Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shobha Wagle

Others


3  

Shobha Wagle

Others


अंगापेक्षा बोंगा जड

अंगापेक्षा बोंगा जड

4 mins 670 4 mins 670

 

रावसाहेबांच्या घरी आज धावपळ चालली होती व त्याला कारण आज त्यांच्या मुलीला, संध्याला बघायला नवरा मुलगा येणार होता. रावसाहेब भल्या मोठ्या वाडवडिलांच्या घरात राहत. एकेकाळी उच्च श्रीमंत होते पण सध्या तशी परिस्थिती नव्हती. तरी ते खोट्या श्रीमंतीचा डौल दाखवत. मुलीला बघण्याच्या कार्यक्रमाचा पण एवढा दिखावा की मुलाकडच्या माणसांना त्यांची श्रीमंती दिसावी. मुला मुलीने एकमेकांना पसंत केले. साखरपुड्याची तारीख ठरवली व रावसाहेबांनी लगेच तो करून ही टाकला. साखरपुडा खूपच दिमाखात साजरा केला. मुलाला हिऱ्याची अंगठी व भारीतले कपडे घेतले. सगळ्या नातलगांना बोलवून, राजेशाही खानपान वगैरे देऊन, थाटामाटात साजरा केला. लगेच पुढच्या महिन्यात लग्न ही ठरवले. त्याकरता मोठा ए.सी वाला महागडा हॉल,भारी सजावट व उत्तम वेगवेगळ्या प्रकारचे खान पान ठेवले होते. मुलीचे दागदागिने, कपडे लत्ते, देणे घेणे सगळे लोकांच्या नजरेत येण्या सारखेच होते. तसेच तिच्या सासरकडच्या लोकांचा ही भरपूर मानपान केला होता. त्यांचा एवढा खर्च पाहून सासरचे लोकही चकीत झाले. सगळं राजेशाही थाटात केलं होतं.

मुलीला घरच्या परिस्थितीची जाण होती. पण बापापुढे तिचे काही चालले नाही. एवढा अवाढव्य खर्च रावसाहेबांनी आपल्या वाडवडिलांच्या जमिनी विकून केला होता. संध्याच्या सासरची माणसेही मऊ दिसतंय म्हणून कोपराने खणू लागली. काही महिन्यांनी संध्याच्या नवऱ्याला शेखरला अमेरिकेला जावं लागलं. तिथला त्याचा खर्च, सारा सासऱ्यांच्या अंगावर घातला. आणि रावसाहेबांनीही तो स्वखुशीने आपल्या श्रीमंतीचा डौल दाखवण्या करता कर्ज काढून पुरवला.

रावसाहेबांना एक राहुल नावाचा मुलगा ही होता. रावसाहेबांचे असे अनाठाई खर्च आई आणि मुलाला अजिबात आवडत नव्हते. रावसाहेबांची ही पद्धत फक्त मुलीकडच्यांना दाखवायला होती असे नव्हे तर त्यांच्या नात्यातल्या किंवा मित्र परिवारातल्या कार्याला सुध्दा खूपच दिखाऊपणा व भारंभार खर्च करून ते पैसे उधळत होते. बायको व मुलाने त्यांना समजावायचा खूप प्रयत्न केला. पण ते कुणाचेच ऐकत नव्हते. त्यामुळे आई व मुलाचा नाईलाज व्हायचा.

अशीच एक दोन वर्षे सरली. राहुल इंजिनियर झाला आणि एका परदेशी कंपनीत जॉब लागून तो न्यूयोर्क ला स्थाईत झाला. संध्याच्या नवऱ्याचे, शेखरचे ही तिथले काम संपले व तो ही भारतात परतला. त्याची कंपनी घरापासून थोडी लांब होती. येणे जाणे त्याला त्रासदायक होऊ लागले. तेव्हा कंपनी जवळच नवीन घर घ्यायचा विचार त्याच्या मनात आला. व त्याला शेखरच्या आईनेही दुजोरा दिला. "अरे तुझे सासरे एवढे श्रीमंत आहेत, मग घे कर्जाऊ रक्कम आणि बंगलाच घेऊन टाक." आईचे म्हणणे त्यालाही पटले. संध्याने विरोध केला, पण त्याने समजावले की मी कर्जाऊ घेत आहे, परत व्याजासकट फेडणार आहे. त्याप्रमाणे त्याने सासऱ्यांना सगळी आपली मजबूरी सांगितली व दिलदार सासरेबूवांनीही लगेच त्यांना पैसे देण्याची व्यवस्था केली. यांचा तर बैल रिकामा पण श्रीमंतीचा दिखाऊपणा अंगाशी आला. जावईबुवांना पैसे देणे जरुरीच होते मग शेवटी त्यांनी विचार केला व आपला राहता वाडा सावकाराकडे गहाण ठेवला व जावयाला पैसे देऊन टाकले.

