Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pandit Warade

Others


4.3  

Pandit Warade

Others


चकवा

चकवा

7 mins 388 7 mins 388

        १९८१-८२ चा खरेदी हंगाम. पदवी शिक्षण घेऊन कुठे तरी छोटीसी का होईना नोकरीच पाहिजे असा घरच्यां सर्वांचाच आग्रह. म्हणून कापूस एकाधिकार खरेदी योजने मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कारकून म्हणून तात्पुरत्या नोकरीला लागलो. गाडी सेंटर वर ड्युटी मिळाली होती. सेंटर वर येणाऱ्या प्रत्येक गाडीला एक नंबर देऊन एका रजिस्टर मध्ये त्या शेतकऱ्याची नोंद करायची. एका विशिष्ट पद्धतीने गाड्या वजन काट्यावर वजन करण्यासाठी पाठवायच्या. त्या ठिकाणी ग्रेडर ग्रेडिंग करायचा. फेडरेशनचा एक आणि बाजार समितीचा एक अशा दोन कारकूनांसमक्ष कापूस मोजला जायचा. तेथे अनेक प्रकारचे घोटाळे करता येतात म्हणून तिथल्या ड्युटीसाठी सर्वांचाच आग्रह असायचा. पण त्यावर्षी ग्रेडर एक प्रामाणिक अधिकारी असल्या मुळे तेथे ड्युटी नको वाटू लागलेले दुसरे कारकून माझ्याकडे ड्युटी बदलून घ्यावी म्हणून मागणी करायचे. मला येथेच काम करायला आवडत होते. जास्तीत जास्त वेळ मला शेतकऱ्यां सोबत राहता येत होते. त्यासाठी एक सहकारी आणि दोन मदतनीसही हाताखाली होते.

       तसे पाहिले तर मला त्या नोकरीचा पगार अगदीच कमी मिळणार होता. पण नोकरीच्या लेबलसाठी नोकरी करत होतो. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण असून सुद्धा खोली घेऊन राहणे शक्य नव्हते. मी आणि सहकारी एक दिवस तिथेच शेतकऱ्यांच्या सोबत झोपायचो. तिथे झोपतांना थंडीचा, डासांचा त्रास व्हायचा पण इलाज नव्हता, सहकाऱ्याची सासुरवाडी तिथून जवळ म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर होती, एक दिवस तिथे जायचो, तर एक दिवस आपापल्या गावी, मुक्कामा साठी जायचो. माझे गाव तेथून २० किलोमीटर अंतरावर होते. गावी जाणारी बस लवकरच निघून जायची. म्हणजे तिच्या वेळेवरच जायची. पण आमचेच काम तोपर्यंत संपत नव्हते. म्हणून त्या मार्गावर जाणाऱ्या शेवटच्या बसने १० कि.मी. जायचे, तिथून पुढचे १० कि.मी. पायी चालत जायचे.

        सहकाऱ्याच्या सासुरवाडीचे लोक फार प्रेमळ होते. आम्ही जरी नेहमी नेहमी जात असलो तरी तिथे आम्हाला चांगली वागणूक मिळत असे. तिथला एक पाहुणा रावसाहेब सहकाऱ्याचा चांगला मित्र होता. तेवढे दारूचे व्यसन सोडले तर माणूस खूपच चांगला होता. व्यसन पूर्ती साठी तो रोजच तालुक्याला येत असायचा. जातांना कधी कधी आमच्या सोबत यायचा.

        एक दिवस नेहमी प्रमाणेच आम्ही दोघे सहकाऱ्याच्या सासुरवाडीला जायला निघालो होतो. रोजच्या पेक्षा थोडा उशीरच झाला होता. थोडा म्हणजे चांगलाच अंधार पडला होता. आम्ही जरा जोरानेच निघालो होतो. एक बरे होते. पौर्णिमा असल्यामुळे रस्त्यावर चंद्राचा चांगलाच प्रकाश पडला होता. रस्ता चांगला दिसत होता. एकदीड किलोमीटर अंतर गेलो असेल नसेल तोच पाठीमागून आवाज आला..

