गिरनार - गिर जंगल
गिरनार - गिर जंगल
मागच्या ब्लॉगमध्ये आपण दर्शन घेतले ते कर्पुरगौर अशा, चंद्रदेवतेने स्थापन केलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे. तिथून निघून साधारण २:४५ तासांचा प्रवास करून संध्याकाळी आम्ही पोचलो ते प्रभू श्री दत्तात्रेयांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या , त्यांनी अनेक वर्षे खडतर तपश्चर्या केलेल्या गिरनार या पुण्यपावन स्थळी. गिरनार पर्वत....अतिशय भव्यदिव्य , उत्कृष्ट अशी निसर्ग संपदा लाभलेला , जैन तसेच हिंदू धर्मियांची अनेक प्रार्थनास्थळे असलेला , आजूबाजूला ऊर दडपवून टाकणाऱ्या अनेक खोल दऱ्या , घनदाट हिरवीगार झाडी , श्वापदांचा मुक्त वावर पण तरीही भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला असा हा गिरनार पर्वत , त्याच्या सुमारे १०००० पायऱ्या चढत जाऊन आम्ही दत्त शिखरावर जाऊन दत्त महाराजांचे दर्शन घेण्याचे ठरवले. माझ्यासाठी हे सगळं खूप उत्कंठावर्धक , ज्याला आजच्या भाषेत ' थ्रीलींग ' म्हणतात , असं होतं. त्याला दोन कारणं होती. प्रथम म्हणजे मी दहावीत असताना इंदोर येथील दत्त मार्गातील तपस्वी प. पू. नाना महाराज तराणेकर यांचे परमशिष्य असलेल्या जळगांव निवासी प पू. पेठकर काका यांचा आम्हां तिघांवर , मी , आई आणि बाबा आमच्यावर अनुग्रह झाला असल्याने आमचा दत्त मार्गात प्रवेश झाला होता. त्यामुळे आपले अधिष्ठान असलेल्या दत्त महाराजांचे निवासस्थान पाहण्यासाठी , त्यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो आणि दुसरं म्हणजे आजपर्यंत मी पाहिलेल्या धार्मिक स्थळांत ' गिरनार ' हे स्वतःचं वेगळेपण जपणारं एक निराळंच तीर्थक्षेत्र मी पाहिलं होतं.
संध्याकाळी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका धर्मशाळेमध्ये आम्ही खोली घेतली. तिथल्या मॅनेजरसोबत चर्चा करून बाबांनी दत्त शिखरावर कसे पोचायचे, पर्वत चढत असताना मधल्या मार्गात असणारी खाण्यापिण्याची दुकानं इत्यादींची माहिती घेतली. पहाटे ६ वाजेच्या सुमारास आम्ही दत्तप्रभूंचे नाम घेऊन गिरनार चढाईस सुरुवात केली.
नुकतंच उजाडू लागलं होतं. त्यामुळे आसमंतात गुंजणाऱ्या पाखरांच्या किलबिलाटाने भवतालच्या विश्वाला हळूहळू येणारी जाग , दैनंदिन दिनचर्या सुरू करण्यासाठी माणसांची चाललेली लगबग ,अंगाला झोंबणारी गुलाबी थंडी , ' अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ' चा सर्वत्र घुमणारा गजर , दत्त शिखराकडे जाणाऱ्या कधी पक्क्या तर कधी कच्च्या पायऱ्या , चढाई करून दमलेल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी अधूनमधून थाटलेली लिंबू सरबत , चहा - कॉफी यांची छोटी छोटी दुकानं असं सगळं मन प्रसन्न करणारं वातावरण पाहून मला खूपच मज्जा येत होती. माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक असं देखील माझ्या गिरनार यात्रेला आपण संबोधू शकतो. आई बाबांपेक्षा अर्थातच माझा पायऱ्या चढण्याचा वेग खुपच जास्त होता. बऱ्याचदा असे व्हायचे की मी त्यांच्या कितीतरी पुढे निघून जायचे आणि ते येईपर्यंत त्यांची तिथेच वाट बघत बसायचे.
