दाटून या...
दाटून या...


एकूणच त्या थेंबाची बाजू फार काही चूक होती अशातला भाग नाही..... एका खिडकीचा उंच शिडशिडीत गज कष्टाने उतरणारा थेंब.. त्याच्या काय अपेक्षा असणार होत्या असून असून...? पृथ्वी ओढत्ये, म्हणून गुरुत्वाकर्षणाने ओढला जातोय तो खाली खाली.. बाकी त्याच्या अस्तित्वालाही फार काही अर्थ आहे अशातला भाग नाही..
हो, पण त्याचं एक मागणं आहे ढगांपाशी... त्याच्याच जन्मदात्यापाशी...
तो म्हणतो, "मला एकटं सोडू नका बाबांनो... नाही बघवत पृथ्वीवरली हाडा-मासांनी बनलेली आणि 'माणूस' म्हणून मिरवणारी 'यंत्र'.. एकंच मागणं मागतो म्हणूनच तुम्हाला... 'दाटून या....!' गच्च दाटून या..! तुम्ही दाटून आलात ना की, रितेपण नाहीसं होतं.. या यंत्रांच्या जगात कुठेतरी आर्द्रता शिल्लक आहे, याची जाणीव होते..
हो, आणि येताना ना, तुमच्या इंद्रधनूसहीत या..
इंद्रधनू व्हायला सूर्याच्या साक्षीची काय गरज आहे प्रत्येक वेळेला..?
नाही, असतील भौतिकशास्त्राचे काही नियम.. पाळतही असेल निसर्ग ते.. पण कधीतरी आपणहूनच सहज म्हणून आभाळावर सात रंग शिंपडायला काय हरकत आहे..! थोडे फिके असतील तरी चालतील.. मानून घेऊ देखणे आम्ही ते..
का नाही रेखाटत तू इंद्रधनुष्य माझ्या आभाळात मावेल असं..? "
आभाळ थोडं हसलं, कोपऱ्यात जाऊन बसलं.. मोजू लागलं त्याच्याकडे शिल्लक असलेले थेंब..
'कधी ढगांची विमानं येतील आणि ह्यांना घेऊन जातील सांगता येत नाही..आहेत तोवर हे थेंब आपले.. उद्या वाऱ्यासोबत कुठे भरकटतील कोणाला माहिती..? तसा सगळ्यांना बघत असतोच मी वरून.. पण सगळ्याच थेंबांना खूष ठेवणं मला एकट्याला तरी कसं जमणार..? शेवटी ढगांपाशीच मागणं मागावं लागतं..'
थेंबं गेल्यावर उरलेल्या एकटेपणात आभाळालाही एक थेंब व्हावं लागतं.. खरंतर थेंब होऊनच मागावं.. मागणं सोपं जातं.. कारण एकदा 'आभाळ' झाल्यावर 'दुसऱ्याजवळ' काही मागता येत नाही..
थेंब असो वा आभाळ.. प्रत्येकाचं मागणं एकंच असतं....
'दाटून या..!!'