छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
शिवाजी शहाजी भोसले यांचा जन्म १९ फेब्रुवारी, १६३० साली झाला आणि मृत्यू ३ एप्रिल १६८० त्यांना जनता श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक नि शिस्तबद्ध लष्कर नि राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी केली तसेच त्यांनी अनेक नविन किल्लेही उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध, प्रशासकीय, सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली.
प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला.
शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली. कारण अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांना आद्य हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा चर्चेचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ ही एक जन्मतारीख मानली जात होती. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या स्मरणार्थ १९ फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून जाहीर केला आहे.
शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती. म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या. सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या त्या कन्या होत्या.
शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज निर्माण केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी (१५५२-१५९७) अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना "राजा" ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला होता.
शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे दादोजी कोंडादेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. १६४७ मध्ये कोंडादेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले.
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईं खंबीर मार्गदर्शन करत होत्या.त्यांनी शिवबाला प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची शिकवण दिली. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू बनून त्यांना प्रशिक्षण देत होत्या. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी प्रेरणा दिली.
इ.स. १६४६ मध्ये, सुलतानाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन १६ वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला काबीज केला. आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले जिंकले. यामध्ये पुरंधर, कोंढाणा आणि चाकण यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी सुपे, बारामती आणि इंदापूर ही ठिकाणे आपल्या थेट ताब्यात घेतली. तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले. यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला. राजगड ही त्यांची राजधानी होती.
यानंतर शिवाजी महाराज हे कोकणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनांची दखल घेऊन कारवाई करण्याचे ठरवले. २५ जुलै १६४८ रोजी, शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात, विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदाराने शहाजी राजांना कैद केले.
१६४९ मध्ये जिंजी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशहाचे स्थान मिळवल्यानंतर शहाजी राजांची सुटका झाली. १६४९ - १६५५ दरम्यान शिवरायांनी आपल्या कार्यास विराम दिला आणि शांतपणे आपले फायदे एकत्र केले. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर, शिवाजी महाराजांनी पुन्हा आपले गड जिंकण्याचे कार्यास सुरुवात केली आणि १६५६ मध्ये, वादग्रस्त परिस्थितीत, चंद्रराव मोरे, विजापूरचा सहकारी मराठा सरंजामदार याचा वध केला आणि त्याच्याकडून सध्याच्या महाबळेश्वरच्या हिल स्टेशनजवळील जावळीचे खोरे ताब्यात घेतले. भोसले आणि मोरे घराण्यांव्यतिरिक्त, सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली, अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबांना वश करण्यासाठी शिवरायांनी विविध डावपेचांचा अवलंब केला जसे की, वैवाहिक संबंध तयार करणे, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार करणे किंवा त्यांच्याशी लढणे. शहाजी राजांनी त्यांच्या नंतरच्या काळात आपल्या मुलाबद्दल द्विधा वृत्ती बाळगली आणि त्याच्या बंडखोर कारवायांना नकार दिला. त्यांनी विजापुरींना शिवाजीबरोबर वाटेल ते करण्यास सांगितले. १६६४ - १६६५ मध्ये शहाजी राजांचा शिकार अपघातात मृत्यू झाला.
शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानांमुळे विजापूर सल्तनत नाराज होती. मुघलांशी शांतता करार केल्यानंतर आणि तरुण अली आदिल शाह दुसरा सुलतान म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारल्यानंतर, विजापूरचे सरकार स्थिर झाले आणि त्यांचे लक्ष शिवाजी महाराजांकडे वळले. १६५७ मध्ये सुलतानने, किंवा बहुधा त्याची आई आणि कारभारी हिने, अफझल खान या अनुभवी सेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी विजापुरी सैन्याने तुळजा भवानी मंदिर, जे शिवाजी महाराजांच्या घराण्याचे पवित्र स्थळ होते आणि हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची विटंबना केली.
