एस.टी बस
एस.टी बस


थोडसं स्वतशी... थोडसं सामाजिक वर्तुळाच्या आत तो विचार मग्न झालेला होता. काय चुकलं... या पेक्षा कुठे चुकलो याच विचाराने तो हैराण झाला. सकाळ पर्यंत आपण स्वत:ला क्वालीफाईड, युवा नेक्ट्स चा आदर्श समजत होतो परंतु एका प्रसंगाने स्वतःतील अस्थिर स्वभावाची त्याला जाणिव झालेली होती.
बाईक पिटाळून तो रोज दमतो म्हणून आज त्याने शासनाच्या सेवेचा आनंद घ्यावा म्हणून सरळ बस गाठली. गर्दीच्या शहरात कपड्यांप्रमाणे माणसेही बस मध्ये पिंजुन निघतात इतकी गर्दी. बर्याच प्रयत्ना नंतर पाय ठेवायला जागा मिळाली याचा अर्धवट पुसटसा आनंद होताचं. आज कंपनीच्या दुसर्या युनिट भेट द्यायची होती म्हणजे रोजी रोटीच्या कामाला जायच होतं इतकचं.
थोड्या वेळाने गर्दीतून अचुक वाट काढतांना एक व्यक्ती येतांना त्याला दिसला. खाकी कपडे घालणारा प्रत्येकच पोलीसच असतो असा काही गैरसमज नसतोचं. तरीही त्या कंडक्टरची शिफातीने तिकीट मशीन सांभाळून प्रवासी तिकिटाच्या पैश्यांनी भरलेली ती बँग सांभाळन म्हणजे ट्रेकिंग सारखचं. कुणाला ही धक्का लागू नये हा त्याचा पहीला स्वतःच्या बाबतीतला बचाव.
"तिकीट... तिकिट" म्हणत तो एक एक प्रवासी पार करत अंशुल पर्यंत पोहोचला. तिकीट म्हणताच अंशुल ने १०० ची नोट काढुन दिली. "एक एम.आय. डी. सी"
तेवढ्यात त्याला कुणाचा तरी काँल आला. खर तर हल्ली नळ वेळेवर येणार नाही, पण टेलीकाँम कंपनी चे डोके पिकविणारे काँल्स ठरलेले. पण हा काँल बहुतेक ह्रदयातल्या कप्प्यातल्या पाहुण्याचा असावा. इतक प्रेमान आणि या कानाच त्या कानाला ऐकू न जाव इतक्या सायलेंट मोडवर तो बोलत होता. त्या दरम्यान कंडक्टर ने तिकीट त्याचा स्वाधीन केलं व तो पुढल्या प्रवाशी अन तिकिट मोहीमेवर सवार झाला.
एक दोन स्टाँप गेले असतील गर्दी जरा कमी होत होती. मघा पासून पिंजलेले पाय सैल होऊ लागले. पुढला स्टाँप आला.
"एम.आय. डि.सी., चला चला एम.आय. डि. सी वाले उतरा."
अंशुल उतरला आणि कंडक्टरच्या खिडकी जवळ येऊन बाहेरुन थांबला.
"काय साहेब काही राहीलं कां गाडीत?"
"नाही राहील काही, पण तुमची नितीमत्ता इमानदारी मात्र ठेवून आलात वाटत ड्युटीवर येतांना घरी?"
"अहो साहेब काय झालं.. काही कळत नाहीये मला. अन अचानक इतके गरम कां झालात?"
"माज चढला सार्यांना सरकारी नोकरी चा.. प्रवाश्यांच्या कष्टाचे पैसे खाता काय रे भ्रष्टांनो?"
"साहेब चुकल काय हो? तस काही असेल तर सांगा पण असे चिडू नका."
"मला शिकवतो काय रे, एम. आय. डि. सी ची तिकीट ३० रुपये ना? मग तूम्ही मला उरलेले तिकिटाचे पैसे परत कां नाही दिलेत आणि वरुन मला म्हणताय कसे; शांत व्हा."
ऐवढ्यात आजूबाजूची आणि बस मधली इतर प्रवासी मंडळी चपापली. काहींनी तर सुरात सुर मिळवून आपलाही पाठींबा जाहीर केला.
अंशुल पुरता रागाने भनभनतं होता. तो कंडक्टरच्या काँलर पकडायला वर चढला. तेवढ्यात ड्रायवरने हात आवरला.
"अहो.. साहेब वाद कशाला घालताय तुमचे पैसे उरलेत ना मिळतील ना.. कश्याला दिवसाची सुरवात भांडणा करुन करताय?"
"नाही तुम्ही थांबाच तुमची तक्रारच करतो विभागात, मग बसा बोंबलत घरी तिकिट तिकिट करतं."
दहा मिनीटापासून तुफान शिव्यांचा मारा होत होता तरीही कंडक्टर शांतच होता. जरा अंशुल चा जोर ओसरला
"साहेब तुम्ही मला माझ्या नोकरी विषयी भरभरुन बोललातं, पण मला अजिबात तुमचा राग नाही आला."
"कसा येणार बेशरम झालात न तुम्ही." गर्दीतून कुणीतरी पिंक टाकली.
"नाही साहेब, आम्ही बेशरम नाही. आम्ही बेशरम असतो तर या साहेबांना उत्तर केव्हाचेच मिळाले असते."
"तुम्ही लोक झोपतून उठता तेव्हा आमचा हात बसच्या गिअर वर असतो. बायको पहाटे उठून गेल्या १६ वर्षा पासून सुर्य बघण्याआधी जेवनाचा डब्बा बनवून देते. कितीही त्रास होत असला तरी आम्ही आमची झोप घड्याळाच्या काट्यासोबत उडवून देतो. गाडीचं तंत्र बिघडू नये म्हणून डोळ्याशी लपलप न करण्याचा करार करुन गाडीत बसतो."
"रोज शेकडो प्रवाश्यांची वेगवेगळी मानसिकता अनुभवतो. कुणी चिडतं तर कुणी शिव्या घालतं, पण तरी आम्हाला राग येत नाही. नोकरी आहे म्हणून नाही तर एक स्वच्छ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो."
ठमघापासून साहेब मला बोलले मला मुळीच वाईट वाटलं नाही, वाईट याचं वाटतं की कपड्यांना इस्री केली की स्वभाव, बोलीभाषा कां चुरगाळल्या सारखी होते? मनाला स्थैर्य कां राहतं नाही? आणि तुमचे पैसे मी द्यायचं विसरलो हे खरयं. परंतू माझा हेतू भ्रष्ट, खाऊ नव्हता. इतक्या प्रवाश्यांच्या घोळख्यात कधी कधी नजरचूक होते. मघा तिकीट काढल्या नंतर मी तुम्हाला उरलेले पैसे परत करीत होतो तेव्हा तुम्ही फोन वर बोलतं होता. आणि तुम्ही हाँटेल मध्ये करता तसे कीप द चेंज सारखी बोट खूण सुध्दा केली. मी तुम्हाला आठवावं म्हणून तुमच्या तिकिटाच्या मागे ७० रु. असा शेरा दिलेला आहे."
अंशुल ने खिश्यातून तिकीट काढून बघीतले तर तिकीटामागे शेरा होता. अंशुल काहीन बोलता बाजूला झाला. बस आपल्या मार्गाने पुन्हा धावू लागली.
अंशुलचा सुशिक्षित पणाचा शर्ट चुरगळलेला होता. आता त्या शर्टाचा गडद रंगही त्याला फिका दिसत होता, आणि जातांना दिसणारी बस माणुसकीच्या रंगात भिजलेली.