Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

बबलू

बबलू

4 mins
253


  संध्या,संदीप यांच्या लग्नाला दहा वर्ष झालेली असतात.दोघांचा संसार उत्तम चाललेला असतो.त्यांना एकुलती एक देखणी मुलगी असते.ती आता तिसरीत शिकत असते.

  घरात सासू ,सासरे,दीर,नणंद एकत्र कुटुंब सुखाने नांदत असते.

  संदीप व्यावसायिक होता तर संध्या उत्तम गृहिणी होती.

  संदीप तसा दिवसभर बाहेरच असायचा.पण रविवारी मात्र तो आपल्या कुटुंबासाठी वेळ राखून ठेवायचा.संसार सुखाने पुढे चालला होता.

  एके रविवारी संध्याचा मोबाईल टीपाॅयवर असतो.तिथेच सोफ्यावर संदीप पहुडलेला असतो.तिच्या मोबाईलची मेसेज रिंगटिंग वाचतो.अगदी सहजच संदीप हाती मोबाईल घेतो व पाहतो कोणाचा मेसेज आलाय?

  एक अनोळखी नंबरवरून मेसेज होता की,"काहीही कर पण आज मला भेटायला ये.(बबलू)"

   त्याने मेसेज वाचला मोबाईल ठेवला.तेवढ्यात संध्या आली मोबाईल पाहिला मेसेजला उत्तर दिले"आज नाही जमणार,संदीप आज घरीच असतो"

  संदीपने परत मोबाईल पाहिला.तिचा मेसेज वाचला.जरा अस्वस्थ झाला.

  अनोळखी नंबरवरून परत मेसेज आला "प्लीज ये.महत्वाचे बोलायचेय.(बबलू)"

  संध्याने रिप्लाय दिला,"बघू प्रयत्न करते." वेळ ठरवली दुपारी तीनची.

   इकडे संदीपच्या विचारांचे चक्र सुरु झाले. कोणाचा नंबर असेल हा.कोण आहे हा.संध्या का भेटणार आहे.पण संध्यावर त्याचा विश्वास असल्याने तो जरा शांतच बसला.त्याने संध्याला बाहेर फिरायला जाण्याबाबत मुद्दामच विचारले,तिने सांगितले एकेठिकाणी मला जायचय,महत्त्वाचे काम आहे.नाहीतर संध्याकाळी आपण फिरायला जावूयात.

   संदीप जरा विचारात पडला असा कोण आहे की ती अनोळखी व्यक्तीसाठी आज मला वेळ देत नाही.

  त्याने या गोष्टीकडे जरा कानाडोळा केला.

  संध्या भेटून आली.संध्याकाळी संदीप बरोबर फिरून आली.रात्री मस्त पावभाजीचा बेत केला.सर्वजण आनंदात होते.

  सोमवारी सकाळीच परत बबलूचा मेसेज"आज परत ये.मला तुला काही दाखवायचेय,आणि चर्चा पण करायचीय."

   संध्याचे मेसेज आता संदीप पाहू लागला.आजपर्यंत तो कधी तिच्या मोबाईलला हात लावत नव्हता.पण बबलूच्या मेसेजने त्याला विचार करायला भाग पाडले.

   संध्या कोणाशी बोलते,हा बबलू कोण?,संध्याला त्याला काय सांगायचेय?,संध्या आपल्याला न सांगता का जाते?अशा अनेक विचारांनी त्याचे डोके चक्रावते.

  तरीपण संध्याचे वाकडे पाऊल पडणार नाही हे तो मनाला पटवत होता. 

  दहा,बारा दिवस झाले असेच चालू होते.एक दिवस संदीपने तिला विचारले"अग,हा बबलू कोण आहे.?"

  संध्या पटकन मोबाईल हाती घेते व विचारते"म्हणजे तुम्ही माझा मोबाईल चेक करता?माझ्यावर विश्वास नाही का तुमचा?" 

  झाले जरा दोघांमधे वाद होतात.संदीप कामाला जातो.संध्या कामाला लागते.

  संध्याकाळी घरी आल्यावर मात्र संध्या घरी दिसत नाही म्हटल्यावर तो आईला विचारतो "कुठय संध्या?"आई म्हणते तिला फोन आला होता गेली ती"

 आता मात्र संदीप चिडतो.तिच्या येण्याची वाट पाहत बसतो.तिला यायला रात्र होते.ती आली की प्रश्नांची सरबत्ती सुरू करतो."कुठे गेली होतीस,मी आठवडा होवून गेला तुझी नाटकं पाहतोय,कोण हा बबलू ,त्याने बोलावले की तू का जातेस,मलाही वेळ देईना हल्ली?"

