Pandit Warade

Others

5.0  

Pandit Warade

Others

इरसाल चौकडी

इरसाल चौकडी

5 mins
1.6K


इरसाल चौकडी


इरसाल वाडी! पन्नास साठ उंबऱ्याचं छोटंसंच गांव. डोंगराच्या पायथ्याशी, झुळुझुळू वाहणाऱ्या नदीच्या काठावर, दाट झाडीत वसलेलं गांव. झाडी एवढी उंच की, जसे आभाळातल्या देवाला शोधायला निघालेले वीर. जणू एकमेकांच्या चढा- ओढीनं वर वर स्पर्धा जिंकायला निघालेले स्पर्धक. या झाडीच्या मध्ये असलेलं, ऊरावर येईपर्यंत न दिसणारं गांव म्हणजे इरसाल वाडी.


या गावची घरे सर्व प्रकारच्या घरांचे नमुनेच जणू. काही कुडाची तर काही मातीच्या भिंतीची. बांबूच्या कमट्या जोडून बनवलेल्या भिंतीची तर काही गवत, पळसाच्या पानांनी शाकारलेली छप्परांची. काही घरे पक्की दगड विटांमध्ये बांधलेली सुद्धा होती. घरांच्या प्रकारांप्रमाणे तिथे राहणाऱ्या माणसांचे स्वभाव सुद्धा विविध प्रकार होते. कुणी रागीट, कुणी संयमी, कुणी शांत, कुणी तापट, कुणी प्रेमळ होते. कुणी भित्रे तर कुणी उगाच धीट असल्याचा आव आणणारे असे होते. काही यमालाही भ्यायला लावतील असे पत्थर काळजाचेही होते.


यातच पाटलाचा प्रकाश म्हणजे गावचा पक्या आणि त्याच्या सोबतचे त्याचे दोस्त मांगाचा विक्या, चांभाराचा तुक्या तर कुंभाराचा मक्या हे रहात होते. हे चौघे म्हणजे इरसाल गावची इरसाल चौकडीच. लई इरसाल नमुने, एकापेक्षा एक.


हे चौघेही सदा सोबत असायचे. कोणाच्या डोक्यात कोणत्या वेळी कोणती अफलातून कल्पना येईल सांगता यायचे नाही. अशी एखादी कल्पना आली रे आली की सर्वजण तिला उचलून धरायचे, अमलात आणायला तत्परही रहायचे. एकदा तर या कंपूने गावच्या सरपंच अन् कोतवालाची दारूही महिनाभरासाठी बंद केली होती.

त्याचे झाले असे होते, इरसालवाडीत दारूबंदी होती. म्हणजे प्यायला ना नव्हती पण येथे दुकान नव्हते. शेजारच्या तांड्यावर जावे लागायचे. गावात टिंगल टवाळी होऊ नये म्हणून पिणारे शक्यतो संध्याकाळी उशीराने जाऊन पिऊन यायचे.


असेच एके दिवशी सरपंच आणि कोतवाल उशिरा पिऊन रस्त्याने बडबड करत येत होते, तसे ते रोजच यायचे. त्यांच्या या बडबडीचा त्रास आजू बाजूच्या वस्ती वरील लोकांना व्हायचा. विक्याच्या डोक्यात एक इरसाल कल्पना सुचली. त्याने इतर तिघांनाही सांगितली अन् सर्वानुमते ती अमलात आणायचेही ठरले. विक्याचं घर गावाच्या बाहेर पण अगदीच जवळ होते. तेथेच लहान मुलांची हडवाई म्हणजे स्मशानभूमी होती. तिथून वाहणाऱ्या नदीच्या काठावर एक मोठ्ठे लिंबाचे झाड होते. तांड्यावरून येणारा रस्ता पाणंद मधून नदीत उतरून त्या झाडा खालूनच जात होता.


