Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

गवसेमामा

गवसेमामा

7 mins
292


    गवसेमामा! एक अफलातून व्यक्तिमत्व. ते गावातल्या लहान थोरांना 'मामा' नावानेच हाक मारायचे. आणि गावातील प्रत्येक जण त्यांना 'मामा'च म्हणायचे. फक्त सखाराम पाटील यात्रेत गवसला म्हणून लाडाने 'गवशा' म्हणायचे. म्हणून लग्न कार्यात लोक त्यांना आदराने 'गवसेमामा' म्हणायचे. त्यांचे मूळ गाव कोणते? आई वडील कोण? कुणालाही थांगपत्ता नव्हता. शेजारच्या गावातल्या यात्रेत एक चारपाच वर्ष वयाचा मुलगा असहाय पणे रडत असलेला सखाराम पाटलांना दिसला. त्यांनी मुलाला उचलले. कडेवर घेऊन सर्व यात्रेत फिरवले. परंतु मुलाचे कुणी पालक त्यांना भेटले नाही. म्हणून पाटील त्याला घरीच घेऊन आले. आजूबाजूच्या सर्व गावात पाटलांनी दवंडी देऊन मुलगा सापडल्याची वर्दीही देऊन ठेवली होती. वाटत होते, कुणी तरी मुलाचा शोध घेत येतील. पण त्याला मुद्दामच जर सोडून दिले असेल तर कुणी शोधायला तरी कशाला येतील? आपोआप त्याचे पालकत्व पाटलांकडेच आले.


     असे हे गवसेमामा, साऱ्या गावाला मामाच वाटायचे. कुणाच्याही घरी कार्य कोणतेही असू द्या, मामा सर्वांच्या आधी हजर असायचे. लग्न असो अथवा मुंज, बाळ जन्माचा सोहळा असो की कुणाची अंत्ययात्रा, बारसे असो की तेरसे (तेरवी), 'मामाला माहीत नाही' असे कधीच होत नव्हते. मामाचे नेटवर्क खरोखर खूपच उच्च प्रतीचे असावे. सर्वांपेक्षा अगोदर मामाला खबर मिळायची. 


     मामाची माणसांची पारखही खूपच जबरदस्त होती. मामाने एखाद्याला एकदा नजरे खालून घातले, त्याची चाल बघितली की माणूस कसा आहे? मामा ताबडतोब ओळखायचे. आणि म्हणूनच कुणासाठी स्थळ बघायचे असेल तर मामाला हमखास बोलावणे असायचे. मामाने स्थळ पसंत केले की लग्न पक्के झालेच म्हणून समजा. पुन्हा कुणी काही बोलायचेच नाही. 


    असे कितीतरी विवाह गवसेमामांनी जमवलेले होते. त्यामुळे मामांचा परिचय आजू बाजूच्या सगळ्याच गावांमध्ये होता. सर्वजण त्यांना लग्नावाले मामा म्हणूनही ओळखू लागले होते. मामांना कामाचा जरा कंटाळा आला की कुठेतरी चारदोन दिवस फिरून यावं वाटायचं. मामा उठायचे आणि चालू लागायचे. कुठे जायचे? कुणाकडे जायचे? काहीच ठरलेले नसायचे. जिथे जावे वाटेल तिथे किंवा जिथे जाण्यासाठी एखादे वाहन लवकर मिळेल तिथे. असा मामाचा कार्यक्रम असायचा.


    अशा या सर्वगुण संपन्न गवसेमामाला विचित्र खोड होती. ती म्हणजे मामा कधीच गावाला जातांना पाटलांकडे पैसे मागायचा नाही. कुणी वाहन धारक नाही मिळाला तर पायीच निघायचे. नसता काहीतरी उचापती करून ठेवायचे. एकदा असेच एका गावाला जातांना एका मोटारसायकलस्वाराने काही शहरापर्यंत नेऊन सोडले. त्याला शहरात काही काम असल्यामुळे तो शहरात निघून गेला. मामाला जायचे ते गाव फार दूरवर नव्हतेच. परंतु पायी जाणेही शक्य नव्हते. सूर्य मावळतीला गेला होता. बसने जायला मामाच्या खिशात दमडी नव्हती. कुणाकडे मागणार नाही हा स्वाभिमानी बाणा. मग मामाने शक्कल लढवली. एका अडत्याकडे गेला. कडक शुभ्र पांढऱ्या कपड्यातल्या मामाला पाहिल्यावर अडत्याने विनम्रतेने स्वागत केले, बसायला खुर्ची दिली. कुणी तरी बडा बागायतदार असावा म्हणून चहाची ऑर्डर सोडली. नोकर चहा घेऊन आला. चहापाणी झाले. अडत्याने विचारले.