दिवसामागून दिवस जाऊ लागले. श्रीमंतीचा तोरा दाखवणे अंगाशी येऊ लागले तरी रावसाहेबांचा बोंगा वाजतच होता. मध्येच संध्याचे बाळंतपण आले. बाळंतपणाचा खर्च, लहान बाळाचं बारसं या सगळ्यात पुन्हा अवाढव्य खर्च केला गेला. रावसाहेबांची वागणूक राहुलला अजिबात आवडत नव्हती. यामुळेच बाप लेकाचे नीट पटत ही नव्हते. राहुलची तिकडच्या एक परदेशी मुलीशी दोस्ती जमली व त्यांने तिच्याशी लग्न केले व परदेशीच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

‌रावसाहेबांचे कर्ज खूप झाले होते. आणखी कर्ज मिळणे कठीण झाले होते. अशावेळी एवढा मोठा वाडा दोघांना कशाला?, कोणी भाडेकरू ठेवले तर माणसांची सोबत लाभेल व थोडे पैसे ही मिळतील या उद्देशाने भाडेकरू ठेवले. नंतर तर कर्जाचे हप्ते देण्याकरता रावसाहेबांनी बायकोचे दागिने ही गहाण ठेवावे लागले. त्यामुळे बाईंनी लोकांच्या लग्नाला जायचेच सोडून दिले. लग्न समारंभात बायांना दागदागिने लागतातच. आता पैशाची इतकी चणचण झाल्यावर दागिने कसे परवडणार? शेवटी अशी परिस्थिती उत्पन्न झाली की आता निभावायचे कसे? मग संध्याच्या आईने दोन काम करणाऱ्या बायांच्या मदतीने जेवणाचे डबे बनवण्याचे काम सूरू केले. तिच्या हाताला ही चव चांगली होती. हळुहळू संसाराची गाडी रुळावर येत होती.

पण घर गहाण ठेवले होते. त्याची मुदत संपायची वेळ येत होती. कर्जदाराने तगादा लावला होता. रावसाहेबांना काही सुचेना. पच्छताप करायची वेळ आली. जिवाचे काही बरे वाईट करावे तर नंतर कर्जदार बायकोला त्रास देतील हा ही विचार त्यांच्या मनात येऊन गेला. त्यांच्या मित्रांनी सुध्दा मदतीचा हात पुढे केला नाही. हे नेहमी आपल्या मित्रांकरता, त्यांच्या बायका मुलांकरता खूप काही करत होते. पण माणूस एकदा अडचणीत आला किंवा पैशाचा प्रश्न आला की मित्र वगैरे कुणी जवळ राहत नाहीत. तशीच स्थिती रावसाहेबांची झाली होती. त्यानी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. काही खाईनात की कुणाशी बोलेनात. बायको घाबरली व तिने मुलीला निरोप पाठवून बोलवून घेतले. संध्या व शेखर दोघे ही लगेच आले. त्यांना रावसाहेबांचे सगळे व्यवहार सांगितले. त्यांना ही थोडा अंदाज होताच.

आपल्या सासऱ्यांचा अंगापेक्षा बोंगा जड हे शेखरला कळून चुकले होते. मुलीसाठीच नव्हे तर सर्वच गोष्टीत उगाच आपल्या नसलेल्या श्रीमंतीचा डौल मिरवून ते आपली सर्व मालमत्ता घालवून बसले होते. शेवटी काही झाले तरी त्यांना त्यातून बाहेर काढणे गरजेचे होते. तेव्हा जावयांनी दोन समजुतीचे शब्द सांगितले. "आपल्याकडे जे आहे त्याच प्रमाणे वागावे. दुसऱ्यांना बरे वाटावे, आपल्याला चांगले म्हणावे, म्हणून असे वागणे हितकारक नाही. मी घराकरता पैसे मागितले आणि तुम्ही लगेच दिले. मला कर्ज काय तुमच्याकडूनच घ्यायचे होते? दुसरीकडून घेतले असते की. मला संध्याने तुमच्या स्वभावाबद्दल सांगितले होते आणि मला ही तुम्हाला पारखायचे होते. म्हणून मुद्दाम तुमच्याकडे पैसे मागितले. तुमच्यामुळे आईंना किती त्रास झाला? तुमचे पैसे आहेत माझ्याकडे, काळजी करू नका. उद्याच आपण घर सोडवून घेऊ. आईचे दागिने ही आणू. पण एक लक्षात असू द्या, श्रीमंतीचा बुरखा घेऊ नका आणि फुकटचा दिमाख दाखवू नका", असे म्हणून जावयाने त्यांची समजूत काढली. "हो रे बाबा, अंगापेक्षा बोंगा जड झाला. माझे डोळे आता चांगलेच उघडलेत. जावईबापू, खूप आभार तुमचे" असं म्हणून रावसाहेबांनी जावई शेखर व संध्याला जवळ घेतले.

लक्षात घ्या अंगापेक्षा बोंगा जड कधीच होऊ देऊ नका.

                 


Rate this content
Log in