गावाकडचा जिव्हाळा
गावाकडचा जिव्हाळा
गावातील ती प्रसन्न सकाळ... पहाटे कोंबड्याचे आरवणे.... मंदिरातील काकड आरतीचे ते मधुर स्वर....वासुदेवाचे गाणे...गोठ्यात गायीवासरांचे हंबरणे....खुरखडयातून बाहेर पडण्यासाठी कोंबड्यांच्या चाललेल्या धडपडी...शेतकरी दादाची शेतावर जाण्यासाठी लगबग...काय आणि किती सांगायचे....सकाळी लवकर उठून खराटा हातात घ्यायचा आणि सगळ्या परड्यातलं,गोठ्यातलं झाडून घ्यायचं..गुरांच्या धारा काढून झाल्यावर दूध डेअरी मधे पोचवायचे..माघारी आल्यानंतर नदीवर पोहायला जायचं ....किती मज्जा होती....
येतील का ते दिवस पुन्हा.... गावाकडची माया करणारी...एकमेकांना साथ देणारी... मदतीसाठी धावून येणारी माणसं... सगळं कसं आता डोळ्यासमोर तरंगत आहे... एखादी नावडती आमटी, भाजी असेल तर शेजारच्या काकूंकडे जायचं पळत पळत वाटी घेऊन...शाळेत जाताना सगळ्याजणांनी मिळून मिसळून जायचं...हुल्लडबाजी करत.... वर्गात तास चालू असतानाच पाठीमागे बसून गप्पा मारायला भारी वाटायचं... आणि शिक्षकांच्या लक्षात आले की सगळ्यानी सरसकट मारही खायचा...पण अभ्यासही मन लावून करायचा...पाठांतर नसेल तर उलट हातावर छड्या खायच्या....
शेतात गेल्यावर ऊस,हरभरा, मक्याची कणसं, हुरडा खायला तर किती अप्रुप वाटायचं... पावसाळ्यात रानातल्या मातीचा दरवळणारा सुगंध मनाला मोहून टाकायचा... रानावनात हिंडत पावसात भिजायची मजाही काही औरच.....चिंच, बोरे, आवळे असायची सोबत लज्जत वाढवायला....थंडीच्या दिवसांत सकाळी, संध्याकाळी शेकोटी करायची...
शेकायला येणाऱ्या प्रत्येकाने सासू(शेकोटी साठी गवत,पालापाचोळा)आणायच...मगच शेकायला यायचं... शनिवारी, रविवारी, सुट्टीच्या दिवशी स्नेह भोजनाचा बेत आखला जायचं...कुणी कांदा, कुणी चटणी, तेल कसं काही लागणारे साहित्य प्रत्येकाने आणायचे....जवळपास कुठल्याही शेतातील पावट्याच्या(वरण्याच्या)शेंगा आणायच्या... सोलून तिथेच शेतात चूल घालून भात शिजवायचा...गरमागरम भातावर ताव मारायचा... वडाच्या झाडावर झोके घ्यायचा... सूरपारंब्या खेळायच्या...दिवसभर धिंगाणा घालून अंधार व्हायला आला की घरी यायचे..रात्री कधी झोप लागत कळायचं नाही....
असाच एक किस्सा सांगते... जो मी कधीही नाही विसरू शकणार...आम्ही तिघी मैत्रीणी...राजश्री, जयश्री आणि सविता (मी) दर सुट्टीत आमचा काही ना काही उपद्व्याप चालू असायचा...कधी कुणाच्या बागेतील झाडे पळवून आण...कधी फूल तोडून आण...दारात आंब्याची झाडे असायची.... पण दुसऱ्याच्या बागेतील आंबे तोडून आणायला मज्जा वाटायचं.... असच एकदा रविवारी सुट्टीच्या दिवशी सगळे शेतावर गेल्यावर आम्ही चिंच आणायला जायचं ठरवलं.... लाल चिंच... म्हणजे कच्च्या असताना लाल दिसतात...
गेलो झाडाकडे.... शेजारी मोठी विहीर होती... अलीकडे शेत,बांधावर चिंचेचे झाड..आणि पलीकडे ओढा. असपण आम्ही न सांगता गेलो होतो... त्यामुळे एकजण कुणी येते का बघायला खाली थांबली.. आम्ही दोघी झाडावर... चांगल्या एक ठिके भरून काढली चिंच... घरी आलो... तिघींनी वाटून घेतलं... आपापल्या घरी लपवून ठेवली.... पण जयश्रीच्या आईला सापडल्या....आता काय...चोरी पकडली.... कुठुन आणली विचारले...सांगितल्यावर मात्र सगळ्यानी डोक्यावर हात मारून घेतले... अहो का म्हणून काय विचारता?चिंच आणली तिथे जो ओढा होता त्याच्या पलीकडे स्मशानभूमी होती...आणि ती विहीर...त्यामधे एका महिलेने आत्महत्या केली होती... सुरखीची विहीर म्हणायचे सगळे... म्हणजे एकंदरीत काय तर तो परिसर भुताटकीने भारावलेल्या होता... असं लोकांना वाटायचं.... कितपत खरं होते माहिती नाही... पण आम्हा तिघींना मात्र पाचावर धारण बसली....पुन्हा फिरून मात्र कधीच कुठेही उपद्व्याप करायला गेलोच नाही. कशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या सतत गावची आठवण करून देतात.
आणखी एक राहिले... सगळ्यात अविस्मरणीय आठवण... स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवशी गावातून निघणारी प्रभातफेरी... हातात तिरंगा ध्वज घेऊन... भारत माता की जय असं म्हणताना जो गर्व वाटत होता.. तो काही औरच. मग शाळेत येऊन राष्ट्रगीत, समूहगीत व्हायचे... तिरंगा फडकविला जायचा...आणि खाऊ वाटप..
अजूनही आठवतात ते शाळेतील दिवस...
वाटते.... वाटे पुन्हा लहान व्हावे...
शाळेच्या आवारी जावे...
नटखट, अल्लड ते बालपण...
गावी जाऊन नव्याने जगावे.