Savita Jadhav

Others

1  

Savita Jadhav

Others

बालपण हरवतय

बालपण हरवतय

3 mins
497


आताच्या धकाधकीच्या जीवनात माणसातला माणूसपण हरवून चाललयं.... अगदी तसेच हरवत चाललयं मुलांचे बालपण. समाज सुधारतोय....नवीन तंत्रज्ञान, नव्या संकल्पना आकाराला येता आहेत, पण त्याचबरोबर जगण्याची, नव्हे, मुक्त आणि आनंदी जीवनाची व्याख्या पार बदलून गेलीय. त्यातच हरवलय मुलांचे बालपण. बालपण म्हणजे साधारण एक ते सहा वर्षे.... किती छान असायचा तो काळ,ते लहानपण, जिथं लहान मूल असलं की वातावरण गलबलून जायचं. आणि आता काय? मुलांचा गलबला ऐकू येतो तो पाळणाघरात. भौतिक सुखाच्या मागे माणूस इतका भरकटत चाललाय की मुलांचं बालपण अनुभवायला त्यांना वेळच नसते. कदाचित याला अपवाद असतीलही.

बालपणी दुडुदूडू धावणारी पावलं आता चार भिंतीच्या आत एखाद्या वन किंवा टू बीएचके फ्लॅटच्या आतच रेंगाळतात. त्यातूनही आई बाबा दोघेही नोकरी करत असतील तर.... बोलायला नकोच. गावातील लहान मुलांना त्यांचे बालपण अनुभवायला मिळत असेलही.


एक काळ होता तरी साधारण पंधरा वीस वर्षापूर्वीचा....जेव्हा लहान मुले मोकळेपणाने, चिंतामुक्त जीवन जगत होती. गल्लीतून क्रिकेट खेळायची,पतंग उडवत रानोमाळ भटकायची. सुरपाट्या, लगोरी, विटीदांडू असे कितीतरी खेळ खेळत मनसोक्त वावरायची. पाऊस सुरु झाला की कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडायच्या, कुणाची दूरवर जाते हे बघण्याची मजा सांगायला नकोच.लपाछिपी खेळताना आजीच्या पदरामागे, कॉटखाली जाउन लपायची मजा आताच्या मुलांना कुठे मिळते. दगडमाती, लाकडी खेळणी यांच्या सोबत खेळताना चा आनंद आता कुठे?


या सगळ्या पारंपरिक खेळ खेळण्याचा अल्लडणा,खट्याळ पणा हरवत चाललाय. या सगळ्याची जागा आता मोबाईल आणि तांत्रिक खेळण्यांनी घेतली आहे. पावसात हुंदडनं सोडाच, थोडे वाऱ्यात फिरले तरीही मुलांची नाकं गळायला लागतात.... आईबाबा स्वतः मोबाईलवर एवढे व्यस्त असतात की मुलांसोबत खेळायला वेळ कुठे असतो.

आजीच्या आजोबाच्या मांडीवर खेळणं,त्याच्याकडून गोष्टी ऐकत झोपणं,कोडकौतुक करून घेणं काय असतं, या सगळ्यातलं बालपण हरवत चाललय...अगोदर मुल सहाव्या वर्षी शाळेत जायचं पण आता तिसऱ्या वर्षी शाळेत पाठवतात. अगोदर शाळेत सुध्दा बालपण जगायला मिळत होते पण आता आपल्या मुलांना स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर सतत पुस्तकात डोके घालून बसले पाहिजे ही मानसिकता वाढायला लागली आहे. त्यामुळे मुलं अपेक्षांच्या ओझ्याखाली दबली जात आहेत. खेळण्या बागडण्याच्या वयात पुस्तकाचे ओझे, आणि एबीसीडीची घोकंपट्टी....याच्यातच त्यांचे बालपण हरवत चाललय... स्कूल आणि अभ्यास यात मुलांना एवढ व्यस्त ठेवले जाते की मैदानी खेळ सुध्दा मुलांना खेळायला मिळत नाहीत. शाळेत अभ्यास घरी आले की चार भिंतीच्या आत कोंडून घ्यायचे. त्यामुळे मुलांमधील एकटेपणा, चिडचिडेपणा वाढायला लागला आहे .

सतत टीव्ही, मोबाईल गेम्स, कार्टून्स यातच मुलं दंग असतात. यातच हरवतय बालपण...


पूर्वी चिंच, बोरे, आवळा, लेमनच्या गोळ्या मिळायच्या. त्यातच मूलं खूश असायची... आता त्याची जागा घेतली चॉकलेट आणि कँडबरीने. कितीही दिले तरी समाधान होत नाही. शिरा,उपमा, भेळ यासारख्या पदार्थांची चव किती छान... पण यांच्या जागा पिझ्झा, बर्गर सारख्या फुसक्या पदार्थांनी घेतली...जी मुलांच्या आरोग्य बिघडवतात... नकळतपणे अशा गोष्टी मुळेही त्यांचे बालमन आपण भरकटत नेतोय...म्हणजे काय तर आपणच आपल्या मुलांना बालपण मुक्तपणे जगून देत नाही. बालपण हिरावून घेतोय.

असं म्हणतात... मुलं म्हणजे देवाघरची फुलं.. मग त्यांचे बालपण हिरावून आपण ती फुलं कुस्करून टाकतोय असं नाही का वाटत?


लहानपण दे गा देवा

मुंगी साखरेचा रवा

कसं या चिमुकल्या मनाला नाही का म्हणता यावे. यासाठी पालकांना जागरूक व्हायला हवे.


तुम्ही जगलात ना? मग आता या चिमुकल्याना पण जगू द्या.

कितीतरी नाजूक, कोवळं असतं मन,

भरू द्या अवखळ खोड्यानी ते बालपण,

नका लोटू चॉकलेट नि कँडबरीच्या विळख्यात,

नका सोडू पिझ्झा, बर्गरच्या कचाट्यात,

नको ते अवेळी आलेलं शहाणपण,

जगू द्या मुलांना अल्लड बालपण.


Rate this content
Log in