दोष कुणाचा?
दोष कुणाचा?
लग्नाच्या पंधराव्या वाढदिवसाचा योग साधून अमरनाथ यात्रेसाठी जाण्याचे ठरवले होते.त्यानुसार कुटुंब व मित्र मंडळीसमवेत २६ जून २००४ रोजी झेलम एक्सप्रेसने जम्मूत पोहोचलो.पण रेल्वे स्थानकावरच खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा १५ दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे समजले.आमचा नाइलाज झाल्याने श्रीनगर,सिमला कुलू मनाली फिरण्याचा आम्ही निर्णय घेतला.फ्रेश होऊन दुपारीच जम्मूतून वैष्णोदेवी साठी कटराकडे प्रयाण केले.आम्हाला सायंकाळी पाचचे आत वैष्णो देवी दर्शन पास वेळेत ताब्यात मिळाला.अमरनाथ यात्रेसाठी पायी चालण्याचा सराव केल्याने सायंकाळी ७ वाजता वैष्णोदेवी गड चालण्याचा निर्णय घेतला.प्रवासाचा पहिला दिवस असल्याने जोश व हुरुप असल्याने 'जय मातादी' चा जयघोष करत इतर भाविकांच्या सोबतीने मार्गक्रमण सुरू होते.थंडी बिलकुल नसल्याने आल्हाददायक वातावरनात विश्रांती घेत रात्री १ वाजता मंदिराजवळ पोहोचलो.मध्यरात्र असली तरी भाविकांची गर्दी होती.रांगेने निवांतपणे दर्शन घेतले.तद्नंतर प्रसादाचा आस्वाद घेऊन थोडी विश्रांती घेताच आम्ही लागलीच गड उतरायचा निर्णय घेतला.
परतीचा प्रवास चंद्र प्रकाशात हळूहळू सुरु होता.थकल्या शरीरास थंड आल्हाददायक हवा सुखावत होती.भाविकांची वर्दळ फारच कमी झाली होती.देवीचा जयघोष देखील थंडावला होता.सर्वत्र निरव शांतता व रात किड्यांचा गजर आणि काजव्यांचा चमचमाट सोबतीला होता.पायऱ्या उतरतांना पिंढऱ्या दुखत होत्या. स्त्रियां व मुलांचे पाय दुखत होते.त्यामुळे जागोजागी बसत विसावा घेत प्रवास सुरु होता.
इतक्यात लांब अंतररावर लहान मुलांचा रडण्याचा आवाज कानावर आला.सुरवातीला असेल कोणाचे तरी बाळ असे वाटले.पण जसा रडण्याचा आवाज स्पष्ट कानावर येऊ लागताच आमची अस्वस्था व हळहळ वाढली. मी आवाजाच्या दिशेने अंधारात मागे फिरून पाहिले तर एक स्त्री एका हातात मोठी पिशवी अन दुसऱ्या हाताने चार ते पाच वर्षाच्या मुलीस अक्षरशः फरफटत घेऊन चालली होती.अर्थातच त्या मुलीचे पाय नक्कीच दुखत होते व ती कडेवर घ्यावे म्हणून आकांताने रडत होती.पहाटेच्या शांत वेळेत त्या निर्दयी आईचे कृत्य पाहून माझ्या मनाची भयंकर घालमेल झाली.मी त्या स्त्रीस हिंदीतून बाळाला कडेवर घेणेबाबत बोललो.पण ती बाई मुलाच्या रडण्याकडे व माझ्या बोलण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत पुढे चालली होती.त्यामुळे तर त्या बाईवर मी अक्षरशः खेकसलो. तसे त्या बाईने केवळ नाइलाजाने मुलीला काखेत घेतले.यामुळे त्या मुलीचे रडणे तात्काळ थांबले अन मलाही थोडे हायसे वाटले.पण त्या बाईच्या मागोमाग एक वृध्द हातात दोन-तीन पिशव्या घेऊन येत होता.मी त्या बाईवर संतापल्याचे पाहून मला म्हणाला,"इस बच्चीकी माँ तो पिछे फॅमिलीके साथ आ रही हैं I इस कामवाली औरत पर गुस्सा करणेसे क्या होगा?" हे ऐकताच मीही एकदम ताळ्यावर येत अंतर्मुख होऊन विचार करू लागलो. इतक्या लांबच्या रात्रीच्या प्रवासात पोटच्या मुलीस कामवाल्या बाईकडे सोपवून ती कशी निर्धास्त राहू शकली?मुलीच्या त्या आकांतास कोण कारणीभूत?ती कामवाली बाई की तिची बेफिकीर आई?की या परिस्थितीत भरडली जाणारी निष्पाप मुलगी? पुढील माझ्या सर्व प्रवासात हेंच प्रश्न मला भेडसावत राहिले.
