एक आठवण
एक आठवण


गेल्या ऑक्टोबर महिन्यात बऱ्याच वर्षाने गावी गेले होते. शहर आणि गाव यात जमीन आसमानाचा फरक आहे. आता गावात बऱ्याच सुधारणा झाल्यात पण मी पाहिलेल्या गावाची आठवण म्हणजे तीस चाळीस वर्षा पूर्वाची.
त्याकाळी गावात विजेची सोय नव्हतीच. रात्र झाली की सगळा काळाकुट्ट अंधार. घरात ही कंदील आणि लामण दिवे. मोठ मोठाली घरे. घरात सुध्दा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला भिती वाटायची आणि त्यातून मी जरा जास्तच घाबरट. बॅटरीचे दिवे असायचे पण आमच्या हाती ते कमीच यायचे. आमच्या गावात ग्रामदेवीचे देऊळ गावात खूपच आत आहे. आता मोटार गाड्या, बसेस, रिक्षा आहेत पण त्याकाळी चालतच जात होतो. देवीची जत्रा असायची डिसेंबर महिन्यात. जत्रा चार पाच दिवस असायची. त्यात देवीचा पहाटेचा व दुपारचा रथोत्सव असायचा. देवीला गुड्या लावून, सजवलेल्या रथात बसवून, दोन्ही बाजूने पकडून वाजत गाजत नाचवायची पद्धत होती आणि आता ही तशीच जत्रा भरत असते पण मला काही जायचा योग आला नाही.
पहाटेचा रथ म्हणजे आम्हाला एक आव्हान वाटायचे. एकदा आम्ही पहाटेच्या रथाला जायचे ठरवले. आमच्या घरापासून देवळा पर्यंतचा रस्ता त्याकाळी अगदी सुमसान असायचा. एक दोन मोठी घरे यायची मध्ये पण जास्त करून रस्ता मोकळा, फक्त लाल मातीचा. रस्त्याच्या दोन्ही बाजुला लहान मोठ्या झाडा झुडपांची गर्दी. मध्येच एक मोठे वडा पिंपळाचे झाड. आणि त्या झाडांना लावलेल्या कपड्यांच्या लाल पिवळ्या रंगाच्या लटकणाऱ्या गुढ्या. झाडाच्या बुडाशी एक लहान पेटणारी पणती. लोंबकळणाऱ्या झाडाच्या पारंब्या चालत असताना डोक्याला खाद्याला लागायच्या. दिवसा ढवळ्या आम्हाला त्या दिसत पण काळोखात दिसणं कठीण आणि त्यांना चुकवून रस्त्यावरून जाणे कठीण. त्यांचा काळोखात स्पर्ष झाला की भिती वाटायची.
त्यावेळी आम्ही सात आठ लहान मोठी मुलं पहाटे रथाला चाललो होतो. दोघांकडे बॅटरी दिवे होते. एकमेकांचा हात धरूनच चाललो होतो. आमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. समोरून एक चुडी वर खाली होत होती.(चुडी म्हणजे एका काठीच्या टोकाला घट्ट कपडा गुंडाळायचा व त्यावर तेल घालत व ते पेटवायचे. चालताना ती पेटत रहावी म्हणून हात हलवत राहायचे) काळोखात लांबून फक्त चुडी वर खाली होत असलेली दिसायची. पिंपळाच्या वडाच्या झाडांवर म्हारू, म्हणजे भुतांचा दूत, तो रात्री अपरात्री चुडी घेऊन गावात फेऱ्या मारतो आणि कधी कधी हव्या त्या माणसाच्या मानेवर बसतो असे सांगितले जात होते. असा तो मानेवर बसला तर माणूस विचित्र, वेड्या सारखा, चवताळल्या सारखा वागतो. भुताने पछाडले म्हणतो तसे. अशी चुढी दिसली की भीतीने दात वाजायचे आणि चड्डी ओली व्हायची. आता थंडी वाजतच होती त्यात चुडी आणि मगाशी येताना खाद्यांला झालेला पारंबीचा स्पर्ष. भीत भीतच चाललो होतो. मी मोठ्या भावाचा हात घट्ट पकडला होता. माझ्या बाजूने एक सफेद आकृती चालत असल्याचा मला भास झाला. मी भावाचा हात जास्तच घट्ट धरला. तरी माझी दातखिळी बसली. मला बोलता येईना. ती चुडी जवळ जवळ येत होती. तेवढ्यात माझा पाय खड्ड्यात पडला. मला सफेद फिरणाऱ्या भुतानेच धक्का दिल्या सारखे वाटले व मी खड्ड्यात पडले. भावाचा हात सुटला आणि मी खोल खोल पाताळात जात असल्याचा भास झाला व मी बेशुध्द होऊन पडले.
त्यावेळी पहाटेची जत्रा राहिली बाजूला. तो चुडीवाला आम्हा सर्वांना घेवून घरी आला. मला कांदा चप्पलचा वास देऊन शुध्दिवर आणले. मी भूत भूत करून बरेच दिवस आजारपणात घालवले म्हणे.
भुते आहेत का ह्यावर आज विश्वास नाही पण लहानपणी भुतांची भिती गावी खूप वाटायची. मोडकळलेली मोठी घरे, त्या घराची ओसाड पण कमी पाणी असलेली विहीर, जवळ असलेले बोरांचे झाड. खाली भरपूर बोरं पडलेली असली तरी एकट्यांने जाऊन वेचायची हिम्मत होत नव्हती. तिथल्या भुतानेच आम्हा मुलांना फसवायला सडा टाकला असावा म्हणून मी चार हात लांबच राहायचे.
गाडीने देवीच्या देवळात जाताना ते वडाचे झाड नजरेत आले आणि लहानपणची गोष्ट आठवली. आता गाव, गाव नाही राहिला. ते शहर होतंय पण त्याच्या माझ्या लहानपणच्या आठवणी मला त्या लहानपणच्या गावाचीच आठवण करून देतो.