'चाफा'
'चाफा'


'चाफा बोलेना,चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना......'
या माझ्या आवडत्या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या, अन् मनात चाफ्याच्या आठवणी पिंगा घालू लागल्या.
चाफा आणि माझं सख्य तसं फार पुर्वीपासूनच. अगदी पाच वर्षाची असेन तेव्हापासून. आमच्या जुन्या घराच्या पुढे असलेल्या मारुती मंदिराच्या समोर डौलाने उभा राहिलेला मी, लहानपणी पाहिलायं, अजून ही तो तिथे उभा आहे. तो देवचाफा देवाला वाहण्यासाठी त्याची फुले सहज उपलब्ध होतात, म्हणून तो देवचाफा. त्याच्या पाच पांढऱ्या पाकळ्या, गाभ्याशी असलेला पिवळा रंग लक्ष वेधून घेतो. पानगळती नंतर निष्पर्ण झाड फुलांनी लगडलेल पाहणं म्हणजे नेत्रसुखद अनुभव. त्यांचा मंद मंद सुवास मनमोहून टाकतो.
हा देवचाफा कुठेही फुलतो. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात, माळरानावर, काट्याकुट्यात, अगदी परसदारातही तो दिमाखाने उभा आसतो. खोड जरी ओबडधोबड असले तरी, एकदा का त्याने फुलांचा श्रृंगार ल्यायला की तो खुप सुंदर दिसतो. लहानपणी शाळेत असताना गुढीपाडव्याला, सरस्वतीपुजनासाठी चाफ्याचीच फुले असायची, नवरा नवरीच्या मुंडावळीसाठी याच फुलांना मान असायचा आणि अजुनही आहे.
त्याचे प्रकार तरी किती? सोनचाफा, कवठीचाफा, हिरवाचाफा, लाल, गुलाबी चाफा त्यातला सोनचाफा माझ्या खुपच आवडीचा. पिवळा जर्द अन अतिशय सुगंधित असलेल्या सोनचाफ्याला मी पहिल्यांदा भेटले ते चाफळच्या श्रीराम मंदिरा समोर तेव्ह
ा मी ७ वीत होते. मंदिरासमोर उजव्या बाजुस सोनचाफा अन् बकुळीची माझी पहिली भेट झाली. सोनचाफ्याच्या सुगंधाने मी जणू वेडी झाले अन् त्याच्या प्रेमात पडले.
सोनचाफा नावासारखाच, सुवर्णचंपक त्याचा सुगंध थेट हदयात जाऊन पोहोचतो. तेव्हापासून हा चाफा माझ्या मनात घर करून बसलायं.
तिथेच मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या बागेत विविध रंगांची झाडं होती, या विविध रंगी चाफ्यांची ओळख प्रथम तिथेच झाली. विविध फुलझाडांनी बहरलेल्या त्या बागेतील चाफ्याची फुले लक्ष वेधून घेत असत.
असे असले तरी प्रथम भेटला तो देवचाफा, हल्लीच सुट्टीत गावाला गेले होते. त्याच्या ओढीने गेले त्याला भेटायला. आमच्या जुन्या घराच्या मारूती मंदिरासमोर. ती सायंकाळची वेळ होती. वारा झुळूझुळू वाहत होता. नभातल्या केशरी ,गुलाबी छटात तर तो खुपच सुंदर दिसत होता. निष्पर्ण झालेल्या त्याच्या फांदयांच्या टोकावर घोसाघोसांनी आता फुलांनी उमलायला सुरुवात केली होती. त्याच्या सानिध्यात मला माझे बालपण आठवले. त्याच्या भोवती फेऱ्या मारत वेचलेली फुलं, त्या फुलांच्या बनवलेल्या अंगठ्या सगळं आठवलं अन् त्याच्याशी हितगुज साधत त्याला कवेत घेतल. त्याला ही माझी भाषा समजली आणि त्यानं माझ्यावर फुलांचा वर्षाव केला. त्या वर्षावाने मी मोहरून गेले. त्याला देता येईल ते दान त्याने मला दिले ....... चैतन्याचे ......... सुगंधाचे दान.
त्याच्या सोबतीतली ती सायंकाळ अधिकच रमणीय झाली.