   "बोला मालक काय सेवा करू?"


   "एक गाडी पाहिजे होती. जरा अर्जंट होतं. शे दीडशे मुगाचे आणि शे दीडशे गव्हाचे पोते मार्केटमध्ये आणायचे होते. पण तुमच्याकडे गाडी तर दिसत नाही. असू द्या. मी दुसरीकडे बघतो." मामा.


    "असं कसं मालक, गाडी येईलच पत्ता देऊन ठेवा. गाडी आली की लगेच पाठवून देतो." अडत्या. 


    "पत्ता कशाला हवा? मी स्वतःच्या सोबतच घेऊन गेलो असतो. नोकराच्या मुलीच्या लग्नासाठी त्याला मदत करायची होती. उसाचे पेमेंट अजून आले नाही. नाही तर एवढी उठाठेव करायची गरजच नव्हती." इति मामाश्री.


    "ठीक आहे. गाडी लगेच देतो. रामा, जा रे गोपुशेठच्या अडतीवरून गाडी घेऊन ये आणि यांना देऊन टाक." अडत्याने मामाला उत्तर दिले आणि आपल्या रामा नोकराला सूचना दिली.


    "इकडे कशाला मीच तिकडे जातो. वेळ होतोय." असे म्हणत मामाश्री त्या नोकराला घेऊन गोपुशेठच्या अडतीवर गेले. तिथे एका ट्रक मध्ये बसले आणि गावाकडे निघाले. १० रुपयाच्या प्रवास भाड्यासाठी मामा १० लाखाची ट्रक घेऊन निघाले. रस्त्याने मामा ड्रायव्हर सोबत खूप मोठमोठ्या गप्पा मारत होते. आपल्या मोठेपणाचे अनेक न घडलेले किस्से त्या ड्रायव्हरला ऐकवले. गाव जवळ आला तसा मामाला विचार पडला, 'गाडी आणली परंतु पुढे काय?' अशा वेळी मामाच्या डोक्यात खूप अफलातून आयडिया जन्म घ्यायच्या. गाडी गावात आली तशी एका मोठ्या आलिशान इमारती समोर उभी राहिली. दरवाज्याला भलेमोठ्ठे कुलूप लटकत होते.


    "या बायकांना काहीच अक्कल नसते. तिकडे येतांना सांगून आलो होतो की, मी ट्रक आणायला चाललो, घरीच थांबा. तरी गेल्याच कुलूप लावून. भैया, तू गाडीतच थांब मी किल्ली तरी घेऊन येतो." असे म्हणून मामाश्री तिथून सटकले. 


    गाडीवाला तिथेच त्याची वाट पाहत थांबला. सायंकाळ झाली. शेतामधल्या बायका घरी आल्या. दारात गाडी बघून आपापसात कुजबुज लागल्या. एकीने गाडीवाल्याला प्यायला पाणी आणले आणि विचारलेच...


   "भैया, गाडी कुणी आणली आणि कशासाठी?"


    "बडा शेठ आया था. कुछ मुंग के और गेहू के थैले ले जाने है मार्केट मे." 


    "असं होय? ठीक आहे. चहा घेणार का? की काही खायला देऊ?" 


    "नको माँ जी, चायही चलेगी. लेकीन मलिक कब आयेंगे?" गाडीवाला अंधार होत चाललेला बघून काळजीच्या सुरात विचारता झाला.


    "बस येतीलच आता" असं म्हणून बाईसाहेब कामाला लागल्या. 


   एक एक करत माणसेही घरात यायला लागली. परंतु किल्ली घ्यायला गेलेला तो मालक काही येतांना दिसेना. इतक्यात त्या घराचा मालकही आला. दारापुढे गाडी उभी बघून आश्चर्याने विचारता झाला...


    "काय हो ड्रायव्हर दादा, कुणासाठी आणली गाडी आणि ती इथे कशासाठी लावली?" 