  संध्या या प्रश्नांना सामोरी जाण्यास तयार नसते.तिला कल्पनाही नसते की घरी गेल्यावर असे काही होईल.ती शांत बसते.उत्तरे न देता जेवणाच्या तयारीला लागते.पण संदीप तिला खूप बोलतो.व चिडून बोलतो,"जा तू घराबाहेर पड .नको राहू इथे,मला काय ते सांग ,नाहीतर माहेरी निघून जा,नाही थांबायचे माझ्या घरात."

  संध्या आता शांतपणे निमूट बॅग भरते व घरातून बाहेर पडते.सासूसासरे दीर नणंद तिची छोटी खूप आडवण्याचा प्रयत्न करतात पण ती निघते.

   इकडे माहेरी आल्यावर आईबाबा विचारतात"का ग,एवढ्या रात्री का आलीस?जावई कुठे आहेत?" ती त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देते.आई बाबा तिचे सांत्वन करतात.जेवायला घालतात व झोपेपर्यंत तिच्या उशाशी बसतात.

 इकडे दुसर्‍या दिवशी सासूसासरे सकाळीत घराबाहेर पडतात.अनाथालयात जातात.बबलूला भेटतात.त्याला घरी घेवून येतात.बबलू अवघा अकरा वर्षाचा मुलगा असतो.

  संदीप पाहतो,आईबाबांनी एका मुलाला आपल्याबरोबर आणलयं .संदीप म्हणतो,"कोण आहे हा?इथे का आणलयं त्याला?"

  आईबाबा सांगतात "हा बबलू."

 संदीप बोलतो "काय' हा बबलू."

   आई बोलायला सुरूवात करते"हो,हा बबलू ,संध्या याच्याचकडे जात होती.हा गेली दहा दिवस खूप आजारी होता.तिने आम्हांला सर्व सांगितले होते.त्याची सेवा करायला ती जात होती.हा अनाथालयात वाढतोय.पण हा तुझाच मुलगा आहे.लग्नाआधी तू एका मुलीवर प्रेम केले.पण तुमचे लग्न होवू शकले नाही.तिचे बाबा कर्मठ होते.तुमचे सूर जुळले.ती गरोदर राहिली.तिने मुलाला जन्म दिला व बाळांतपणातच गेली.तिच्या बाबांनी आम्हांला सर्व सांगितले.पण समाज काय म्हणेल म्हणून आम्ही गप्प बसलो.पण संध्याच्या कानावर आम्ही हे घातले होते.लग्नाच्याच आधी.तर संध्या म्हणाली ठीक आहे.मी सांभाळीन त्यालाही.आणि आता ती तिचे कर्तव्य पार पाडत असताना आम्हांला शपथ दिली होती.तुम्ही यांना काही सांगू नका.वेळ आली की मीच बोलेन.पण तू खूप मोठा गैरसमज करून घेतला व आम्हा दोघांना आज हे पाऊल उचलावे लागले."

  संदीप अवाक होतो.संध्याचे विचार किती लाखमोलाचे आहेत हे जाणतो.

  पटकन गाडी काढतो व संध्याला आणायला जातो.बरोबर बबलूलाही घेतो.

  संध्याच्या माहेरच्या दाराची बबलूला बेल वाजवायला सांगतो.बबलू बेल वाजवतो.संध्याच दरवाजा उघडते.बबलूला पाहून आश्चर्यचकीत होते.बबलू तिच्या गळ्यात पडतो.मिठी मारतो.मागे उभा राहिलेला संदीप हे क्षण नजरेत साठवून घेतो.संध्याला साॅरी म्हणतो.आईबाबांनी कसे हे कोडे उलगडले हे सांगतो.व तिला ह्रदयाशी कवटाळतो."मी खूप भाग्यवान आहेग संध्या,एवढी समजूतदार बायको मला मिळाली.आज तुमच्या सर्वांमुळे मला माझा मुलगा मिळाला.खूप खूप आभारी ग मी तुझा." असे म्हणत माहेराहून तिला आनंदाने घरी आणतो.सोबत बबलू असतोच हे सांगायला नको.

  इकडे सासूबाई आपल्या सुनेचे व नातवाचे औक्षण करून त्यांना घरात घेतात.

 आता संध्या व संदीप अती प्रेमान आपला संसार करत आहेत..

   


Rate this content
Log in