      "पाव्हणं, ओ पाव्हणं! जरा थांबा की. येऊ द्या ना राव."

     आम्ही मागे वळून बघितले. रावसाहेब धावत पळत येत होता. हातात एक बाटली होतीच. आम्ही थांबलो. तो धावतच आला.

      "काय राव मी तुमच्या साठी एवढा वेळ थांबलो. अन् तुम्ही निघाले माझी वाट न बघताच. असं कुठं असतं का राव ?" रावसाहेब प्यायलेला होता. त्या नशेत सुद्धा तो व्यवस्थित बोलत होता.

       "आम्ही बघितलेच नाही तुला. कुठे होतास एवढा वेळ?" रावसाहेबला सहकारी रामदास विचारत होते.

       "दुसरे कुठे असणार? हे एवढेच तर एक ठिकाण आहे आपले हमखास सापडण्याचे. दारूचा अड्डा." रावसाहेबने माहिती पुरवली.

       आम्ही तिघेही गप्पा मारत रस्त्याने चालत होतो. अर्धा किलोमीटर पुढे गेलो असेल, रावसाहेब बोलता बोलताच गायब व्हायचा गप्पांमधून. मध्ये मध्ये तो इतरां सोबत बोलल्या सारखे बोलायचा. 'नाही ना', 'नको ना' असे काही तरी म्हणायचा. पुन्हा आमच्या सोबत बोलायचा. तो नशेत असल्यामुळे तसे करत असेल असे वाटून आम्ही दुर्लक्ष करत होतो.

       रावसाहेबचे दुसरी कडे बोलण्याचे प्रमाण वाढले होते. तो आमच्या सोबत कमी आणि दुसरी कडे जास्त बोलत होता. आणि अचानकपणे........

        रावसाहेब रस्ता सोडून खूप जोरात पळायला लागला. 'अगं थांब, मी येतो ना. एकटी जाऊ नकोस. मी आहे ना. थोडं थांब मी येतो सोबत.' असं काही तरी बोलत तो पळत सुटला.

       "अरे रावशा, रावशा करत मी आणि रामदास त्याच्या मागे पळत सुटलो. पुढे रावसाहेब, त्याच्या मागे मी आणि मागे रामदास असे आम्ही पळत होतो. अचानक रामदासने मला थांबवले.

      "साहेब, पळू नका. आता पळण्यात काही मजा नाही. आज पौर्णिमा आहे. त्याला जाऊ द्या. आपण घरी जाऊन मग बघू काय करायचे ते." रामदासने मला थांबवले.

    "अरे पण? तो एकटाच गेलाय. त्याच्या जीवाला नक्कीच काही तरी धोका आहे तिकडे." मी रावसाहेब विषयीच्या अति जिव्हाळ्याने बोलत होतो.

        "काहीच होत नाही. आपणच मागे फिरा चला. आज पौर्णिमा आहे. हे काही तरी वेगळेच आहे." जवळ जवळ हाताला धरून रामदासने मला मागे ओढले. आम्ही गावाच्या रस्त्याला लागलो होतो. थोडासाच वेळ झाला असेल रावसाहेबचा जोरात ओरडण्याचा आवाज आला.

      गावात गेल्या बरोबर आम्ही सर्वात आधी रावसाहेबच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांना ही घटना सांगितली.त्यानंतर रामदासच्या सासऱ्याच्या घरी गेलो. उशीर झाल्यामुळे तिथेही सारे सांगावेच लागले. आम्हाला जेवायला वाढून रामदासचे सासरे रावसाहेबच्या घराकडे गेले.

        दहा पंधरा जणांची टोळी हातात काठ्या आणि कंदील घेऊन तिकडे गेले. रावसाहेब नदीत पडलेला सापडला. त्याचे गुडघे फुटलेले होते. बराच मार लागलेला होता. त्याला बैलगाडीत टाकून आणावे लागले होते.

