Sagar Bhalekar

Others

4.5  

Sagar Bhalekar

Others

गोवा- एक अद्भुत सफर

गोवा- एक अद्भुत सफर

5 mins
433


              गोवा म्हणजे गोमंतक हे तर पर्यटकांचे नंदनवन! लहानांपासुन ते मोठ्यापर्यंत, देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ घालणारे ठिकाण म्हणजे गोवा. हिमालयाचे वेड असणारे जसे पर्यटक असतात तसेच सुमुद्रकिनाऱ्याचे वेड असणाऱ्या पर्यटकांचाही वर्ग खूप मोठा आहे. गोव्याची खासियत म्हणजे इकडे सर्व प्रकारचे पर्यटन आहेत. गोव्यात मंदिरे, चर्च, किल्ले, सागरी किनारे, टेकड्या, धबधबे, अभयारण्य सर्व आहे. इथे पर्यटकांची हौस भागवणारी ठिकाणे आहेत. म्हणुनच गोवा हे माझे सर्वात जास्त आवडते ठिकाण आहे. बाराही महिने गोव्यामध्ये पर्यटकांची गर्दी असते. गोव्यामध्ये जाण्यास शुभकाळ म्हणजे नोव्हेंबर ते मार्च.


मला ऑफिसला ३ दिवस सुट्टीअसल्याकारणाने ह्यावेळी फिरायला कुठेतरी लांब जायचं असा विचार केला. तेव्हा गोव्याच नाव समोर आलं. गोवा म्हटलं तर समुद्रकिनारे हे आलेच. रोजच्या कामांमधून थोडं निवांत कुठेतरी फिरावं असं सारखं वाटायचं. चला लागलो मग गोव्याला जायच्या तयारीला. अखेर गोव्याला जायचा दिवस आला. मी कोकणकन्या एक्सप्रेस ठाण्याहून रात्री ११ वाजता पकडली. नोव्हेंबर असल्याकारणाने गाडीला प्रवासांची खूपच गर्दी होती. माझी विंडो सीट असल्याकारणाने मला झोप येणार नव्हती कारण माझं सारखं लक्ष खिडकीच्या बाहेर रम्य निसर्ग बघण्यामध्यें जाणार होते. थंडी तर खुपच वाजत होती. अखेरीस मी गोव्याला सकाळी ९ वाजता थिवीम ह्या स्थानकावर पोचलो. थिवीम पासून कलंगुट बीच खूप जवळ असल्याकारणाने बहुतांशी प्रवासी इथेच उतरतात, आणि इकडून मग टॅक्सी, कार घेऊन जातात. मी स्टेशनवर उतरून टॅक्सी केली आणि निघालो माझ्या हॉटेलच्या ठिकाणी.


माझं राहायचं वास्तव्य नॉर्थ गोवामधील बार्देझ ह्या गावी होत. हॉटेल राही कोरल. इथून कलंगुट बीच सुमारे २ km च्या अंतरांवर होत. रेल्वेच्या प्रवासांमधून इतका थकून गेलो होतो की फ्रेश होऊन लगेच झोपी गेलो. मनात एक विचार आला की गोवा म्हटलं की मासे हे आलेच. संध्याकाळी लगेच फ्रेश होऊन बीच वर गेलो.बीचवर गेल्यावर मन खूप प्रसन्न झाले. चोहोबाजूनी निळाशार पाणीच पाणी. सुंदर व स्वछ समुद्र. वाळूमध्ये अडकून पडलेले शिंपल्या. आजूबाजूचे वातावरण खूपच सुंदर व मनाला भेदून जाणारे होते.कॅलंगुट हे उत्तर गोव्यातील एक शहर आहे, जे समुद्रकाठसाठी प्रसिद्ध आहे. हा समुद्रकिनारा उत्तर गोव्यात सर्वात मोठा आहे आणि हजारो देशी व आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी ह्या समुद्रकिनाऱ्याला भेट दिली आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात कलंगुट बीचवर लोकांची येण्या-जाण्याची गर्दी खूप असते. जून ते सप्टेंबर दरम्यान सुमुद्र खडबडीत असल्याकारणाने पोहण्यास मनाई असते. गोव्यात देशी-विदेशी लोकांची खूपच मौज होते.एवढा खर्च करून विदेशातून लोक गोव्यामध्ये सुट्टी घालवण्यास येतात. कलंगुट बीच बघून आल्यावर मनात एक विचार आला, किती स्वछ, सुंदर आणि किती साफ, निळाशार समुद्र.नाहीतर मुंबईमध्ये समुद्रात लोक घाण करून कचरा करतात. रात्रीचे १० वाजता जेवून हॉटेलवर आलो आणि खूप थकल्यासारखे वाटल्याने लवकरच झोपी गेलो.


