हृदयपर्शी कहाणी एका आईची....
हृदयपर्शी कहाणी एका आईची....
आईचा मुलांसाठी तुटणारा जीव, मुलांसाठी न डगमगता कोणत्याही परिस्तिथीत उभी राहणारी आईच असते. ज्याच्यामुळे तिला उभे राहण्याचे बळ मिळते ते तिच्यातील मातृत्वामुळे .... अशाच एका आईची हृदयस्पर्शी कहाणी.... !
पावसाची संततधार अखंड चालू होती. काळआभाळ अजून गच्च भरून आलं होत. सगळीकडे हिरवळ पसरली होती. पाऊस अजून थांबेल असं कोठेही जाणवत नव्हते. निर्सगाचा देखावा मात्र डोळ्यात साठवण्यासारखा झाला होता. पारू आपल्या झोपडीत बसून पावसाला शिव्या घालत होती. पाऊसाचा ती खूप राग राग करत होती.
तिची तरी काय चुकी म्हणा, "दोन दिवसापासून पोरांच्या आणि तिच्या पोटात अन्नाचा एक कण नव्हता. उपासमारीने पोरं हिरमुसून गेली होती. ती मासेमारी करून उपजीविका करत होती . त्यातून कुटुंबाचं पोट भरत होती. नवरा बायको कष्टाचे दिवस काढून संसारासाठी राबत होते, पण नियतीने घाव घातला, नवऱ्याची मिळालेली कमी साथ तरीही ती खंबीर उभी राहून संसार करत होती. साप चावण्याचे निमित्त होऊन तिचा नवरा दगावला होता, तरीही ती मुलांकडे बघून दिवस काढत होती, पण त्यातही आज तिच्यासाठी पाऊस वैरी झाला होता.
कधी पाऊस थांबतोय याचीच ती वाट पाहत होती. पारू दोन्ही मुलांना घेऊन झोपडीत पाऊस थांबण्याची वाट पाहत होती. लहान मुलगा तापाने फणफणला होता. कालपासून त्याला दूध मिळाले नव्हते. त्याच्या तापामुळे तिचा जीव अजूनच कासावीस झाला होता. पारू त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्या ठेवत होती
मोठा मुलगा आई खूप भूक लागली ग..? सारखं म्हणत होता.
पाऊस थांबला कि, लगेच जाऊ मासे आणायला....! आज मस्त बेत करते माशाचं कालवण.
माशाचं कालवण म्हणल की, "सुरश च्या तोंडाला पाणी सुटलेलं होत. भूक आणखीनच वाढली होती.
संध्याकाळच्या वेळेला पारूने झोपडीतून डोकावलं तर पाऊस थांबलेला होता. छोट्या मुलाचा तापही कमी झाला होता. तिने एका कडेला कमरेला छोट्या मुलाला घेतले, दोन टोपल्या माशांकरीता घेऊन लगबगीने सुरेशला हाताला धरून निघाली. समुद्रात बरेच रोहू, मृगळ,सुरमई मासळ्या होत्या . खेकड़े आणि साप ही किनाऱ्यावर बरेच होते. रंगीत हिरवे, पांढरे, काळे साप गट्टेच्या गट्टे एकमेकांवर पडलेले होते. कोणालाही बघून अंगावर काटा यावा असे ते दिसत होते. सुरेश त्यांना मुद्दाम दगड मारत होता, छोट्याला ते दृश्य बघून खूप आनंद वाटत होता, आनंदाने तो टाळ्या पिटाळून त्याच्या दादाला साथ देत होता. हे त्याच्या रोजच्या आयुष्यातील भाग असल्याने आणि उपाजीविकेचे साधन असल्याने सुरेशची भीती मात्र मुरली होती.
पारूच्या नजरेत ते दृश्य पडताच अरे सुरेश कळतं का काय तुला....? "साप खेकड्यांपासून सावध राहा. अंधार पडायला लागलाय. दगड मारू नकोस साप चावेल. आईच्या ओरडण्याने सुरेश छोट्या भावाला घेऊन एका दगडावर जाऊन बसला.
दगडावर जाऊन बसताच एक साप सुस्तपणे त्यांच्या कडेने चालला होता. त्याने काहीतरी खाल्ले होते. त्यामुळे साप खूप फुगल्यासारखा दिसत होता, ते बघून सुरेशच्या अंगावर काटाच आला . त्याने लगेच छोट्या भावाचे डोळे झाकले तो घाबरू नये म्हणून...! तिन्हीसांज ची वेळ झाली होती. पारुने टोपल्या भरून मासे पकडलेले होते . दोन्ही मुलांना घेऊन घरोघरी जाऊन मासे विकले. पारूला पोटापुरते पैसे मिळाल्यामुळे पारू आज आनंदाने मासे विकून घरी आली. थोडेफार मासे घरीही कालवण करण्यासाठी तिने आणले होते .
झोपडीत खूपच अंधार पसरला होता. तिने लगेच मेणबत्ती लावून सुरेशकडे पैसे दिले, तांदूळ आणि दूध आणायला सांगितलं. झोपडीतील अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात पारूने लगेच तिची पावसामुळे आंबटओली झालेली साडी मेणबत्तीच्या प्रकाशात बदलून टाकली. छोट्या मुलांचे मातीने मळकटलेले कपडे ही बदलले. काट्याकुट्यानी चूल पेटवून मेणबत्तीच्या प्रकाशात एकीकडे माशाला चिरून स्वच्छ करून शिजायला टाकले , आणि बाळाला मांडीवर घेऊन सुरेश येण्याची वाट बघत होती.