       आठ दहा दिवस रावसाहेब कुणालाच काही बोलत नव्हता. त्या बाबत कुणीही त्याला छेडले नाही. त्याच्या वडिलांनी एक दिवस एक मांत्रिक बोलावला. जटा, दाढी वाढवलेला, अंगात भगवा डगला घातलेला एक भयानक चेहऱ्याचा राकट माणूस आला. आल्या बरोबर घराचे आणि रावसाहेबचे निरीक्षण केले. एका कटोरीत झोळीतल्या काही मुळींचे तुकडे काढून मंत्राद्वारे अग्नी पेटवला. सोबतच्या डबीतून थोडी भुकटी अग्नीत टाकली थोडासा धूर झाला. तो सर्व घरभर फिरवला. मांत्रिकाने डोळे मिटून ध्यान सुरू केले. काही मंत्र म्हटले. नंतर सांगितले,

       "तुमचे नशीब चांगले म्हणून मुलगा वाचला. त्या दिवशी बहुतेक पौर्णिमा असावी. त्याला चकव्याने घेरले होते, घेऊनही गेले होते. परंतु कुठल्या तरी दैवी शक्तीची मदत तुमच्या मुलासोबत असल्या मुळे तुमच्या मुलाला हानी पोहोचू शकली नाही. मी काही मंत्र सांगतो ते तुम्ही रोज सकाळी अंघोळ करून देवाजवळ बसून म्हणायचे आहेत. आणखी आठ दिवसांनी आपण पुन्हा असा एक यज्ञ करू त्यावेळी त्या दुष्ट शक्तीचा पूर्ण बंदोबस्त करू." असे म्हणून मांत्रिकाने एक मंत्र त्यांच्या कानात सांगितला नि मानधन घेऊन निघून गेला.

       रावसाहेबची प्रकृतीत आता सुधारणा होऊ लागली होती. घरात रोज मंत्र पठण सुरू होते. तो आता नॉर्मल बोलू लागला होता. एक दिवस मी आणि रामदास त्याला भेटायला गेलो.

       "काय रावसाहेब, काय म्हणतेय तब्येत? बरं वाटतं ना आता?" रामदासने त्याला विचारले.

     

        "आता जरा बरं वाटतंय. बरं झालं तुम्ही बरोबर होतात म्हणून मी वाचलो." आणि रावसाहेब राडायला लागला.

         "अरे, रडतोस कशाला? तुला काही झाले नव्हते. थोडीशी जास्त झाली होती. म्हणून मी नेहमी म्हणत असतो जरा कमी पीत जा." रामदास चेष्टेच्या सुरात म्हणाला.

        "नाही हो पाव्हण, तुमची शप्पथ मी त्या दिवशी फारच कमी घेतलेली होती. तुम्ही बघितलं ना. बाटली सोबत घेतली होती मी." रावसाहेब मनापासून सत्य तेच सांगत होता.

      "पण मग असं कसं झालं? आपण तर सर्व बरोबरच होतो. मग तू अचानक पळायला कसा लागलास?" मी विचारले.

      "साहेब, मी खरंच सांगतो. मी तुमच्या बरोबर चालत होतो, त्याच वेळेस माझ्या बाजूने एक सुंदर मुलगी सोबत येत होती. तुम्हाला खरं वाटणार नाही साहेब, अशी सुंदर मुलगी मी पहिल्यांदाच पहात होतो. मी तिच्यावर खरंच लट्टू झालो होतो. परंतु तुम्ही सोबत असल्यामुळे थोडं सांभाळून बोलत होतो." तो सांगत होता.

       "मग अचानक पळायला काय झालं? ती कोण होती? आम्हाला कशी दिसली नाही." मी आश्चर्याने विचारले.

      "माहीत नाही साहेब ती कोण होती? कुठून आली? आणि का मलाच बोलत होती. पण मला तिच्याशी बोलायला आवडत होतं. आमची खूप जुनी ओळख असल्या सारखं वाटत होतं. ती बोलता बोलता म्हणत होती, 'मी खूप दिवसापासून तुझी वाट पहात आहे. आज मला माझा खाऊ पाहिजे आहे. आज मी खाणारच आहे.' आणि ती अशी म्हटली की लगेच मी खिशातला खाऊचा पुडा काढला आणि तिला द्यायला लागलो. जसा मी तो पुडा तिच्या हातात द्यायला लागलो, तिला काय झाले कुणास ठाऊक ती एकदम घाबरली अन् पळायला लागली. मी ही तो पूडा घेऊन तिच्या मागे पळू लागलो. पुढे काय झाले ते मात्र मला काहीच कळले नाही." रावसाहेब सांगत होता, आम्ही शांतपणे ऐकत होतो.

