बाल संस्कार कथा- २ चोरी करू नये
बाल संस्कार कथा- २ चोरी करू नये
आज राजू शाळेत आपले दप्तर कोणालाच दाखवत नव्हता. उगाच तो सगळ्यांपासून लपवून ठेवत होता. काहीच कळत नव्हते. सोनू, हर्ष, वीरू देखील राजूच्या वागण्याने हैराण झाले होते. 'राजू, असे काय करतोस, तू काय लपून ठेवले? दाखव बर आम्हाला.' सोनू वैतागून सांगत होती.
खरंतर राजूने काहीतरी लपवले होते, पण तो कोणालाच दाखवत नव्हता. हे देखील समजले नसते, पण हर्षने त्याच्या दप्तरातून बालभारतीचे पुस्तक घेण्यासाठी हात घातला, तेव्हा राजूने जोराने ओरडून त्याला दप्तराला हात लावू नको म्हणून बजावले. यावर सगळ्यांना संशय आला की राजूच्या दप्तरात काहीतरी आहे. तेव्हापासून सर्वजण त्याच्या पाठीमागे लागले होते, की दप्तरात काय आहे दाखव म्हणून. परंतु राजू काही ऐकत नव्हता.
शेवटी सगळे राजू ला घेऊन नूर ऑंटीच्या घरी गेले. कारण नूर ऑंटी राजू कडून सत्य बोलावणारी होती. हे चौघे जण तिच्या घरी आले आणि त्यांनी सर्व काही सांगितले. तेव्हा नूर ऑंटीने राजुला खाली सोफ्यावर बसवले आणि प्रेमाने विचारले, 'राजू काय झाले बाळा? असा काय करतोस, बच्चे तुम मुझेसे झुट नही बोलोगे. सच बताओ क्या हुआ ?' मग राजुने खरे बोलण्यास सुरुवात केली. राजूच्या मोठ्या भावाकडे डिजिटल वॉच होते ते राजुला खूप आवडले होते. राजू सांगत होता, 'मला भैय्याचा वॉच खूप आवडला होता. त्याला मी एक दिवसासाठी मागितला, पण त्याने दिले नाही. म्हणून मी त्याला न विचारताच आज घड्याळ आणले.'
'अच्छा, म्हणून तू तुझे दप्तर कोणाला दाखवत नव्हता. ठीक आहे राजू मला पहिल्यांदा सांग, तुला तरी हे पटतंय का? न विचारता कोणाचीही वस्तू घेणे!! तुला जशी ही वस्तू आवडते, तशीच तुझ्या भावाला देखील आवडत असेल ना? तो हे घड्याळ शोधत असेल. तो घाबरत देखील असेल, मम्मी-पप्पा त्याला रागवतील म्हणून. हे घड्याळ तु घेतले हे त्याला कळाल्यावर पुढे तो तुला काहीच दाखवणार नाही आणि देणार ही नाही. दुसरी गोष्ट चोरी करणे हा तर गुन्हा आहे. अशी सवय बरोबर नाही.'
नूर ऑंटीने समजावल्यावर राजू उठला आणि घरी जाऊन त्याने त्याच्या भय्याची क्षमा मागून ते घड्याळ परत केले. त्याच्या भय्याने देखील त्याला मोठ्या मनाने क्षमा करून घड्याळ एका दिवसासाठी घालण्यास दिले.
संदेश :- चोरी करू नये आयुष्यात कधीच अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.
