बालवाडीतील आठवण
बालवाडीतील आठवण


आता मुले दोन वर्षांची व्हायला लागली की त्यांना शाळेत घालतात. माझ्या लहानपणी असं काही नव्हतं. चार वर्षा पर्यंत मूलांना मस्त मजा करायला मिळायची. चार वर्षाचे झाल्यानंतर पाटी पेन्सिल व गणेश पुजेचे सामान घेऊन नवरात्रीत सरस्वती पुजन केलं जायचं. त्या दिवशी सकाळी वडील मुलाला घेऊन शाळेत गुरुजींकडे जायचे. शाळेत एकच गुरुजी असायचे.
गणेश पुजेच्या वस्तू गुरूजी समोर ठेऊन मुलांना गुरुजींना आदरपूर्वक नमस्कार करायला लावायचे. मग ते गुरुजी मुलांना जवळ बसवून पाटीवर पेन्सिलीने "श्री गणेशा", "ग म भ न" स्वतः लिहायचे. मग विद्यार्थांच्या हातात पेन्सिल देऊन, स्वतः त्यांचा हात पकडून, त्या लिहिलेल्या अक्षरांना दोन चार वेळा गिरवायचे. नंतर मुलं स्वतःच पेन्सिलने त्यावर गिरवत बसायची. घरी जाण्यापूर्वी विद्यार्थी पुन्हा एकदा गुरुजींच्या पाया
वर डोके ठेवून गुरुजींचे आशीर्वाद घ्यायचे. असा साधा सरळ शाळेतला प्रवेश असायचा. सगळ्या मुलांना तिथे सारखीच वागणूक असायची.
बाल मनावर गुरुजी एक महान पंडित, आदर्श व्यक्ती, असा ठाम विश्वास मुलांच्या मनावर असायचा. ह्याचं कारण म्हणजे आई वडील स्वतः गुरुजींचा मान ठेवायचे. आपण देवळात गेल्यावर देवाला वंदन करतो तसेच त्या काळी शिक्षकांचा, म्हणजे गुरुजींचा आदर ठेवत होतो. शाळेत मुलांना पालकांनी पोचवायची पध्दतच नव्हती. सगळी मुलं बरोबरच्या मोठ्या भावंडा बरोबर किंवा बाकीच्या मुलांबरोबर ये जा करायची. डबा, बाटली, आया, बाया, कुणी कुणी नसायचं. सगळी स्वावलंबी असायची. अडी अडचणीला गावातले लोकही एकमेकांना मदत करायचे.
ह्याच कारणाने आमच्यात मोठ्यांचा, गुरूजनांचा,
वाडवडिलांचा आदर सन्मान ठेवण्यांची वृत्ती निर्माण झाली.