सरपंच आणि कोतवाल नेहमीप्रमाणेच पिऊन बडबड करत येत होते. अंधार पडलेला. रस्त्याने दोघेच. अचानक लहान मुलाच्या रडण्याचा आवाज सरपंचाच्या कानावर येतो. कोतवालाला सांगितले तर, "न्हाई वो पाटील, तुम्हाला जास्त झालीय म्हणून तसं वाटतंया." सरपंचालाही पटलं. थोड्या वेळानं पुन्हा आवाज आला, अगदी जवळून. दोघेही थबकले, चाहूल घेतली, चालायला लागले. पुन्हा आवाज आला, आता दोघांनीही ऐकला. पुन्हा आवाज येणे, थबकणे, चालणे, सुरू झाले. एव्हाना दोघांनाही चांगलीच भीती वाटायला लागली होती. नशा उतरायला लागली होती. दोघेही एकमेकांशी न बोलता गुपचूप, झपाझप पाय उचलून चालू लागले. लवकर घरी पोहचायचे होते. अशातच ते पानंदीतून नदीत उतरले, वाळूतून घाईत चालतांना कोतवालाच्या चपलेने उडवलेली वाळू पाठीवर लागू लागली. दोघेही जाम घाबरले. नेमके लिंबाच्या झाडाखाली आले तसे आधीच रंगाने काळा असलेला अंगाला काजळी लावून आणखी काळा झालेला विक्या झाडावर नग्नावस्थेत बसलेला, धपकन खाली वाळूवर आदळला तो या दोघांच्या एकदम समोर. दोघेही 'भूssत भूssत' करत एकावर एक कोसळले. विक्या उठून पळून गेला पण हे दोघेही बराच वेळ पडून होते. बऱ्याच वेळानंतर दोघेही उठले, आजूबाजूला बघितले. कुणीच कुणाला काही सांगायचे नाही असे ठरवून घरी निघून गेले. फिरून महिनाभर ते दोघेही दारूच्या दुकानाकडे फिरकलेच नाही.


तुक्याही काही कमी नव्हता. गावात एक कडक स्वभावाची आज्जी होती. तशी ती आतून फार प्रेमळ होती पण तोंडाने फटकळ. बोलायची अशी जणू भांडायला उठली. खूप काहीच्या बाही बोलायची. एकदा त्या आजीच्या शेतातील आंब्याच्या झाडाचे आंबे कुणीतरी तोडले. विक्या, तुक्या, मक्या हे तेथे जनावरं चारायला जायचे म्हजून यांच्यावर आरोप करत त्या म्हातारीने गावभर बोभाटा केला, खूप शिव्या दिल्या. घरच्यांच्या शिव्या खाव्या लागल्या. या साऱ्यांनी तिच्या शेतात जाणेच बंद केले. पण एक दिवस तुक्या बैलगाडीतून त्या झाडा खालून जात असता त्याला त्या शिव्या आठवल्या. मनातल्या मनात चिडला तुक्या. गाडी उभी केली, हाताला लागतील तेवढे आंबे तोडले, गाडीत टाकून निघाला गावाकडे. गाव जवळ आल्यावर मात्र तुक्याला मोठ्ठाच प्रश्न पडला, आंबे न्यायचे कुठे? दिसला एक मोठा खड्डा दिले आंबे त्यात टाकून. एकाच गुन्ह्याला डबल शिक्षा थोडीच होणार होती?


म्हातारीने केलेल्या बोभाट्याने साऱ्या गावात या चौकडीचे नांव चांगलेच कुप्रसिद्ध झाले होते. कुणाच्याही घरीदारी कुठेही काही गडबड झाली तर या चौकडीचेच नांव येऊ लागले. हे सर्व त्या म्हातारीमुळेच होते म्हणून यांचा तिच्यावर राग आणखी वाढत होता.

जंगलात जनावरं चारत असतांना भला मोठ्ठा साप या चौकडीने पाहिला त्यांनी पाठलाग करून त्याला ठार केले. एवढया मोठ्या सापाचे काय करायचे? या प्रश्नाला मक्याच्या डोक्यात अफलातून उत्तर होते. त्याने ठरवले, 'रात्री उशिरा साप तेथून उचलायचाच, कुणालाही न कळू देता.'


दुसऱ्या दिवशी सकाळी ती म्हातारी उठली. दार उघडून समोर पाहते तो, भला मोठा साप दारात आडवा पाहून जाम घाबरली. परत दार घट्ट लावून घेत चार तास घरातच 'ऊँ नमः शिवाय' चा जप करत बसली.