     "ये घरके मलिक खुद्द आये थे गाडी लेनेकू. मुंग के थैले ले जाने थे." ड्रायव्हर उत्तरला.


     "अस्सं? ड्रायव्हर दादा, या घरातले एकूण एक सदस्य घरी आले आहेत बघा. यातलं कुणी होतं का बघा बरं." असं म्हणून त्यांनी घरातल्या सर्व पुरुष मंडळींना बाहेर बोलावले. त्यापैकी कुणी नव्हतेच त्याला घेऊन येणारे. त्याने सगळ्यांकडे बघितले आणि नकारार्थी मान हलवली. 


    "हे बघा दादा, जो कुणी असेल तो काही तुमच्या समोर येणार नाही असं दिसतंय. कोणत्या कारणाने का होईना तुम्ही आमच्या दारावर आलात. वेळही जेवणाची झाली आहे. जेवण करा."


    सर्व पुरुष मंडळींसोबत ड्रायव्हरने जेवण केले. अजूनही किल्ली घ्यायला गेलेला माणूस परत आला नाही. म्हणून ड्रायव्हर गाडी घेऊन निघाला. 


    "ड्रायव्हर दादा, पुन्हा अशी फसगत होणार नाही याची दक्षता घ्या. आणि आता आरामात जा." घरमालकाने गाडीवाल्याला निरोप दिला. 


    मामाश्री साऱ्या अशाच उचापती करत होते, असे नाही तर कधी कधी चांगल्या उचापतीही करायचे. एकदा तर दोन भावांची भेटही घडवून आणली होती. एका गावात दोघे भाऊ होते. वडील गेल्यानंतर वाटणीवरून त्यांचे बिनसले. दोघांनीही गावातली जमीन विकून गावातून निघून गेले. वेगवेगळ्या शहरात दोघे राहू लागले. पण दोघांमध्ये कधीच संभाषण नव्हते. अगदी सुखदुःखात, मुलाबाळांच्या लग्नात, कशा कशातच दोघे एकमेकांना बोलावत नव्हते. जणू ते दोघे एकमेकांचे कुणीच नसावेत. 


    या दोघांचा संसार आपापल्या जागी अगदी व्यवस्थित चालला होता. दोघांनाही एकेक मुलगी आणि एकेक मुलगा होता. मोठ्या भावाच्या मुलाचे लग्नही झाले होते. त्याने लहाण्या भावाला लग्नातही बोलावले नव्हते. एके दिवशी मामाश्री मोठ्या भावाच्या घरी गेले. त्यांना चहा प्यायला होता. चहा होईपर्यंत काही तरी गप्पा करायच्या म्हणून मामाश्री बोलायला लागले..... 


     "परवाच पुण्याला गेलो होतो. तिथे तुमच्या लहान भावाची भेट झाली. खूप पश्चात्ताप करत होता. तुमची खूप आठवण येते म्हणाला. तेव्हा माझेच चुकले, आता कोणत्या तोंडाने त्यांना बोलू? असेही तो म्हणत होता. त्याच्या घराची वास्तुशांती आहे. त्याने माझ्या सोबत पत्रिका सुद्धा दिली होती तुम्हाला देण्यासाठी. पत्रिका द्यायलाच आलो होतो मी. इथे आल्यावर लक्षात आले, मी ती घरीच विसरलो."


    "कधी आहे कार्यक्रम? पत्ता तरी माहीत आहे का त्याचा? असेल तर सांगा. म्हणजे आम्हाला जाता येईल." भावाचा कंठ दाटून आला होता. काही का असेना भावाला पच्छाताप झाला. त्याने बोलावले तर आपण जायलाच पाहिजे.


    "पुण्याला शिवाजी नगरला उतरायचे. तिथून भोसरी जाणारी पीएमटीची बस पकडायची भोसरी बस स्टँडला उतरले की, गणपत रावांचा बांगला विचारायचा कुणीही सांगेल. येणाऱ्या २५ तारखेला कार्यक्रम आहे. आज १५ तारीख आहे. अजून १० दिवस बाकी आहेत. शक्य झाल्यास इकडे आलो तर पत्रिका नक्की घेऊन येईल. येतो मी आता." असे म्हणत चहा घेऊन मामाश्री तिथून निघते झाले. 


