Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

दृष्टिकोन आपापला

दृष्टिकोन आपापला

2 mins
262


समोरच्याला चुकीचे ठरवण्यापेक्षा , त्याचे विचार वेगळे आहेत असे मानले तर, जगातले कलह, तंटे कमी होतील.


वरील सुविचार वाचला अन् नातवाबरोबर लॉकडाऊनमधे हम बने तुम बने चे रोज बघितलेले दोन दोन भाग आठवले. एका सुखी कुटुंबाचं विनोदी चित्रण ह्यामधे असल्याने डोक्याला कटकट नाही हे जरी खरे असले तरीही ह्यातील आप्पा एखादा भाग अपवादात्मक भाग वगळता सर्व भागांमधे मुलांना काही ना काही शिकवत असतात आणि तेही चिडून!!

    प्रत्येक पिढीमधे मतपरिवर्तन होत असते. जमाना बदलत असतो. घरातील ज्येष्ठांनी त्याप्रमाणे बदलून समतोल साधायचा असतो. ह्यातील आप्पा माझं तेचं खरं असं समजणारे आहेत. मुलांची मते वेगळी असू शकतात. त्यांना वेगळी मते असण्याचा अधिकार आहे. ती मोठी झालेली आहेत, हे त्यांच्या गावीच नाही. सदैव " अरे पाणकोंबड्यांनो "असे मुलांना तुच्छतादर्शक संबोधतात. पुढच्या पिढीचे विचार ऐकून घेण्याचीही सोशिकता नसल्याने , त्यांच्या माघारी मुलेही " आप्पांनी माझी तासभर शाळा घेतली" असे खिल्ली उडवत सांगतात.

   परिवर्तन हे प्रत्येक काळात होत असते. ते वागण्यात ,बोलण्यात , रहाणीमानात होतच असते. त्याच्याशी जुन्या पिढीला जमवून घ्यावे लागते.असे जमवून घेतले तर घरात सुसंवाद रहातो. आपण आपल्या मागची पिढी आणि नवीन पिढी यांच्यामधील पूल होऊ शकतो.पण जर जमवून नाही घेतले तर पुढची पिढी सर्वच बाबतीत सबळ असते.ती तुमच्या प्रत्येक गोष्टी ऐकायला बांधील नाही. त्यांनी एखादी गोष्ट उडवून लावली तर तुम्हांला राग येतो. पुढेपुढे ते बरं बरं म्हणून तोंडावर विरोध न दाखवता , त्यांना करायचे तेच करतील , तरीही ते खटकेलच.

    ही फक्त घरीच नाही तर व्यवहारात शाळा कॉलेजात अॉफिसमधे नित्य आढळणारी गोष्ट आहे. आपण नेहमी बरोबर वागतो असे काही अहंकारी लोकांना वाटते. पण सर्वांचे विचार एकसारखे कसे असणार?समोरच्याचे विचार , मत आपल्यापेक्षा वेगळे असले तरी त्याला चूक म्हणून डावलू नये.त्याचे वेगळे विचार समजून घेण्याची सहिष्णुता आपल्यामधे हवी.चालायचंच!!काळाप्रमाणे थोडफारं बदलणारंच, अशी मनाची तयारीही हवी.नव्या पिढीशी जमवून घेण्यात शिक्षक ,प्रोफेसर ,प्राचार्य जास्त यशस्वी ठरतात कारण त्यांचा रोज युवा पिढीशी संबंध येत असतो.नव्या पिढीत होणारे बदल ते रोज बघत आसतात. त्यांच्याबरोबर जमवून घेत असतात.

   ह्या बाबतीत मला अमेरिकेत रहाणारे आपले लोक चांगल्या विचाराचे वाटले. त्यांना दुस-याचे आचारविचार नाही पटले तरी , ते त्याबद्दल तुच्छता दाखवत नाहीत. त्यांची ह्या बाबतीत मते वेगळी आहेत, असे म्हणून ते विषय संपवतात. त्यांच्याकडे कलहांचे प्रमाण कमी आहे ह्याचे कारण हा उदारमतवादही असू शकेल.

   वरील विवेचनावरून थोडक्यात परामर्श काढायचा तर , दोन व्यक्तींमधे मतभेद असतील तर समोरच्याला चुकीचा ठरवू नये. तो त्याच्या जागी बरोबर असेल ,मी माझ्या जागी बरोबर असे मनाला समजवावे. त्याचे विचार असू शकतात , माझ्यापेक्षा वेगळे. 

सुखी जीवनासाठी एकच लक्षात ठेवावे मतभेद असले तरी चालतील ,पण मनभेद कधीच नकोत.


Rate this content
Log in