दुसऱ्यादिवशी आम्हला मंगेशी मंदिर बघण्यास जायचं होत. असं म्हणतात की हे लता मंगेशकर ह्याच मूळगाव. हॉटेल मधून १७ सीटर बसने आमचा प्रवास सुरु झाला. माझ्या हॉटेलपासून मंगेशी मंदिर ४० मिनिटाच्या अंतरावर होते. हे मंदिर गोव्यातील सर्वात मोठं आणि वारंवार ह्या मंदिराला भेट देणाऱ्या लोकांची संख्याही खूप जास्त आहे. २०११ मध्ये ह्या मंदिराने परिसरातील लोकांसाठी ड्रेस कोडची स्थापना केली. शॉर्ट कपडे इथे चालत नाही. जर कोणी शॉर्ट कपडे घातलेच तर इथे लुंगी देण्यास येते. गोव्यातील बहुतांशी मंदिराप्रमाणेच मंगेशी मंदिराची पूजा मोठ्या संख्येने केली जाते. दररोज सकाळी षोडशोपचार पूजा, अभिषेक, लाघरुद्र आणि महारुद्र असे केले जातात. यानंतर दुपारी महाआरती व रात्री पाचोपचार पूजन होते.दर संध्याकाळी आरतीच्या अगोदर मंगेशी मूर्तीची संगीतासह पालिखीमधून मिरवणूक काढली जाते. मंगेशी मंदिर मध्ये सर्व उत्सव साजरे केले जातात. रामा नवमी, अक्षय तृतीया, अनंत वृतोत्सव, नवरात्रि, दसरा, दिवाळी, माघा पौर्णिमा उत्सव (जत्रोत्सव) आणि महाशिवरात्री यांचा समावेश आहे. मंदिराच्या आर्किटेक्चरमध्ये अनेक घुमट आहेत. मंदिराच्या आवारात एक प्रमुख नंदी वळू आणि एक सुंदर सात मजली दीपस्तंभ आहे. मंदिरामध्ये एक भव्य पाण्याची टाकी आहे, जो मंदिराचा सर्वात जुना भाग असल्याचे मानले जाते. एक प्रशस्त सभागृह आहे त्यात ५००हून अधिक लोक राहू शकतात. त्या सजावटीमध्ये १९ व्या शतकातील झूमरांचा समावेश आहे. सभागृहाचा मध्य भाग गर्भा गृहाकडे नेतो जिथे मंगेशची प्रतिमा पवित्र केली जाते. जवळ जवळ संपूर्ण मंगेशी मंदिर बघेपर्येंत आम्हला निदान ३ तास लागले. दुपारच्या १ च्या आसपास ड्रायव्हरने बस एका धाब्यावर थांबवली. खूप जोराची भूक लागल्याकारणाने आम्ही लवकर बनवून होईल असा कोलम्बी भात मागविला.


भरपेट जेवल्यानंतर आमची बस बॅसिलिका ऑफ बोम जीसस चर्च इथे वळवली. हे एक रोमन कॅथॉलिक चर्च आहे. बॅसिलिका ही पोर्तुगीज भारताची राजधानी जुनं गोवा इथे आहे, आणि इथेच सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष आहे. हे जवळ जवळ ५०० वर्ष जुने आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा मृतदेह प्रथम पोर्तुगीज मलाक्का येथे नेण्यात आला आणि दोन वर्षांनंतर गोव्यात परत पाठविण्यात आले.जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक ह्या रोमन कॅथॉलिक चर्चला भेट देतात. दर दहा वर्षांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष सार्वजनिक लोकांना बघण्यास काढले जाते. हे गोवा आणि भारतातील सर्वात प्राचीन चर्च आहे. सेंट फ्रान्सिस झेवियरच्या जीवनातून घेतलेल्या दृश्यांची पेंटिंगही या चर्चमध्ये आहे. हे सर्व मनाला भेदून जाणार होत की अजूनही सेंट फ्रान्सिस झेवियर यांचं अवशेष ५०० वर्ष टिकून राहिले. त्यानंतर आम्ही चर्च मधून बाहेर पडलो. तिथेच एक जुनी बाजारपेठ आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मेणबत्ती दिसण्यात आले. ख्रिस्ती धर्मात मेणबत्तीला खूप महत्व आहे. त्यानंतर आम्ही अगुडा बीचवर गेलो. आणि खूप धमाल मस्ती मज्जा केली. हॉटेलवर रात्री आल्यावर फ्रेश होऊन आम्ही तळलेले मासे खाल्ले.


तिसऱ्यादिवशी आम्ही शांतादुर्गा ह्या मंदिराला भेट देणार होतो. शांतादुर्गा मंदिर हे गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाचे (सारस्वत मंदिर) खाजगी मंदिर आहे. शांतादुर्गा मंदिर अनेक गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबाची कुलदेवी (कौटुंबिक देवता) आहे. पुराणात शिव आणि विष्णू यांच्यात झालेल्या युद्धाची चर्चा लढाई इतकी भयंकर होती की भगवान ब्रह्माने देवी पार्वतीला हस्तक्षेप करण्याची प्रार्थना केली, जी तिने शांतादुर्गाच्या रूपात केली. शांतादुर्गाने विष्णूला तिच्या उजव्या हाताला आणि शिवने तिच्या डाव्या हातावर उभे केले आणि लढा मिटविला. शांतादुर्गा मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे उत्सव प्रसंगी सोनाच्या पालखी मध्ये महापंचमी देवता ठेवली जाते. ४ डिसेंबर रोजी शांतादुर्गा मंदिराने ४५० वर्षाचे आपले अस्तित्व पूर्ण केले. त्यानंतर आमचं गोव्यामधील फिरण्याचे शेवटचे ठिकाण म्हणजे जहाजावरील सफर. गोव्यामध्ये साध्या साध्या जलपर्यटनापासून, विस्तृत व रोमँटिक डिनर समुद्रावरील, बॅकवॉटर जलपर्यटन आणि कॅसिनो समुद्रापर्यंतचे बरेच प्रकारचे जलपर्यटन आहे. आम्ही भेट दिली ती मांडवी रिव्हरला. आम्ही तिथे पोर्तुगीज डान्स, कोकणी भाषेतील गाणी अशे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही पहिले. अखेरीस ह्या जहाजावर आमची सफर संपली.


३ दिवसांची सफर कशी गेली समजलच नाही. हा सर्व प्रवास मी माझ्या कॅमेरामध्ये टिपला, आणि परतीच्या प्रवासाला लागलो.


Rate this content
Log in