      "हं! तर असे आहे हे सारे. बरं तुझ्या हातात कोणता खाऊ होता, ज्याला पाहून ती एवढी घाबरली?" मी विचारले.

      "साहेब त्यात चिवडा होता. आम्ही बेवडे दुसरे काय घेणार खायला?"

       "तो पुडा कुठाय काही आठवतं का? त्या दिवशीच्या तुझ्या सोबतच्या वस्तू कुठे ठेवल्या असतील तर त्या मला पहायच्या होत्या." मी जरासा विचारात पडलो होतो. लहानपणी ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टी वरून या घटनेचा उलगडा होईल असे माझे मन मला सांगत होते.

      "काय साहेब, तुम्ही पण कुठल्या गोष्टीत फारच खोल शिरता. जाऊ द्या तो वाचला हे महत्वाचं. बाकीच्या गोष्टीत खूप डोकं खराब करून घेता?" रामदास मला सांगत होता. 

      "नाही रामदास, तू समजतोस तितकी साधी गोष्ट नक्कीच नाहीय ही. यातून काही तरी नक्कीच पुढच्या साठी काही मार्गदर्शन मिळेल. अपल्यालाशोध घेतलाच पाहिजे. 'पुढच्यास ठेस मागचा शहाणा' झालाच पाहिजे." मी सांगितले आणि रावसाहेबला त्या वस्तू आठवतील तशा जमा करायला सांगितले. 

       "ठीक आहे साहेब पुढच्या वेळी याला तेव्हा नक्की हे सारं तुमच्यापुढं असेल." रावसाहेब म्हणाला.

        "आणखी तीन दिवसाने नक्की येतो. तोवर काळजी घे जीवाची." असे म्हणून आम्ही निरोप घेतला.

      तीन दिवसानंतर आम्ही रावसाहेबला भेटायला गेलो. तेव्हा त्याने त्या दिवशी अंगावर घातलेल्या कपड्या सहित साऱ्या गोष्टी, ज्या जमा करून ठेवल्या होत्या, माझ्या समोर मांडल्या. सोबत घेतलेली दारूची बाटली आणि तो खाऊचा पुडा सुद्धा, ज्याला मुंग्या लागलेल्या होत्या.

      "साहेब बघा यात तुम्हाला काय काय सापडतं ते. का कुणास ठाऊक साहेब पण तुमच्या कडे पाहून, तुम्हालाही यातलं काही कळत असावं असं मला वाटायला लागलं बघा." रावसाहेब म्हणत होता.

     "साहेब, या साऱ्या नशिबाच्या आणि राशीनुसार घडणाऱ्या गोष्टी. त्याच्या राशीवर होतं म्हणून ती त्याला दिसली, आपल्याला नाही. कुठं उगाच डोकेदुखी करून घेता?" रामदास मला म्हणत होता.

       मी त्याला शांत बसवलं आणि त्या वस्तू पाहू लागलो. एकेक वस्तू पाहता पाहता तो खाऊचा पुडा हातात आला. त्याला मुंग्यांनी घेरलं होतं. मी त्या मुंग्या झटकल्या, त्यातला खाऊ दुसऱ्या एका कागदावर टाकला. कागद झटकून सरळ वाचण्यासारखा केला. आणि माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले.

 

     "काही सापडलं का साहेब?" माझ्या चेहऱ्यावरचे हसू बघून साऱ्यांनी एक सुरात विचारलं.

      मी तो कागद सर्वांना दाखवला. त्या कागदावर भगवान शंकराची प्रतिमा होती आणि त्याखाली महामृत्युंजय मंत्र होता. ज्याच्या मुळे दुष्ट शक्तीला चाल करता आली नाही.


Rate this content
Log in