घरापासून दूर जाताना
घरापासून दूर जाताना
आज तिला जाणवतच होतं.. काहीतरी वेगळं.. एक हुरहूर, एक चलबिचल, एक अस्वस्थता.. एका पूर्णविरामाची किंवा स्वल्पविरामाची सुरूवात होणार होती.. सकाळपासून चालायला त्रास होतच होता.. पाठीमागे जास्त वाकायला लागत असल्याने पाठीवर ताण आला होता.. आज बरोबर ९ महिने ८ दिवस झाले होते.. आता कुठल्याही क्षणी बाळाच्या आगमनासाठी धावावे लागणार होते.. तिच्या आईलाही कुणकुण लागलीच असेल.. त्यामुळेच संध्याकाळी फिरायला आईने एकटीला तर जाऊ दिलच नाही पण आवाराच्या आतही मागे जाऊ नकोस, जरा बस थोडावेळ, वगैरे सूचना चालूच होत्या.. दोघी मायलेकी लवकरच घरी परतल्या..
रात्री झोपतानाही तिला वार्षिक परीक्षेच्या आदल्या दिवशी येतं तसंच दडपण आलं.. आणि शेवटी तिचा अंदाज खरा ठरला आणि पहाटे ३ वाजता म्हणजेच बरोबर ९ महिने ९ दिवसांनी तिच्या पोटातल्या अंकुराने कळी उमलण्याचे संकेत दिले..
काही दिवसांनी ती दवाखान्यातून पिल्लाला घेऊन घरी आली तेव्हा तिला आठवला तो प्रवास.. नऊ महिन्याची गरोदर ती घरापासून दूर दवाखान्यात गेली तेव्हापासून आपण सुखरूप पुनर्जन्म घेऊन आयुष्यातला परमानंद आपल्या सोबत घेऊन आलो तेव्हापर्यंतचा.. आणि समाधानाने ती भरून पावली.. डोळे झरायचे थांबत नव्हते पण ते आनंदाश्रू होते...