थोडे चालणे , थोडे थांबणे , मध्येच ' एनर्जी ' साठी लिंबू सरबत घेणे असे करता करता ९००० पायऱ्या आम्ही ५ तासांत म्हणजे ११ वाजेपर्यंत पार केल्या होत्या आणि अंबाजी मंदिरात देवीचे दर्शन घेतल्यानंतर आता आम्हाला खुणावत होते ते आणखीन केवळ ९९९ पायऱ्या पार करून गेल्यानंतर दृष्टिपथात येणारे दत्त शिखर. मनात दत्त गुरूंच्या भेटीसाठी अतिशय व्याकूळ असे भाव निर्माण झाले होते. कधी एकदा ते चरण या नेत्रांना दिसतील असे झाले होते. त्यामुळे वेळ न दवडता आम्ही गिरनार चढाईच्या अखेरच्या टप्प्यांत पोचलो व ९९९ पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. दत्त गुरूंचा आमच्यावर झालेला विशेष कृपाप्रसाद म्हणजे आम्ही दुपारी बरोब्बर १२ वाजता दत्तगुरुंच्या स्थानी पोचलो होतो. तो क्षण आला अन् माझ्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. आपली पात्रता नसताना देखील जेव्हा आपल्या पदरात आपल्या पुण्य संचयामुळे तो भगवंत अमाप समाधानाचे , कृपेचे दान घालतो ना , तेव्हा त्या क्षणी आयुष्यातल्या सगळ्या वासना , सगळ्या अपेक्षा , सगळी हाव नष्ट होते अन् मागे उरतो तो केवळ त्याच्या कृपादृष्टीचा दरवळणारा चंदनासारखा सुगंध.
दुपारची आरती करून , प्रसाद घेऊन आम्ही खाली उतरलो अन् अंबाजी मंदिर परिसरात थोडा विसावा घेतला. मनासारखे आणि मनभरून दर्शन झाल्यामुळे थकवा असा जाणवतच नव्हता. साधारण ३ वाजेच्या सुमारास आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली अन् संध्याकाळी ६ वाजता आम्ही पुन्हा पायथ्याशी पोचलो.
दुसऱ्या दिवशी आम्ही गिरनार सोडले अन् तिथून ६९ किलोमीटर असलेल्या गीरच्या जंगलाची सफर करण्याचे ठरवले. गीरचे जंगल हे विशेषकरून सिंहांसाठी राखीव आहे. अतिशय निबीड असे हे अरण्य पाहण्याची उत्सुकता मनाला स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे आम्ही त्या दिशेने कूच केली अन् २:३० तासांत तिथे पोचलो. गीर नॅशनल पार्कने पर्यटकांसाठी जंगल सफारी करण्यासाठी एका विशेष बसची व्यवस्था केलेली आहे. त्याचे तिकीट घेऊन आम्ही निघालो अरण्य नजारे धुंडाळण्यासाठी.
आजूबाजूला केवळ घनघोर रान पसरलेले, मधूनच ऐकू येणारा मोर - लांडोर यांचा केका , वैविध्यपूर्ण पक्ष्यांची मंजुळ गाणी , सिंहाची अंगाला दरदरून घाम आणणारी डरकाळी आणि बसमध्ये बसलेले साधारण ३०-३५ पर्यटक अशा उत्साही , काहीशा भयावह वातावरणात आमची बस निघाली. मला तर खूपच मज्जा येत होती. काही अंतर जाताच आम्हाला दर्शन घडले ते एका झाडाखाली निवांत उभ्या असलेल्या नीलगायीचे. आमच्या बस पासून खूपच जवळ उभी होती ती. करड्या रंगाची नीलगाय होती ती आणि आश्चर्य म्हणजे ती शांत उभी राहून आमच्या थांबलेल्या बसकडेच पाहत होती. बसमध्ये बसलेले पर्यटक जे तिचे फोटो काढत होते , त्यात मी देखील होते , त्यांना जणू ती फोटो काढण्यासाठी पोझच देत होती. ...असो.
पुढे गेल्यानंतर अखेर ज्या आकर्षणाचे नाव ऐकून आम्ही आलो होतो त्याचे आम्हाला दर्शन घडले. तारेचे कुंपण घातलेल्या एका मोठ्या मोकळ्या जागेत झाडाखाली सिंह आणि सिंहीणीची जोडी दुपारच्या भोजनानंतर वामकुक्षी घेत पहुडली होती. हलक्या पिवळट रंगाचे ते दोघे नर - मादी , ज्यांना दुरूनच पाहून देखील भीती वाटावी असे धष्टपुष्ट होते. बस ड्रायव्हरच्या सूचनेनुसार आम्ही गाडीत अगदी शांत बसून त्या जोडीचे निरीक्षण करत होतो परंतु कुणाच्या तरी आवाजाने ती सिंहीण जागी झाली अन् आमच्या बसच्या दिशेने तिने नजर रोखली तेव्हा प्रत्यक्ष काळ समोर उभा ठाकला असेल तेव्हा एखाद्याची जशी अवस्था होईल तशी आमची झाली होती. थोडावेळ तिथे थांबून मग आमची बस पुन्हा परतीच्या प्रवासाला अर्थात नॅशनल पार्कच्या ऑफिसच्या दिशेने धावू लागली.
