चार आणे..आठ आणे...!
चार आणे..आठ आणे...!
चार आणे.. आठ आणे...!
एक आणा,दोन आणे,चार आणे ,आठआणे ,बारा आणे ,आणि सोळा आणे म्हणजे बंदा रुपया. आता नजरे आड केंव्हाच झाले पण त्या आण्यांची माया ,किंमत अजूनही मनात आत खोलवर रुंजी घालते..एक एक प्रसंग एक एक गोष्टी अजूनही आठवतात आणि ती वेळ दत्त म्हणून डोळ्या समोर उभी रहाते.
आमच्या बालपणी वडीलधाऱ्यांचा धाक फार मोठा होता आणि त्यांचा मान ही खूप मोठा होता.समोर जायची बिशाद नव्हती.सारे व्यवहार दुरूनच.जसजशी समज येत होती तसतसे अंतर वाढत जायचे.मग दादा,ताई ,आई यांची मध्यस्ती लागायची.त्यांची मन धरणी म्हणजे मोठे दिव्य असायचे.
दादाला गृहपाठ लिहून देणे,दौत, दौतीतली शाई देणे,पन्सिलला टोक काढून देणे,कपाट लावून देणे,दप्तर नीट भरणे,निरोप देणे अशी अनेक कामे दादा लोकांची असायची.त्यांचाही धाक मान मोठा असायचा.वाटायचे आमचा जन्म गुलामीत गुलाम म्हणूनच झाला असावा.
ताईच ही तसच असायचं.भरत कामासाठी सुई दोऱ्यां पासून ते मैत्रिणींचे निरोप देणे,पाणी विहिरीवर ओढायला मदत करणे,शेण गोळा करून आणणे (जमीन सारवायला लागायच ना)
चिंचा ,आवळे,कैऱ्या,फुले वेणीसाठी आणि सर्व म्हणजे सर्व गोष्टींचा पुरवठा आज्ञे नुसार करणे भाग पडायचं.एवढं सगळं झालं की आईची पाळी यायची, चुलीला सरपण देणे,ओढ्यातील झऱ्याचे झरे काढून पिण्याचे पाणी भरणे,सोळ्यातले पूजेसाठी पाणी आणणे,दळप कांडप पहाणे,आणि किरकोळ बाजारहाट चहा पुडी पासून ते वेलदोडा शोधून आणने हे सगळं बिनभोबाट पार पाडायला लागायचं.वेलदोडा रवा आणायचा म्हंटल की खमंग शिऱ्याचा वास घरी पिशवी येतानाच नाकात घुमायचा.
मग बाबांची सेवा सुरू व्हायची.तंबाखूचा व्यापार होता म्हणून घरी उठबस फार मोठी होती.तंबाखूच्या लेबल लिहून पुड्या बांधणे,वखारीत हजेरीवर नजर ठेवणे,आणि चार आण्याच्या बिड्या(विड्या) काडेपेटी आणून देणेआणि इतर नोंदीविना बरीच छोटी मोठी काम क्रमाक्रमांनी व्हायची.शेतावर जाणे,शेंगांच्या म
मोसमात शेंगा काढायला ,रखवालीला जाणे,तंबाखू छ
चाप काढणीला जाणे ,उसाच्या वेळी ऊसास पाणी पाजण्या पासून ते फॅक्टरीला पाठवे पर्यंतची सर्व पडेल ती काम अंगावर धडा धड पडायची.आता वाटात यातून शाळा,अभ्यास परिक्षा कसं काय पार पडलं देव जाणे.
सधन कुटुंबाचे आम्ही वंशज म्हणून पहिला नंबर जणू भाळावर कोरलेला.मी परीक्षेचा निकाल पहायला
कधी गेलो नाही किंबहुना जावं लागायचं नाही.आणि आमच्या निकासलाच कौतुक ही कधी झाल नाही.पहिला नंबर असूनही घरात मी सर्वात लहान म्हणून सर्वात ढ हे बिरुद कायम स्वरूपी भाळावर कोरलेल.सगळेच मोठे आणि सगळेच नंबरातले त्यामुळे नंबराच कौतुक नाही इतकंच.
शेवट पर्यंत तुला काय कळतंय?तुला काय अक्कल आहे?तू गप्प बैस!मुकाट्यानं काम कर!जादा शहाणपणा करू नको ही वाक्य शिशा सारखी कानात शिरून स्थानापन्न झालेली ,ती आजही तशीच आहेत.
काळ सरला वय ही वाढलं शिक्षण पूर्ण झालं,अंगाखांद्यावर जबाबदाऱ्या आल्या, संसार सुरू झाला ,वाढला ,फुलला बरच पाणी पुला खालून गेलं.
मायेची आदराची पान पिकली आशीर्वाद देऊन गळून पडली आणि आठवणींचा भला मोठा मायेचा प्रेमाचा खजिना शिदोरी म्हणून अंतर्मनात साठवून गेली.
जेंव्हा जेंव्हा दिवाळी पाडव्याच्या लक्ष्मी पूजनाला डब्यातली चिल्लर काढतो तेंव्हा तेंव्हा चार आणे आठ आणे मायेने पाहतात.साऱ्या आठवणी आठवून उजळणी घडवतात आणि डोळ्यांना सुखावून टपाटपा
अश्रू ढाळतात आणि सांगतात आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत काळजी करू नको.तेंव्हा ते चार आणे आठ आणे अनमोल ठरतात.