Shobha Wagle

Others

5.0  

Shobha Wagle

Others

गुरुचे महत्त्व

गुरुचे महत्त्व

3 mins
1.2K


"अरे ईश, काय चाललयं तुझं? शाळेची बॅग झाली की नाही भरून?" 

"बॅग भरली गं आजी. एक ग्रीटिंग कार्ड बनवतो माझ्या टिचर करता."

"वाढदिवस आहे का तुझ्या टिचरचा?"

"हो, तसंच म्हण हवं तर"

"म्हणजे?"

"अगं आजी, उद्या गुरुपौर्णिमा आहे ना? म्हणून माझ्या गुरुप्रती मी कृतज्ञता व्यक्त करणार आहे." 

"वाह! छान हं. पण गुरु, गुरुपौर्णिमा ह्या बद्दल काही माहीत आहे का?"

"जास्त माहिती नाही. पण एवढं कळलंय की जी कोणी व्यक्ती आपल्याला ज्ञानार्जन करते त्यास गुरु मानावा"

"बरं,बाळ. आता आटोप लवकर आणि झोप. उद्या शाळेतुन आल्यावर मी सांगेन हं तुला गुरु आणि गुरुचे महत्त्व.'

असे सांगून आजी झोपायला गेल्या आणि थोड्या वेळाने ईश ही झोपायला गेला.


दुसऱ्या दिवशी आजी ईशला आदल्या रात्री सांगितलेले विसरुन गेल्या. त्या आपल्या रोजच्या कामात मग्न राहिल्या व ईश ही आपला गृहपाठ करण्यात व्यस्त झाला. पण ईश ती गोष्ट विसरला नव्हता. रात्री झोपायच्या वेळी आजी त्याला अधून मधून गोष्टी सांगायची. "आजी आज दुपारी तू मला गुरुबद्दल सांगणार होती ना, ते आता सांग ना गं"

"असं होय. बरं ऐक."

"आज सकाळी तू आई वडीलांना नमस्कार केला होता का? नाही ना? 

अरे, जन्म देणारी तुझी माता पहिला गुरू असते. चालायला, बोलायला लागला की तुझ्यावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका. खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे, त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे. त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरू पूजन. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत, तसेच सद्शिष्य ही आहेत. ह्या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत.


"सद्गुरू सारीखा असता पाठीराखा ।

इतरांची लेखा कोण करी ॥'


गुरूकृपेनेच शिष्याला मोठे पाठबळ मिळते व तो मोठे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण करू शकतो. म्हणून हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करून, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करून आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो


गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।


या श्लोकात गुरुला वंदन करून गुरुला देवतुल्य दर्जा दिला आहे. या दिवशी शिष्याने गुरुला गुरुदक्षिणा देण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी शाळेमध्ये पण विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात. एखादी भेटवस्तू देतात. ह्या जरी बाह्य खुणा असल्या तरी खरी खूण म्हणजे शिष्यानं गुरूंना पदस्पर्श करुन केलेले वंदन. गुरूवंदनात, गुरूनमनात, शरणांगत भाव हवा, कृतज्ञता हवी.

 

प्राचीन काळापासुन गुरुशिष्यांची परंपरा चालत आली आहे. उदाः अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य इत्यादी. या दिवसाची आठवण म्हणूनच आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव-देवता ह्यांना जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा थोडे अधिक महत्व गुरूला देतो. आजच्या दिवसाला गुरुपौर्णिमा, आषाढ पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात. भारतीय संस्कृतीचे शिल्पकार, चार वेद विभाजन करणारे, महाभारत सर्व श्रेष्ठ ग्रंथ रचयीता, महर्षी व्यासमुनी पूजन या दिवशी करतात म्हणून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात.


पहिला आपला गुरु आपल्याला जन्म देणारी माता, त्यानंतर देव देवतांना जेवढे महत्व देतो त्याहुन थोडे जास्त महत्व आहे ते गुरूला. गुरू आणि सद्गुरूमुळेच आपल्या जीवनाला जडण घडण व आकार मिळतो. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा. गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. ह्या दिवशी शाळेत, कॉलेजात, मठ- मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमात, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आज व्यास मुनींना स्मरून त्यांची पूजा करून सर्वांनी गुरुचा कृपा आशिर्वाद घ्यायचा असतो."


"आजी किती छान सांगीतले गं! आता रोज मी आई,बाबा, तुला आणि मला ज्ञानार्जन देणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती आदराने श्रध्दापूर्वक वंदन करीन"

"असा वागलास तर बाळा खूप मोठा होऊन नाव लौकिक मिळवशील. चल झोप आता. उद्या शाळेत जायचं आहे ना?"

"अगं आजी उद्या रविवार आहे ना?"

"अरे हो! हं आता झोप आणि सांगितल्या प्रमाणे वाग हं"

"हो आजी" 

असं म्हणून आजी आणि नातू लगेच झोपी गेले.


Rate this content
Log in