बलिदान
बलिदान


स्मिता तशी काळी सावळी. पण नाकी डोळी छान होती.तीच थोरली होती.तिच्या पाठीवर दोन बहिणी आणि एक लहान भाऊ होता.वडिलाचं बांगड्याचं दुकान होतं. गावात बरीच बांगड्यांची दुकाने होती. त्यामुळे त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती.स्मिताला मैत्रिणीवर्ग पण खूप होता.सतत हसत खेळत असायची ती. वेगवेगळ्या कलांवर जणु तिचं प्रभुत्व होतं. कामातही चुणचुणीत होती.लहानपणापासून आईला घरकामात मदत करायची.घरच्या परिस्थितीची चांगलीच जाण होती तिला.बारावी झाली आणि तिला स्थळ आले.ती बाबांची फार लाडकी होती.तिने स्पष्ट सांगितलं त्यांना,"बाबा, मला आत्ताच लग्न नाही करायचं."आईने पण खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.पण स्मिताचा ठाम नकार होता.
मग दुसऱ्या नंबर च्या मुलीला विचारण्यात आले.तिने हो म्हटलं. अभ्यासात फारसं डोकं चालत नव्हतं तिचं. घर मात्र आरशासारखं लख्ख ठेवायची.
पण मोठी मुलगी लग्नाची असताना तिच्यापेक्षा छोटीचं लग्न? समाज काय म्हणेल हा विचार काही आईबाबांच्या मनातून जात नव्हता. स्मिताने समजूत काढली सगळ्यांची. "बाबा, मला शिकायचं आहे. घरासाठी काहीतरी करायचे आहे."तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसत होतं. बोलण्यात खूप आत्मविश्वास जाणवत होता.अखेर सगळ्यांनी समाजाचा विचार बाजूला सारून आपल्याला कशात समाधान मिळेल हे पहिले. लग्न सुरळीत पार पडलं. इकडे स्मिताने बारावीनंतर डी.एड.ला प्रवेश घेतला. लवकरात लवकर तिला स्वतःच्या पायावर उभे रहायचे होते. लग्न झालेल्या बहिणीचं चांगलं चाललं होतं.तिची अजिबात चिंता नव्हती आता कोणाला. बघता बघता डी.एड. चा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण झाला. पण अजून भरती सुरू होत नव्हती.हिम्मत न हारता तिने बी.एस.सी.ला प्रवेश घेतला. अर्ध वर्ष संपलं. पण तिचं लक्ष लागत नव्हतं. तिला आता चिंता वाटू लागली. शेवटी दिवाळीच्या सुमारास तिच्या हातात शिक्षिकेच्या नोकरीची ऑर्डर पाहून सर्वांचा आंनद गगनात मावेना. पोरीने करून दाखविले. सुखाचे अश्रू डोळ्यांतून वाहत होते.बाबांनी तर पाठच थोपटली. मोठ्या जोमाने लागली स्मिता कामाला. पहिल्या पगारात तिने सगळ्यांना कपडे घेतले. दुसऱ्या पगारापासून घरात टीव्ही, फ्रीज ह्या गोष्टी जागा घेऊ लागल्या.तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.आईने बाबांना म्हटले, "आज आपण स्मिता आली की हळूच तिच्या लग्नाचा विषय काढू.तिच्या आवडीची भजी करते मस्त." स्मिता खूप दमली होती.आईने गरमागरम चहा आणि भज्यांची डिश ठेवली स्मितापुढे. "वा! छान झाली आहेत भजी म्हणत स्मिताने चहा घ्यायला सुरवात केली. मोठया धीराने आईने विषय काढला. स्मिताने आठवण करून दिली. अजून छोट्या बहिणीचं लग्न आहे . सारंग चे शिक्षण आहे." अगं ते आम्ही करू. तुझं लग्नाचं वय व्हायला लागलयं. तिची स्वप्नंच खूप वेगळी होती. सगळं सुरळीत करण्याशिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं तिला.
दिवस भरभर जात होते. बघता बघता छोटीचं लग्न झालं. अगं आता तरी स्मिता. पण ती काही केल्याने लग्नाला तयार होईना.जीव तुटत होता तिच्यासाठी. पण करणार काय? लाडाची पोर होती. जबरदस्ती कशी करायची? भावाचं शिक्षण पूर्ण करेपर्यंत ३५ वय झालं होतं स्मिताचं. तोपर्यंत नोकरी करत करत तिने एम.एस.सी. पूर्ण केली. आता स्थळं येणं पण बंद झाली होती. तिच्या अचूक कामामुळे तिला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवण्यात आले होते. तिने लग्नाचा विचार पूर्णपणे मनातून काढून टाकला होता.आता फक्त समाजसेवा करायची असं तिच्या मनाने ठरवलं.सगळं मनासारखं झालं होतं तिच्या.खूप खुश होती ती. घरातले सगळे मात्र तिच्या बलिदानाचे कायम ऋणी राहू असे म्हणत होते.