विजापुरी सैन्याने पाठलाग केल्यानंतर शिवाजी महाराज हे प्रतापगड किल्ल्यावर गेले, जिथे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांना शरण जाण्यासाठी दबाव टाकला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. दोन्ही सैन्याने आपापसांत अडथळे आणले. शिवाजी महाराज वेढा तोडू शकले नाहीत, तर अफझलखानाकडे शक्तिशाली घोडदळ असूनही वेढा घालण्याच्या साधनांची कमतरता होती. म्हणून तोही किल्ला घेण्यास असमर्थ होता. दोन महिन्यांनंतर अफझलखानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवून किल्ल्याच्या बाहेर एकांतात भेटण्याबद्दल बोलणी चालू केली. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पंताजी गोपीनाथ बोकील यांनी अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले.
१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका छावणीत दोघांची भेट झाली. प्रत्येकजण केवळ एका तलवारीसोबत यावे आणि एकच अनुयायी हजर असावा असे ठरवले गेले. अफझलखान आपल्याला अटक करेल किंवा हल्ला तरी करेल असा मावळे व शिवाजी महाराजांना संशय होता. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर डाव्या हातावर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणार नव्हती. याबरोबरच त्यांनी उजव्या हातात खंजीर घेतला. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होते. तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना हसत मिठी मारली आणि एकदम त्यांना जोरात जवळ खेचून घट्ट पकडून धरले त्यामुळे राजांचा दम रोखण्यास सुरवात झाली शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला. परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले गेले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचवेळी अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. बडा सय्यद ने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. तो वार तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच त्यावेळी राजांच्या तोंडून वाक्य उद्गारला गेले "होता जिवा म्हणून वाचला शिवा" आणि तेच ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी खानाच्या सैन्यावर हल्ला केला. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपत लपत वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळून गेले.
१० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सैन्याने विजापूर सल्तनतच्या सैन्याचा निर्णायकपणे पराभव केला. विजापूरच्या सैन्यातील जवळपास ३,००० हून अधिक सैनिक मारले गेले आणि एक सरदार, अफझलखानाचे दोन पुत्र आणि दोन मराठा सरदार याना कैद करण्यात आले.
अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
स्वतः शिवरायांनी कोल्हापुरापर्यंत जाऊन पन्हाळा जिंकून घेतला. आधुनिक काळात अफझलखानच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.
शिवाजीराजांच्या वारसदाराचा प्रश्न गुंतागुंतीचा होता. 1678 मध्ये शिवरायांनी संभाजीराजांना पन्हाळा येथे बंदिस्त केले. त्यानंतर संभाजीराजे आपल्या पत्नीसह एक वर्षासाठी मुघलांकडे गेले. पुढे ते घरी परतले पण पुन्हा पन्हाळ्याला बंदिस्त झाले.
हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला ३-५ एप्रिल १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे. ब्रिटिश नोंदी सांगतात की १२ दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटेका नॅसिओनल डी लिस्बोआ या समकालीन दस्ताऐवजात मृत्यूचे कारण अँथ्रॅक्स आहे. तथापि, शिवाजीराजांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचे नमूद केले आहे. शिवाजीराजांच्या हयात असलेल्या पत्नींपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात उडी घेऊन सती गेल्या. दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार, सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही.
शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर, सोयराबाईंनी विविध मंत्र्यांसोबत त्यांचा सावत्र मुलगा संभाजीऐवजी आपला मुलगा राजारामचा राज्याभिषेक करण्याची योजना आखली. 21 एप्रिल 1680 रोजी दहा वर्षांच्या राजारामला गादीवर बसवण्यात आले. तथापि, सेनापतीला मारून संभाजीराजांनी १८ जून रोजी रायगडावर ताबा मिळवला आणि 20 जुलै रोजी औपचारिकपणे ते सिंहासनावर आरूढ झाले. राजाराम, त्यांची पत्नी जानकीबाई आणि आई सोयराबाई यांना तुरुंगात टाकण्यात आले.
