अधूरे प्रेम(भाग.३)
अधूरे प्रेम(भाग.३)


कॉलेजला एसटी तून जाण्याचा अनुभव पण खूपच भारी होता. सकाळी सात वाजता बस असायची.
ड्रायव्हर एकच असायचा रोज. कंडक्टर फक्त बदलून यायचा. त्या बसमध्ये रेडिओ एफ एम ची सोय करण्यात आली होती.
सकाळी मस्त जुनी गाणी ऐकायला मिळत होती.
कधीकधी बसायला जागा मिळायची....
जरी जागा नाही मिळाली...
पूर्ण रस्ताभर जरी उभं राहून गेलं तरीही...
गाणी ऐकत... घाटातून हेंदकाळे खात....जायला भारीच मजा वाटायची.
पावसाळ्यात तर जणू निसर्गाच्या कुशीत विसावल्याचा भास व्हायचा. पडणारा पाऊस, डोंगरावरून कोसळणारे पाणी, हिरवीगार झाडे कसलं भारी वाटायचं.
आणि हिवाळ्यात तर दाट धुके असल्यावर काही बोलायला नकोच. सकाळच्या प्रसन्न वेळी कॉलेजला जाण्याचा अनुभव खूप छान.
कॉलेजच्या लंच ब्रेक मधे अर्धवट डबा खायचा आणि अर्धा घरी येताना एसटी मधे खायचा. दुपारी एसटी रिकामी ....जागाही मिळायची.
कॉलेज लाइफ मस्त चालू होते.
अंजलीला गाण्याची फार आवड होती.
पहाटे पासून कॉलेजला जाईपर्यंत. आल्यानंतर दिवसभर ते रात्री झोपेपर्यंत. एफ एम काही बंद व्हायचा नाही.
<p> एखादे आवडते गाणे लागले की पटापट लिहून घ्यायची. काही लिखाण राहिले तर पुन्हा कधी ते गाणे लागले तर ते पूर्ण करायची.
छंदच जडला होता तिला. गाणं पूर्ण लिहून झाले की सुंदर अक्षरात दुसऱ्या वहीत लिहून ठेवायची.
शाळेच्या अभ्यासाप्रमाणे गाण्याची सुध्दा कच्ची नि पक्की वही होती.एक वही कॉलेजला जातांना सोबत न्यायची. मग लंच ब्रेक मधे जो वेळ मिळेल तेव्हा मैत्रीणीच्या घोळक्यात सुरेल आवाजात म्हणून दाखवायचे.
मैत्रीणी फिदा व्हायच्या अगदी. हा रोजचा दिनक्रम बनला होता.
हळूहळू दिवस पुढे सरकत होते. सहामाही परिक्षा झाली. मार्क पण छान पडले. हुशार विद्यार्थी मधे गणली जात होती.
पण म्हणतात ना..
आयुष्यात कधी ना कधी वेगळे वळण येतेच...
अंजलीच्या बाबतीतही असचं घडले....
कॉलेजला जायला लागल्या पासून तिचं मन मुक्त, स्वच्छंदी पक्षाच्या प्रमाणे झेप घेऊ पाहत होते. अभ्यास, खेळ, निबंध, वक्तृत्व स्पर्धा यासारख्या विविध क्षेत्रात ती पुढे पुढे जात होती.
आणि या सगळ्या बरोबर...
तिच्या आयुष्याला सुध्दा ...
वेगळ्या वळणाची चाहूल लागली होती...