जाणता राजा
जाणता राजा
"आई आई, जाणता राजा म्हणजे काय गं?" सायलीने शाळेतून येताना मला प्रश्न विचारला .
"तुला कशाला हवं? वेळ आहे तुला ते जाणून घ्यायला."
"अगं, मला नको पण माझी चौथीतली मैत्रीण आहे ना, निता, तिला निबंध लिहायचा आहे. तिचे आईबाबा गावी गेलेत आणि तिला सांभाळणारी बाई आहे तिला काही येत नाही म्हणून ती रडत होती."
"बरं, तिला संध्याकाळी बोलाव घरी, मी सांगते तिला."
"खरंच, किती छान आहेस गं तू माझी आई. निताला आनंद होईल आता. मी बोलावते तिला नंतर" असे म्हणून सायलीने मला घट्ट मिठी मारली. आपल्या मैत्रिणींच्या आनंदात ही सामील झालीय हे पाहून मला ही बरे वाटले.
संध्याकाळी निता वही घेऊन आली. आता चौथीतली विद्यार्थिनी म्हणजे शिवछत्रपती तिला माहीतच असणार हे गृहीत धरून मी शिवाजी राजां बद्दल तिला जुजबी प्रश्न विचारले आणि नंतर त्यांना जाणता राजा का म्हणायचे ते सांगितले.
आज तीनशे साडे तीनशे वर्षे होत आहेत तरी महाराष्ट्रातील प्रत्येकाला शिवाजी राजें बद्दल आदर, श्रध्दा आणि अभिमान आहे. ते नुसते नावाला राजे नव्हते तर एक स्वातंत्रयोध्ये, सेनापती, संघटक, स्फुर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. शिवाजी राजे केवळ पुण्यवंत राजेच नव्हते तर आदर्श नितीवंत राजे होते.
"बाळ, तुला समर्थ रामदास माहीत आहेत? समर्थांनी शिवाजी राजेंचं वर्णन असं केलंय.
" निश्चयाचा मेरु! बहुत जनांशी आधारु!
अखंड स्थितीचा निर्धारु! श्रीमंत योगी!"
किती सुंदर शब्दांनी राजेंचं वर्णन केलयं समर्थांनी."
ते श्रीमंत होते आणि योगी ही होते. त्यांच्या कार्यात दक्षता, कणखरपणा आणि कार्य तत्परता होती. राजेंच्या शब्दकोशात आळस, चंचलता, मोह, भोगवाद हे मुळीच नव्हते. उलट ते सतत उत्साही, निग्रही, त्यागवादी आणि मायाळू होते. आर्दश राज्यकर्ता, थोर सेनानी, लोकहितदक्ष, धर्माभिमानी पण परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न असा हा जाणता राजा होता. महाराजांची बरोबरी करणारा राजा सापडणे दुर्मिळच!
त्या काळातील बाकिच्या राजांपेक्षा आपले महाराज कंकणभर अधिकच होते. शिवाजी महाराजांना अग्रस्थान मिळण्याचे कारण म्हणजे त्यांची नितीमत्ता बलवत्तर होती. मोगलांच्या काळात त्यांच्या सत्तेच्या अमलामुळे स्त्रियांची अब्रू लुटण्याचा प्रसंग केव्हा येईल याचा नेम नव्हता. या उलट शिवाजी राजेंचा आदेश होता की परस्त्रिला आदराने, सन्मानपूर्वक त्यांच्या घरी पोचवायचे.
शिवरायांचे सैन्य ही तसेच छान होते. त्याच्या सैन्यात छपन्न जातीचे लोक होते. सैन्याची निवड ही त्यांच्या गुणावरून करत. शिवरायांनी घालून दिलेल्या सवंयी व आदर्श सैन्यात भिनलेले होते. जर कुणी आदेशाचा भंग केला तर त्याचं काही खरं नव्हतं. राजे शिक्षेच्या बाबतीत ही तेवढेच कडक होते. अशावेळी त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजे संभाजी राजेंनाही शासन द्यायला कमी केले नव्हते.
असे आपले शिवाजी महाराज, दुष्टांचा काळ, गरिबांचा कनवाळू, रयतेला पोटच्या मुलांप्रमाणे वागवणारे, आई साहेबांंच्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता करणारे. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा अशा विविध संपत्तीचे संगोपन करणारे, रणवीर, पापभीरू, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोकांच्या पंगतीत पात्र आहेत.
असे महान राजे आपले, छत्रपती शिवाजी महाराज, एकमेव सर्व गुणांनी सर्वश्रेष्ठ, म्हणजे जाणता राजा.
आज आपण बघतो की महाराष्ट्रात प्रत्येक माणसात शिवजी राजें बद्दल अभिमान आहे. आपण शिवजयंतीला त्यांच्या नावाचा जयघोष करतो. सर्वजण महाराजांच्या नामाचा उदो उदो करत असतात पण महाराजांच्या विचारांना कृतीत आणणारे विरळच!!
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी जीवनऊर्जा समर्पित केली. त्यांच्या चरित्र्यावरचे धडे आपण गिरवायला हवेत. त्यांचे आचार विचार अंगीकारायला हवेत.
जय महाराष्ट्र! जय शिवाजी महाराज!