अहंकार मनी धरु नये.
अहंकार मनी धरु नये.
मंडळी ससा कासवाची शर्यत तुम्हां सर्वांना माहितच आहे.सशाला आपल्या जोरात पळण्याचा गर्व झाला होता.लुसलुशीत गाजराचा मोहापायी तो शर्यत हरला होता.कासव मंदगती असून स्थिर चालीमुळे जिंकले.ही गोष्ट सर्व कासवजातीला अभिमानाची ठरली.मग काय नातवंडे पतवंडे आपल्या पूर्वजांच्या कहाण्या अतिरंजित करून सांगत. बाजूने एखादा ससा बाजूने गेला की त्याला चिडवून दाखवीत या गोष्टीला सशेभाऊंची नातवंडे कंटाळून गेले. त्यांची मिटिंग ठरली. ज्युनिअर कासव सेनेचे काय करावे बरे? सगळे म्हणाले परत शर्यत लावू या. पूर्वजांची चूक सुधारू या. कशाशाच मोह करायचा नाही. जिंकलो की त्यांना चिडवायचेही नाही .पण हा विषय़ बंद करायचा. अहंकाराला विनम्रतेने उत्तर देऊ. झाले ठरले. सशाचे शिष्टमंडळ कासवांना भेटायला गेले.त्यांचा प्रस्ताव कासवांसमोर मांडला. अहंकाराने भारलेल्या कासवांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला.
सशाचे शिष्टमंडळ नाराज होऊन परतले. हा प्रस्ताव कासवांना महागच पडला असता . कारण आता ससे सावध आहेत. आपण नक्कीच हारून जाऊ.मग त्यांना आपण नाही चिडवू शकणार.त्यांच्या अहंकाराला तडा गेला असता.
सशाचे शिष्टमंडळ नाराज होऊन एकत्र बसले होते. त्यांना काहीच सुचत नव्हते. तितक्यात त्यांच्यातील जाणत्या सशाने सांगितले" वेळ हे सगळ्यात चांगले औषध आहे. सध्या तुम्ही लक्ष देऊ नका. कुणाची चूक होतच नाही असे नाही. बुध्दिवान असलेला माणूस ही चुकतो.मग आपल्यासारख्या प्राण्यांचे ते काय ?कासवही काही विशेष मोठे नाही .त्यांची अजूनही तीच गती आहे.पाहू काय होते ते. तुम्ही फक्त संयम ठेवा. माैनं सर्वार्थ साधनम्! " दुसरा कोणता पर्याय ही नव्हता. वेळेची वाट पहायचे ठरवून सगळे जड अंत:करणाने आपापल्या घरी गेले.
असेच काही दिवस गेले. ससा नेहमीप्रमाणे उड्या मारत रानात फिरत होता.
त्याने पाहिले कासव पकडण्याची माणसांची शिकारी टोळी आली आहे.आता कासवांचे काही खरे नाही. तो खूप खूश होतो. पण क्षणभरच .लांबून त्याला एक कासव हळूहळू येताना दिसते. त्याच्यामागचे बरीच कासवे होती. सगळी कासवे आता फसणार. त्याने कोणताही विचार केला नाही . टुणटुण ऊड्या मारत त्यांच्या दिशेने निघाला. कासवांना ते दिसले. त्यांना कळेना आपलीच फजिती करून घ्यायला ससेभाऊ इथेच का येत आहेत? धापा टाकत ससा तेथे पोहोचला. त्याने सर्व हकिकत त्यांना दिली.धोक्याची सूचना दिली.
कासवांना लाजल्यासारखे झाले. सगळा अहंकार गळून पडला.त्यांनी माफी मागितली. पुन्हा न चिडवण्याचे वचन दिले. तेव्हापासून ससाकासव आजूबाजूला फिरताना दिसतात.अहंकाराचा पराभव झाला.