आई... आई... हाक मारत सुरेश आला. दोन दिवसांनी आज जेवायला मिळणार असल्याने तोही खूप खुश होता.
सुरेश ने येताना दूध आणि तांदूळ आणलेले होते.
पारू आधी तिच्या छोट्या बाळाला दूध पाजून घेतले,आणि नंतर भात शिजायला टाकला . माशाच्या कालवणाचा वास सर्व घरभर पसरलेला असतो . त्या वासाने सुरेशची भूक अजूनच चाळवली होती .
सुरेश, "आई खूप भूक लागली ग...! कधी होणार जेवण ....?
पारू, " हे बघ भात शिजला कि झालं....!
जा तोपर्यंत बाहेर खेळ... !
मी तुला हाक देते.... !
आईच्या बोलण्याने सुरेश बाहेर खेळायला गेला. दोन दिवस उपासमारीने तिलाही खूप चक्कर आल्यासारखं झालं होतं. अंगात कसलाच त्राण शिल्लक राहिलेला नव्हता. तरीही ती काम करत होती.
भात शिजला की, "सुरेशला हाक तिने दिली , सुरेश चल पटकन जेवायला ये... ! सुरेशला बोलवून घेतलं.
आईच्या हाकेने तो उड्या मारत आनंदाने जेवायला आला . माशाचं कालवण भात बघून त्याच्या तोंडाला खूपच पाणी सुटलेले होते. पारुने जवळ जवळ सगळं पातेले सुरेशच्या ताटात खाली केलं . कारण पारूला माहित होते कि, "सुरेशची भूक खूप मोठी आहे. त्याचा आहार खूप मोठा आहे. पारू छोट्या मुलाला ही भात चारण्याचा प्रयत्न करते , पण तो तिचा प्रयत्न निष्फळ ठरतो . कारण त्याला दूध पिल्याने झोपेची गुंगी आलेली होती
पारू स्वतःचे जेवण आटपून काम आवरून घेते . तोपर्यंत दोघंही मुलं झोपी गेलेली असतात. पारूला आज समाधान वाटत होते दोन्ही ही मुले पोटभर जेवून झोपली होती.
पाऊस आता बराच वाढला होता, विजांचा कडकडाट होत होता. मुसळधार पावसाने तिला झोपही येत नव्हती. तिने मुलांकडे नजर टाकली मुलं गाढ झोपली होती. त्यांच्या अंगावर शाल टाकून ती ही झोपली. सुरेशला पडलेल्या एका स्वप्नामुळे त्याला जाग आली, तो उठला तसा झोपडीच्या बाहेर जाऊन त्याने उलटी केली. त्याला जास्तच मळमळ होत होती. सुरेशच्या आवाजाने पारूला जाग आली. काय झाले रे सुरेश ...?
सुरेश, "काही नाही ग आई मला मळमळ खूप होत होती आणि उलटी झाली.
"कशामुळे याला मळमळ आणि उलटी झाली. पारू त्याच विचारात होती .... !
आई तुला माहितेय का...? सुरेशच्या बोलण्याने पारू विचारचक्रातून बाहेर आली.
काय रे बोल ना...?,"आई म्हणाली.
आई मी काल एक साप बघितला. तो साप माझ्याकडेने चालला होता. तो खूपच फुगलेला भयानक दिसत होता. तो साप आज स्वप्नात मला चावला.
माझ्या तो शेजारून जातं होता ना.. ! स्वप्नात कसा काय मला चावला....?
पारू ने वेगळीच शंका मनातून काढली. सुरेशला झालेल्या उलटी मुळे ती आधीच घाबरली होती.
ती चटकन उठून माशाच कालवण बघायला गेली.
जे दुसऱ्या दिवशी जेवणासाठी ठेवले होते. ती सर्व तुकड्यांवरून हात फिरवू लागली. तिला सापाच्या डोक्यासारखं अंगासारखं माशाचे तुकडे वाटू लागले ती खूप घाबरली.
आज आपण मासा म्हणून साप चिरला कि काय अंधारात..?
आपण मुलाला साप खायला घातला कि काय ..?
सुरेशला यामुळे उलटी झाली कि काय .... !
अशा अनेक विचाराने ती खूप घाबरली. तिचं अंग थरथर कापत होते. नवरा साप चावल्याने गेला हे तिच्या मनात भीती बसली होती. ती उठायला गेली तशी ती जोरदार चक्कर येऊन खाली पडली.
आईच्या पडण्याच्या आवाजाने सुरेश पळत आईजवळ आला, "आई काय झालं उठना ग..! सुरेशच्या आवाजाने छोट्या ही रडत आईजवळ आला. दोघेही कडेला बसून आईला उठवत होते. आई... आई म्हणून पारूला हलवत होते.
आई उठना काय झालं तुला...?
दोघेही रडत होते. मुलांचा प्रयत्न निष्फळ ठरला होता, आपल्यामुळे मुलाला काहीतरी होणार..! याची तिने एवढी धास्ती घेतली की स्वतःचा जीव तिने गमवला होता.
