Ujwala Rahane

Others

3  

Ujwala Rahane

Others

जागतिक चिमणी दिन

जागतिक चिमणी दिन

2 mins
217


आज चिमणी रूसली आणि आपल्या घरट्यात जाऊन कोपऱ्यात बसली. काही केल्या हासेना, कोणाशीही बोलेना. वाऱ्याची झुळूक गेली समाजावयाला चल ग चिऊ बाहेर खेळायला? काडी, मोडी देते तुला ऊपयोग होईल घरटे बांधायला! मी नाही भुलणार तुझ्या थापाला, जा तु निघून कावळ्यांचा घराला. पानेही गेली समाजावयाला येना चिऊताई बाहेर फांदीवर बसायला माझ्याखाली दडलेली आळी, मुंगी देईल तुला खायला! जारे जा नको असली आमिषं मजला!


  चिऊताई जुमानत नव्हती कोणाला. मग पिंकींने युक्ती काढली, हळूच चिऊताईच्या घरट्याजवळ गेली, काय झालं चिऊताई बोल बर माझ्याशी!

तुला राग कशाचा आला समजू दे मजशी? झाली माझी मदत तर नक्कीच मी तुझ्या सेवेशी! चिऊताई रडवली, नको ताई तुझ्याकडून सेवा माझी, एकच मागणे तुझ्यापाशी!. माझी कहाणी ऐकशील थोडीशी? पिंकींने मान डोलावली, चिऊताई बोलू लागली!. 


   कोणे एके काळी घराला अंगण होते. अंगणाच्या वळचणीला माझे पूर्वज राहत होते. धान्य, धुण्य अंगणात वाळत असायचे. त्यातले किडा मुंगी ते टिपायचे. दाणा पाणी कायम एका वाडग्यात आमच्यासाठी खिडकीत असायचे. चिऊकाऊच्या गोष्टीत तुम्हां बालगोपालांचे मन रमायचे, घरच्या छोट्या-मोठ्यांच्या मनात आमचे स्थान महत्वाचे असायचे. पाटीवर पण आमचे चित्र ते रेखाटायचे. पण आता चित्र पालटले. ना आंगण राहिले ना वळचणी. तुमच्याच घराचे स्वरूप बदलले. टोलेजंग इमारतीने आमची हक्काची वृक्ष भुईसपाट केली. कोठे बांधायचे आम्ही घरटे?


   वेगवेगळ्या दिव्याच्या रोषणाईने तुमच्या गावाचे रूप पालटले. पण रोषणाईच्या खांबा व तारांनी आमच्या कित्येक सदस्याचे बळी घेतले. आज गोष्टीतली सुध्दा काऊचिऊ हरवली कारण, बच्चे मंडळी कार्टूनच्या जगात विसावली. किडा मुंगी पण नष्ट झाली कारण केमिकल लावून तुमची धान्य हवाबंद डब्यात जाऊन बसली. याचा परिणाम आता आमची संख्या घटत चालली. तैलचित्र बनून तुमच्या घराच्या भिंतीची शोभा वाढवू लागली.


 सहज नित्यनेमाने मी आज मी उठले घरट्याच्या बाहेर डोकावले कुठूनशी तरी धुन कानावर पडली. वाटले कोणाला बरं माझी आठवण झाली? इतक्या पहाटे कोण आई आपल्या बाळाला चिऊकाऊचा घास भरवत आहे? मग माझी चिवचिव थांबवून मी कानोसा घेतला, तोच आकाशवाणीचा आवाज कानी पडला. आज जागतिक चिमणी दिन. अरे हो! म्हणून हा स्तुतीसूमनांचा वर्षाव होय?.. 


   आजकाल चिमण्या दिसत नाहीत, ही पक्षाची जमात पृथ्वीतलावरून नष्ट होत आहे. त्यांना संजिवन द्या, आज काळाची गरज आहे. पर्यावरण क्षेत्रात ह्या पक्षांचा मोलाचा वाटा आहे. बरेच काही, काही बोलत होती. सगळी दांभिकता.पण पाठांतर मात्र मस्तच होते. माझी सहनशक्ती संपली म्हणूनच आज या घरट्यात रूसुन बसली. निदान हे तरी घरटे वाचेल ना एक एक काडी, काडी जमवून बनवले ग! का परत रहदारीला अडथळा म्हणून या झाडावरपण गदा येणार??.. 


   पिंकी सुन्न होऊन ऐकत होती. खरच चिऊताईच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिच्याकडेही नव्हती. फक्त 'जागतिक चिमणी दिनाच्या' औपचारिक शुभेच्छा तिनेही चिऊताईला दिल्या. भुर्रकन उडून पिंकी घरात आली. चिऊताई मात्र पंख पसरून घरट्याच्या दारात बसली विचार करत. नक्की पिंकीवर काय परिणाम झाला असेल या आपल्या बोलण्याचा याचा विचार करत, शुन्यात नजर लावून!..


Rate this content
Log in