकार जाताना पाहून वाघ भयंकर चिडला . तोही दुप्पट ताकदीने पळू लागला . या पाठशिवणीच्या खेळात झुमरीला बऱ्याच जागी खरचटले,अंगातून रक्त निघू लागले पण तिने हार मानली नाही. अथक प्रयत्नानंतर ती कशीबशी वडिलांच्या ऑफिसपर्यंत पोहचली.पण वडील तर शहरात गेलेले. ऑफिसला कुलूप. आता काय करायचे ? वेळ न दवडता तिने शेजारच्या मोठ्या दगडाने खिडकीचा काच फोडला. हात मध्ये घालून खिडकी उघडली आणि खिड़कीतून आत घुसली. वडिलांना फोन करून वाघ जंगलातून बाहेर आल्याचे कळवले .
इकडे वाघाचा शिकार गेली म्हणून जळफळाट झाला . रागाच्या भरात तो आता गावाकडे जाऊ लागला . काय होईल या भीतीने झुमरीने वडिलांना घाई करण्यास सांगितले .वडिलांनी ताबडतोब आपल्या वनखात्याला कुमक घेऊन येण्यास सांगितले .वडील आणि त्यांचे सहकारी येईपर्यंत वाघ गावाच्या नजीक पोहचला होता आणि झुमरीदेखिल त्याचा माग घेत होती. काही वेळाने वनखात्याच्या लोकांनी त्या वाघाला पिंजऱ्यात जेरबंद केले.
झालेला प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात यायला बराच वेळ लागला . वडील आल्यावर झुमरीने सगळी हकीकत त्यांना सांगितली. वडिलांना आपल्या मुलीचे खुप कौतुक वाटले .ही बातमी सगळीकडे पसरली . तितक्यात झुमरीची आईही तिथे पोहचली. तिने आपल्या लाडक्या लेकीची अलाबला घेतली, पटापट मुके घेतले. गावातील डॉक्टरने तिचे औषधोपचार केले.
काही गावकऱ्यांनी तिला खांद्यावर बसवले आणि तिची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली.
दुसऱ्या दिवशी शहरात तिचा सत्कार झाला . मा. जिल्हाधिकाऱ्यांनी तिला 'झुंजार' अशी पदवी बहाल केली. सारेजण तिला आता 'झुंजार झुमरी' म्हणून ओळखू लागले.
आई मात्र झुमरीला ताकीद देऊन सांगत होती की यानंतर पुन्हा एकटीने जंगलात जायचे नाही. झुमरी मात्र तिला चिडवून म्हणायची की वाघाशी सामना करताना माझ्या पायातील एक चाळ हरवलाय तोच आणायला एकदा जंगलात जाते. मग दोघी मायलेकी एकमेकींच्या गळ्यात हात टाकून हसायच्या.