    "गणपतकडे वास्तुशांती आहे. त्याने आपल्याला सर्वांना तिकडे बोलावले आहे. आपल्याला जावेच लागेल."पत्नीला सांगत संपतराव वास्तूशांतीसाठी काय काय न्यावे याचा मनोमन विचार करू लागला. 


    आपला धाकटा दीर पुण्यात मोठा धंदेवाईक आहे एवढेच फक्त तिला माहीत होते. आज त्याने आठवण करून बोलावले आहे, याचा तिलाही आनंद झाला होता. 


    "जाऊ या ना. आणि हे बघा लहानी साठी छान पैकी भारीची साडी, भावोजी साठी धोतराचे पान आणि भारीचा नेहरू शर्ट घेऊन जाऊ. फार फार तर अडीच तीन हजार रुपये लागतील. मुलांसाठी ड्रेस घ्यायला तीनेक हजार रुपये घेऊन जाऊ. दोन तीन दिवस अगोदरच जाऊ. मोठा बंगला बांधला म्हणतात तर हजारभर रुपयांची एखादी छानपैकी वस्तू भेटवस्तू सुद्धा घेऊन जाऊ." ती आनंदाने म्हणाली.


    मुलांना माहीत झाल्यावर 'पुण्याला जायला मिळणार' म्हणून त्यांनाही आनंद झाला होता. दोन दिवसात सारी खरेदी झाली. पहिल्यांदा जायचे म्हणून शंकरपाळे, चिवडा बनवून घेतले. आणि संपतराव आपल्या सर्व कुटुंबासहित २४ तारखेला सकाळीच शिवाजी नगरला उतरले. मामांश्रींनी सांगितल्या प्रमाणे बस पकडून भोसरीला पोहोचले. भावाचा बंगला शोधायला वेळ लागला नाही. वेळ सकाळची असल्यामुळे गणपतराव सुद्धा घरीच भेटले. सकाळी सकाळी अचानक भाऊ कुटुंबासहित आलेला बघून त्यालाही आश्चर्य वाटले, आनंदही झाला. सर्वांनी हातपाय धुतले. बैठकीत येऊन बसले. चहापाणी झाले. मुलांनी अभ्यासाच्या खोलीत जाऊन एकमेकांची विचारपूस केली. 


     साडी, धोतर, नेहरू शर्ट, भेटवस्तू हे सर्व पाहून गणपतरावने आश्चर्याने विचारले "दादा, एवढ्या सकाळी अचानक? सर्व काही ठीक आहे ना? काही काम होते का पुण्यात?"      


   भावाने असे विचारल्यावर संपतराव आश्चर्यचकित झाले. 


    "अरे, असं कसं तुझ्या बंगल्याची वास्तुशांती आहे ना?" संपतरावांनी आश्चर्याने विचारले.


    "बंगला? वास्तूशांती? दादा. कुणी सांगितलं हे तुम्हाला? हा बंगला बांधून दहा वर्षे झालीत दादा. हां! त्यावेळेस मी तुम्हाला बोलावले नाही. त्याबद्दल मला माफ करा दादा." गणपतराव. 


    "अरे, मला तर मामाश्रींनी सांगितले. म्हणून तर आम्ही सगळे त्या तयारीने आलोय. काय म्हणावे या मामाश्रींना? नसत्या उचापती करून ठेवतात."


    "अहो, बरे झाले ना. त्यामुळे का होईना आपली सर्वांची भेट झाली. चला हा बंधुभेटीचा सोहळा साजरा करूया." गणपतरावांची पत्नी म्हणाली. 


    दोन दिवसांनंतर संपतरावांचा परिवार परत जाण्यासाठी निघाला. गणपतरावने या सर्वांसाठी कपडे घेतले. पुन्हा कधीतरी निवांत आठ दहा दिवसाचा वेळ काढून या म्हणून सांगितले. निघतांना दोघे भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडून बराच वेळ रडत होते आणि सर्वजण ते बघून बाकीचे सर्वजण रडत होते. गणपतरावने आपल्या चारचाकीमध्ये सर्वांना शिवाजीनगरला नेऊन बसमध्ये बसवून दिले. 


    असे हे उचापती करणारे मामाश्री आज पुन्हा गावाला एक नवीन चटका लावून शेवटच्या प्रवासाला निघाले होते कधीही परत न येण्यासाठी.


Rate this content
Log in