Deepali Rao

Others

3  

Deepali Rao

Others

देवबाप्पास पत्र...

देवबाप्पास पत्र...

2 mins
613


प्रिय देवबाप्पास,

देवळातले पुजारी काका म्हणतात, देवापुढे उभं राहिलं हात जोडून की त्याला मनातलं सगळं कळतं बरोब्बर. मी खूप वेळा बोललो मनात बाप्पा पण तुझं काही उत्तर येईना. तु ही बिझी असशील कामात.

मग म्हणलं पत्रच लिहावं तुला.


बाप्पा त्या रात्री खूप पाऊस पाडलास....मी,आई आणि बाबा झोपलो होतो. अचानक घरात पाणी शिरायला लागलं. घाबरूनच जागे झालो. पाऊस जोर धरत होता..अन् पाण्याची पातळी वाढायला लागली. आम्ही तिघेही मग कपाटावर चढून बसलो. मी आईच्या कुशीत गुरगुटून होतो... घरातल्या पावसाचं तांडव पहात....


केव्हातरी गोष्टीत वाचलं होतं.... पापं वाढली जगात की प्रलय होतो, पण बाप्पा मी तर कध्धी कध्धी खोटं बोललो नाही, वाईट वागलो नाही, मग माझ्या घरात प्रलय कशाने झाला?

सगळ्या वस्तू वाहून जात होत्या.


शेतीची अवजारं, धान्याचे डबे, भांडी-कुंडी...माझं विद्या धन....दसर् याला सरस्वतीचं चित्र काढून पुजलेली पाटीसुद्धा..

आई खूप रडत होती. बाबा तिला सावरत होता. मला तर काहीच कळत नव्हतं. फक्त एकसारखं डोळं मात्र गळंत होतं.

तू सगळ्यांचा सांभाळ करतोस..


पण त्यादिवशी देवघरातून तुलाही पाण्याबरोबर वाहत जाताना पाहिलंय मी.

रात्र..पाऊस..घरातलं पाणी..डोळ्यातलही.....वाढतच होतं. बाबा म्हणाला,"पोहत जातो आणि बाहेर काही मदत मिळते का ते बघतो."

मी आणि आई तसेच बसून होतो कितीतरी वेळ.....पाण्याचा रुद्रावतार बघत....

पहाटे कधीतरी मिल्ट्री चे जवान होडीतुन आले. मला आणि आईला आधार देऊन सुखरूप सुरक्षित जागी हलवलं. तंबू ठोकले होते पूर्ण मैदानभर. सगळीकडे गोंधळ,ओरडाआरड....

लोकंच लोकं. जत्राच जणू. पण आनंद हरवलेल्या शून्य नजरा. इतकी लोकं की जागा अपुरी पडायला लागली. कोणी काहीबाही खायला देत होती. कोणी कपडे वाटत होतं, कोणी गरजेच्या वस्तू. मदतीला खूप जण धावुन आले होते. लांबच लांब.. रांगच रांग... पळापळी काहीतरी मिळवण्यासाठी..

पोलीस अडकलेल्या लोकांना शोधून आणत होते कुठून कुठून.


मी सैरभैर..बाबाला शोधत होतो. नंतर कधीतरी कुणीतरी आईच्या कानात "ती" बातमी सांगितली. आई हंबरडा फोडून रडत होती. परत परत मला जवळ घेत होती. उमगत नव्हतं काहीच.

"नवरा बी गेला आणि शेत बी गेलं. सारं घरदार पाण्याने नेलं" आई टाहो फोडत होती....

लोक म्हणत होते पाण्यात वाहून गेला.

असा कसा जाईल? पट्टीचा पोहणारा तो..... कितीतरी जणांना पोहायला शिकवलंय.

मला बी....

अन् हे म्हणतात वाहून गेला.

सगळं खोटं .... खोटं

अजूनबी डोळं फक्त बाबाच्या वाटेकडे लागलेत.

आता थोडं सावरलोय. मामाच्या घरी आलोय. आई म्हणते इथंच रहायचं आता. इथलीच शाळा..मला मात्र घराची फार आठवण होते.

आणि सगळ्यात जास्त बाबाची.

रोज आठवण करून देतो तुला बाप्पा. पण बहुतेक तू ही बाबा सारखाच मुलखाचा विसरभोळा...

तो नाही का केव्हाचा गेलाय..

घरच विसरलाय बघ.....

बरेच दिवस झाले म्हणून शेवटी पत्र लिहायला घेतलं. मी कधीच काही हट्ट करणार नाही, पण देव बाप्पा आता पाऊस परत घेऊन जा आणि आम्हाला आमचा बाबा देऊन जा...

आणि हो जमलं तर आमचं घर अन् छोटसं शेतसुद्धा....

एवढं करशील..

तर देईन तुला..

न खाता कध्धीपासून जपून ठेवलेला बिस्कीटचा पुडा..बाबासाठीचा....

त्या काकांकडून मिळालेला.....

प्लीज बाप्पा, माझ्या पत्राचं नक्की..नक्की उत्तर दे. मी वाट पाहतोय कधीचा............


तुझाच लाडका

दिपू


ता. क. - देवळात ठेवतोय पत्र. मला माहितीये पुजारी काका पोस्टमन हायेत तुझे


Rate this content
Log in