हळूहळू साप मक्याने आणला होता ही गोष्ट गावात पसरलीच. म्हातारी आणि चौकडी मधील वैर वाढत चालले. म्हातारी रोज शिव्या घालायची. घरच्यांच्याही शिव्या खाव्या लागायच्या. कधी कधी शिक्षाही मिळायची.


यावर उपाय म्हणून एके दिवशी पक्याने या त्रिकुटाच्या सहाय्याने एक योजना आखली. शेजारच्या गल्लीत भजनाचा कार्यक्रम सुरू होता. भजन ऐन रंगात आलेले, रात्रही चढत चाललेली, अर्धी रात्र झाली असेल. म्हातारी अंगणात खाटेवर शांत झोपलेली. गाढ झोपलेल्या म्हातारीला अंधारात खाटे जवळ कुणी आलं त्याची चाहूल सुद्धा लागली नाही. हळूच म्हातारीची खाट उचलली गेली. हळू हळू ती खाट शाळेच्या मागच्या मैदानात लहान मुलांच्या स्मशानात अलगद ठेवल्या गेली. म्हातारीला थोडेही कळले नाही. जेव्हा कळले तेव्हा म्हातारीने दुखणेच काढले. चार महिने घरात पडून होती.


अशा एक ना अनेक घटना घडवणाऱ्या या चौकडीला सरळ मार्गावर आणण्यासाठी, जणू देवानेच आखलेल्या योजने प्रमाणे एक शिक्षक तिथे राहायला तिथे आले. आठ दिवसातच गुरुजींच्या लक्षात आले की ही चौकडी काही वेगळी आहे. एकेक नमुना आहे. गुरुजींनी त्यांच्यावर नकळत लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यांना आवडतील अशाच गोष्टी ते त्यांच्या जवळ बोलायचे, त्यांच्या सोबत त्यांच्यासारखे बनून खेळायचे सुद्धा. हळूहळू त्यांच्यात घट्ट अशी मैत्री जमायला लागली. ती चौघेही गुरुजींजवळ अगदी मन मोकळे बोलायला लागले. मनात जे काही येईल ते बिनधास्त सांगायला लागले.


गुरुजीही त्यांच्या सारखे बनून त्यांच्यातीलच एक बनले असे इतरांना वाटायचे, तसे या चौकडीलाही वाटायचे. चौकडीच्या या खोडकर शक्तीचा रचनात्मक कामासाठी वापर करायचे गुरुजींनी ठरवले.


एक दिवस सारा गांव झोपलेला असतांना या चौकडीने गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शाळेपर्यंतचा रस्ता बनवला अगदी स्वच्छ, साफसुथरा. काही दिवसांनी गावापासून दूर असलेल्या देवीच्या मंदिर पर्यंत जाण्यासाठीचा नवीन रस्ता बनवला. वर्षानुवर्षे त्या मंदिरापर्यंत जायची हिम्मत कोणी करत नव्हते.


हळूहळू गावचे रस्ते एकदम मस्त, व्यवस्थित व्हायला लागले. दुर्गम रस्तेही सुगम होऊ लागले. गावातील सांडपाण्याच्या नाल्या, गटारी, व्यवस्थित झाल्या. कुणाच्या झोपडीची डागडुजी, तर कुणाच्या शुभकार्यातील कामाची जबाबदारी. कुणाच्या शेतातील पीक काढणी असो की गावचा एखादा उत्सव, चौकडी पुढेच असायची. शाळेच्या सांस्कृतिक, स्पर्धात्मक कामाची जबाबदारी चौकडी मोठ्या हिरीरीने पार पाडायला लागली.


परीसाचा स्पर्श होऊन लोखंडाचे सोने व्हावे तसे या चौकडीचे झाले. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली खूप शिकून पक्याचा डॉ. प्रकाश झाला, विक्याचा इंजिनिअर विकास झाला, तुक्याचा तुकाराम पंत वकील तर मक्याचा मकरंद गुरुजी झाला.


Rate this content
Log in