अंधश्रध्दा
अंधश्रध्दा




संकुचित मनाची विचारसरणी म्हणजे अंधश्रध्दा.
प्राचीनकाळी किंवा पूर्वी अंधश्रध्दा अफाट पसरलेली होती. त्याला कारण ही तसेच होते. सर्वसाधारण लोक शिक्षित नव्हते. त्यांचा विश्वास देवावर आणि भोंदू साधू बाबांवर होता. त्यामुळे रोगराई झाली की झाडापाल्याचे औषध करायचे व दुखणे विकोपाला गेले की बुवाकडे अथवा त्रांत्रिक मांत्रिकाकडे जाऊन जादू- तोणा, मंत्र-जप, होम-हवन, कोंबडा,बकऱ्याचा बळी चढवायचे. चुकुन एखादेवेळी माणूस बरा व्हायचा तर कधी मृत्यू ही व्हायचा. बरं झालं तर भोंदूबाबा की जय हो, मृत्यू झाला तर देवाचा कोप झाला म्हणून नशिबाला दोष द्यायचे.
त्यांच्या मनावर ते इतके बिंबवलेले होते की, मांत्रिक बुवांनाच ते श्रेष्ठ मानायचे. अशाने त्यांचे खूप नुकसान व्हायचे. त्यांचे नाहक बळी जायचे. लोक अंधश्रध्देवरच जगायचे. शिकलेल्या लोकांनी काही सांगायचा प्रयत्न केला तरी त्यांना ते पटायचे नाही.
मूल होत नाही, चला बुवा कडे. नोकरी मिळत नाही, लग्न होत नाही ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते देवाचा कौल मागायचे. आता पुरोहिताची हातचलाखी त्यावर त्यांचे भवितव्य ठरायचे. सगळे एकूण अंधश्रध्देच्या आहारी गेले होते.
ही अंधश्रध्दा आजही बऱ्याच प्रमाणात लोकांमध्ये पहायला मिळते. त्याकाळी लोक अशिक्षित अडाणी होते, पण आता नवल हेच वाटते की शिक्षित अन् उच्च शिक्षित लोक अजूनही जादू- तोणा, मंत्र-मांत्रिकावर विश्वास ठेवतात.
आज नव्या टेक्नॉलॉजिच्या जगात वावरून,
परग्रहावर यान सोडून जागतिक प्रगती अफाट झालेली आहे तरी आपल्या देशात अजून ही काही लोक मागासलेल्या लोकांसारखे वागतात तेव्हा अतिशय चिड येते.
बाबा आमटे व इतर लोकांनी अंधश्रध्दा निर्मुलन करण्याकरिता खूप काही केले त्यामुळे लोकांची विचारसरणी बदलली. तरी अजून काही लोक आहेतच.
आपण सर्वजण जाणतो स्व. दाभोळकर सरां बाबत. त्यांनी अंधश्रध्दा निर्मुलनाकरिता किती खटाटोप केला, पण तरी काही समाजकंटकांनी त्यांना विरोध केलाच. अशांना काय म्हणावे?
आपण बायकांना दोष देतो, त्या अंधश्रध्देला बळी पडतात म्हणून, पण तेवढच नाही तर पुरुष, तो ही शिकलेला, अंधश्रध्देच्या जाळ्यात अडकलेला आहे. त्यातून त्यांना बाहेर काढणे कठीणच!
जो पर्यंत स्वतः माणूस बदलत नाही तो पर्यंत काही ही होणार नाही. प्रत्येकाने अंधश्रध्देपासून दूर राहिले पाहिजे आणि अंधश्रध्देला विरोध केलाच पाहिजे.