Deepali Thete-Rao

Others

3.4  

Deepali Thete-Rao

Others

अंगठी

अंगठी

2 mins
323


"अग अशी उदास का होतेस? तुझे आई-बाबा आता आपल्याच गावात आलेत ना रहायला? मग! भेट होतच राहिल आता. चल आटप लवकर. निघायला उशीर होतोय. घरी माझी आई भुकेली असेल. यापुढे जाऊन अजून स्वैपाक करायचाय. तिची जेवणाची वेळ चुकायला नको. चल चल", सुनील बोलत होते पण शब्द फक्त तिच्या कानावर पडत होते. मेंदूपर्यंत पोहोचतच नव्हते. तिला फक्त समोर बेडवर पॅरॅलाईज्ड होऊन पडलेले तिचे बाबा आणि त्यांच्या शेजारी बसून मालीश करणारी आई दिसत होती.


...काही दिवसांपूर्वीच गोष्ट. अचानक त्रास होऊ लागला म्हणून अॅडमिट केलेले तिचे चालते-बोलते बाबा पॅरॅलाईज्ड होऊन घरी परतले होते हॉस्पिटलमधून. दुसऱ्या गावात ये-जा करणं अशक्यच होतं तिलाही. म्हणूनच तिच्याच गावात घर बघितलं होतं तात्पुरतं. डोळे भरून वाहात होते. खरंतर त्यांच्या इतक्या मोठ्या घरात सहज सोय झाली असती दोघांची पण...


"अगं निघ गं लवकर. चांगली सोय आहे दोघांची इथे. तू आता फार विचार नको करूस. त्यांची काळजी घेतील आता ते. एकुलती एक असलीस तरी काय झालं सोड आता जरा आई-बाबांना. नीघ. माझी आई वाट बघत असेल. " तिला आईला जवळ घ्यायचं होतं.. बाबांना अजून काही वेळ शांतपणे बघायच होतं.... दोघांना काय हवं-नको विचारायचं होतं...  नुसतीच घुसमट..

  

ती बाहेर आली. कोपऱ्यापर्यंत गेल्यावर काहीतरी आठवले. ती चहूकडे नजर फिरवू लागली. बॅगमधेही शोधू लागली. 

"काय गं? आता काय झालं? "

"अहो माझी अंगठी.....बोटात नाही. आईकडे पडली की काय?"

"वेंधळीच आहेस झालं. इतकी "किंमती" वस्तू अशी कशी कुठेही सोडतेस. जरा वज नाही बघ तुला. जा आता परत जाऊन बघून ये."


ती परत घरी आली. आई, बाबांच्या डोक्यावरून हात फिरवत रडत होती एकटेपणामुळे. रडणाऱ्या आईला जवळ घेऊन ती शांत करू लागली. तिचेही डोळे कुठे कोरडे राहिले होते. बाहेरून बाईकचा हॉर्न ऐकू आला. "सापडली का गं? बावळट कुणीकडची. एक वस्तू जपून ठेवता येत नाही नीट."

.............. 

आईचा निरोप घेतला तिने. तिला हवं-नको विचारलं. "लवकरच परत भेटेन", समाधानानं आश्वासन दिलं. डोळे पुसले आणि गाडीकडे चालू लागली. 

जाताना तिने पर्समधे हात घातला. आतल्या कप्प्यात नीट.. व्यवस्थित.. जपून ठेवलेली हिऱ्याची किंमती अंगठी हातानेच चाचपली... एकवार.


Rate this content
Log in