गुरु
गुरु
गुरु विना भिकारी, ना मिळे ज्ञानाची शिदोरी.
जपण्यास संस्काराची साथ, धरावा गुरुजनांचा हात.
जन्मल्यानंतर डोळे उघडताच, समोर दिसणारी आपली पहिली गुरु, म्हणजे आपली माता जननी. लहानाचे मोठे करताना संस्कारांची शिदोरी ती आपल्याला देत असते. मार्गदर्शक बनून आपल्याला जीवनातले खाच-खळगे पार करून, जीवन जगण्यास प्रोत्साहित करते. अशा गुरूंचा हात कधीच सोडू नये.
गुरु शिवाय ज्ञानाची शिदोरी देखील मिळत नाही. आपले गुरु नेहमी योग्य मार्ग दाखवतात. आज आपल्या गुरुजनांना मुळे आपण आयुष्यात पुढे वाटचाल करत आहोत. कधी कठोर होऊन, तर कधी आपुलकीने गुरु नेहमी शिष्यास योग्य मार्गावर चालण्यास सांगतात.
जेव्हा काही कारणाने आपणास योग्य निर्णय घेता येत नसेल, तेव्हा गुरूच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. अशा गुरुंना पूज्य मानून त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्याची वाटचाल चालू ठेवावी. कठीण परिश्रम करण्याची सवय लावण्यापासून ते आयुष्य सुखकर बनवण्या पर्यंत गुरूंचा वाटा सर्वात मोठा असतो. नेहमी गुरुजनांना आदर देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञतेने व्यक्त व्हावे.
आज पावलोपावली आयुष्याच्या वाटेवर गुरू भेटतात. चांगल्या-वाईट अनुभवाने जीवन जगण्यास प्रोत्साहित करतात. गुरुच्या आज्ञेचे पालन करावे. नेहमी गुरूंच्या संगतीत राहावे. जेणेकरून आयुष्याच्या काळोखात गुरु, ज्ञानाच्या प्रकाशाने, आपले भविष्य उजळून देतील.
