एकत्र कुटुंब पद्धती
एकत्र कुटुंब पद्धती
चाळीस-पन्नास वर्षापूर्वी अगदी सगळीकडे एकत्र कुटुंब पद्धती होती. अत्यंत गुण्यागोविंदाने नांदत होती. हळूहळू पाश्चात्य देशाचा परिणाम हिंदुस्थान वर होऊ लागला आणि लोकसंख्येवर नियंत्रण या सबबीखाली किंवा देशाची लोकसंख्या वाढली तर भविष्यात अन्न, वस्त्र, निवारा या बाबतचे प्रश्न निर्माण होतील या भीतीपोटी कोणत्याही धर्म ग्रंथात नसलेल्या सर्वप्रथम हम दो-हमारे तीन, त्यानंतर हम दो -हमारे दो आणि यापलिकडे जाऊन आता हम दो हमारा एक अशी संकल्पना पुढे आली आहे.
यातून नवरानवरी एका सुखी एकत्र कुटुंब पद्धतीतून वेगळे रहायला लागले. त्यामुळे अशा विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नवरानवरी नंतर त्यांच्या घरात जन्माला येणाऱ्या चिमुकल्या बाळाच्या मनावर संस्कार करायला कोणीही मोठा माणूस नसल्यामुळे अशा विभक्त कुटुंब पद्धतीतील जन्मलेला मुलगा किंवा मुलगी एकलकोंडयासारखे जीवन जगू लागले. त्यामुळे त्याच्या सर्वच भावना संकुचित झाल्या. आणि आपल्या जीवनात आपल्यि आईवडीलाशिवाय दुसरे कोणीही मोठे नाही.
असाच त्याचा समज होऊ लागला. आईवडीलांनी जे काही घरात आणावे ते केवळ आपल्यासाठीच असते किंवा त्या आणलेल्या वस्तूवर, खाद्यपदार्थांवर आपल्या शिवाय दुसऱ्या कुणाचाही अधिकार नाही असा बालपणापासून समज झाल्याने पुढे भावी आयुष्यात सुध्दा आप्पलपोटेपणाचे व्यवहार प्रत्यक्षात दिसून येतात. त्यामुळे एकत्र कुटुंब पध्दतीतून उद्याच्या भारताच्या नागरिकांवर होणारे परिणाम, संस्कार हे संकुचित बनले आहेत. त्याऐवजी पूर्वीच्या काळी जी एकत्र कुटुंब पध्दती असायची त्यातून सहकाराची, त्यागाची, आपलेपणाची भावना एकाच कुटूंबात आपोआप जोपासली जायची.
एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एकमेकावर प्रेम केले जायचे, एकमेकांशी सौजन्याने वागले जायचे ही भावना जोपासली जायची. एका दुरडीत समजा दोन भाकरी आहेत आणि खाणारे चार जण असतील तर समान अर्धी अर्धी भाकरी वाटून खायची ही भुमिका एकत्र कुटुंब पद्धतीतून सहजपणे शिकवली जाते. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीतून मात्र बालपणापासूनच.
अशा प्रकारची आपुलकीची, परस्पर सहकार्याची भावना शिकवली जात नाही. एकत्र कुटुंब पद्धतीत प्रत्येक काम वाटले जायचे, सर्वजण प्रत्येक खाऊ वाटून खायचे, एकमेकांच्या सुखदुःखात सामील व्हायचे. एकत्रित कुटुंब पद्धतीत फार आनंद यायचा, मजा वाटत असायची. आज असे एकत्र कुटुंब पद्धती पहायला मिळत नाही हे दुर्दैव आहे!!!!!!!
