अति चहा पिणे
अति चहा पिणे


लहानपणापासून चहा प्यायची सवय लागली होती. लहान असताना आपण चहा प्यायला लागलो की मोठं झाल्यासारखं वाटायच. दूध नको, चहाच द्या, असं म्हणून घेत होतो त्याची सवयच पडली.
हा चहा एवढा आवडू लागला की सकाळी उठल्याबरोबर एक कप, मग पुन्हा न्याहारी करताना दुसरा कप, एक लहर आली म्हणून दुपारच्या जेवणा अगोदर अर्धा कप, संध्याकाळी सर्वांबरोबर एक कप आणि तिन्हीसांजेला पुन्हा अर्धा कप. एखादेवेळी कुणाकडे जाणे झाले तर तेथे ही चहाला नाही म्हणायची सवय नव्हती.
पुढे रात्रीचे जागरण करून कॉलेजचा अभ्यास करायला लागले. झोप येते म्हणून कडक चहा घेऊ लागले. बी.एड.चा अभ्यास ही रात्री जागून व चहा पिऊनच केला.
टीचर झाले. मग तर चहा शिवाय तोंडाचा पट्टा चालतच नव्हता. एक दिवस शाळेत चहा मिळाला नाही, म्हणजे चहा बनवणारा शिपाई आला नाही, तर माझी तारांबळ व्हायची. मग बाहेरून चहा मागवून पित होतो. तसे यात बाकीचे शिक्षक ही होतेच म्हणा, पण त्यांना एकवेळ चहा शिवाय चालत होतं. पण माझं डोकं जाम दुखायचं. चहाचा कप तोंडाला लावला की मस्त तरतरी यायची. टी म्हणजे टीचर हे मला बरोबर लागू पडले होते.
चहा उत्साहवर्धक पेय ह्याची मला खात्री पडली होती. मी चहाच्या अधिन झाले होते. घरी कधी दूध नासलं आणि दुसरं येई पर्यंत वेळ लागेल तर मला राहवत नव्हते. मी तसाच कोरा, दुधा शिवाय चहा घेत असे.
आता असा चहा म्हणजे आरोग्याला हानिकारक.
चहाचे सेवन जास्त केल्याने पित्त वाढू लागले. नुसता चहा पिऊ नको, त्याबरोबर काही तरी खा, असे घरातल्या सगळ्यांनी, माझ्या मुलींनी ही सांगीतले, पण सकाळचा चहा नुसताच घेण्यातच मला जास्त समाधान वाटायचे. चहाने भूक मरते असे म्हटले जाते. जेवणा अगोदर चहा घेतला तर जेवण नीट होत नाही हे ही मी अनुभवलंय.
आता ही अति चहाची सवय खूप वाईट आहे हे मला मनोमन पटलयं. त्यामुळे मला आता पित्ताचा खूप त्रास ही होत आहे. त्याच करता मी ही माझी वाईट सवय कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. हळूहळू मी हा चहा कमी करतेय. म्हणजे दुपारच्या जेवणा अगोदरचा व तिन्हीसांजेचा चहा आता घेत नाही. आता फक्त तीन वेळा चहा घेते, पण हळू हळू कमी करत राहणार. चहा काही एवढा वाईट नाही पण अति पिणे हे काही चांगले नाही व त्याचा त्रास ही होतो म्हणून मी ही सवय मोडणार आहे.