Supriya Jadhav

Others

5.0  

Supriya Jadhav

Others

अधुरी एक कहाणी..........

अधुरी एक कहाणी..........

4 mins
590


  माघ महिन्यातली प्रसन्न सकाळ. हवेत एक प्रकारचा आल्हाददायक गारवा होता. सकाळची ७:३० ची वेळ. गीता अन् तिचे पती नाष्टा करत होते. दोघांनी एकत्र सकाळचा चहा, नाष्टा घ्यायचा, थोड्या गप्पा-टप्पा मारायच्या अन् दिवसाची छान सुरुवात करायची हे त्यांचं पहिल्यापासूनचं रूटीन होतं. चहा घेत गीता पतीला बोलली, "आज काय विशेष" त्यावर ते काही बोलले नाहीत. ८:०० वाजता ते ऑफिसला निघून गेले.

        

         गीता ही लगेच कामाला लागली. तिने भरभर सगळी कामे उरकली अन् पेपर वाचत बसली होती. तेवढ्यात डोअर बेल वाजली,तीने दार उघडलं. दारात तिची प्रिय मैत्रीण मीरा उभी होती. तिला बघुन गीताला खुप आनंद झाला. मीरा तिची जिवाभावाची मैत्रीण होती. "किती दिवसांनी येतेयस गं, आज आठवण आली का माझी?" असं बोलत दोघी सोफ्यावर येऊन बसल्या.


        

बऱ्याच दिवसांनी त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. बेसनाचा लाडू खात व चहा घेत त्यांच्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात गीताचा मोबाईल वाजला, तिच्या पतिदेवांचा फोन होता, "मॅडम मेसेज पहा मोबाईल वर". तिच्या पतीचा मेसेज होता व्हॉट्स अपवर. संध्याकाळी लवकर तयार रहा आवरून, अन आज ड्रेस घालू नका बरं, माझ्या आवडीची गुलाबी रंगाची साडी नेसा आज, छान दिसता तुम्ही त्यात, बच्चे कंपनीला ही तयार ठेवा. तुमच्या आवडीच्या गार्डन हॉटेल मध्ये कॅंडल लाईट डिनर घेतोय आज आपण". गीताने मेसेज वाचला नी ती खुदकन हसली."अरे वा!लक्षात आलं वाटतं आज काय विशेष आहे ते" ती बोलून गेली. मीराला तिने विचारलं"आज तुमचा काय प्लॅन आहे? व्हॅलेंटाईन डे आहे आज".मीराच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

       

      मीरा सुखवस्तू घरातली. दोन मुलं. मुलगी लग्न होऊन ती सासरी गेलेली. मुलगा अजुन शिकत होता. प्रेमळ पती ,खुप छान चाललं होत त्यांच, सुखी कुटुंब होत ते. पैसा अडका, दागदागिन्यांची काही कमतरता नव्हती तिच्याकडे. पण ती नेहमी साधिच रहायची. गीता तिला म्हणायची," किती साधी रहातेस गं तू, त्यावर ती म्हणायची "तुझीच मैत्रीण आहे मी" आणि दोघी छान खळखळून हसायच्या.

     

        सावळ्या रंगाची मीरा नाकीडोळी निटस होती. ती स्मार्ट दिसायची. अशा शांत अन सुस्वभावी मैत्रीणीच्या डोळ्यात आलेल पाणी पाहून गीताने तिला विचारल "काय झालं गं?" ती म्हणाली "कसला आलाय व्हॅलेंटाईन डे" गीताने विचारलं "भांडण झालं की काय दोघांच?" तीने मानेनचं नकार दिला."एवढा चांगला पती तुझा, मग काय झाल गं, काही प्राॅब्लेम आहे का?" गीताने विचारलं.त्यावर ती बोलली "काही नाही गं असचं......." त्यावर गीता बोलली, "काही नाही काय?काय ते सांग मला तुला कसलं दु:ख आहे ते, तुझ्या प्रिय मैत्रीणीला सांगणार नाहीस का?" तिच्या समोर पाण्याचा ग्लास धरत गीता बोलली. "डोळे पुस नी हे पाणी पी बरं, अन आता सांग काय झाले ते......

       

       मीरा आवंढा गिळून बोलू लागली."आज मला केशव ची खुप आठवण येतेय ". गिताने विचारल "हा केशव कोण? तु यापूर्वी त्याच्याबद्दल काहीच बोलली नाहीस". मीरा सांगू लागली. "केशव माझ्या आत्त्याचा मुलगा. आमच्या दोघांच्या जोडीला नजर लागली बघ लोकांची. केशवला मी आवडत होते. त्यानं ग्रॅज्युएशन पुर्ण केल होतं. २०व्या वर्षापासून तो प्रवचन देऊ लागला होता. लवकरच त्याची किर्ती पंचक्रोशीत पसरली होती. आमच्या घरी ही आध्यात्मिक वातावरण होतं. वारकरी संप्रदाय असलेल्या आमच्या कुटुंबात, भजन, किर्तन, प्रवचन नेहमीच सुरु असायचं. १० किलोमीटरवर गाव असलेल्या केशवचं आमच्या घरी नेहमी येणं जाणं असायच".

       

          मीरा सांगत होती "आम्ही तीन बहीणी व दोन भाऊ. मोठ्या बहीणीच लग्न झाल होतं. छोटी बहीण गोरीपान, मी सावळी पण केशव ला मीच आवडत होते. एके दिवशी तो तसं बोलला माझ्याजवळ. तो खुप गुणी चांगला मुलगा होता. मी त्याला विचारले मीच का आवडले तुला? त्यावर तो बोलला. "तुझ्या चेहऱ्यावर एकप्रकारचा आत्मविश्वास दिसतो मला, तुझ्यात एक वेगळाच स्पार्क आहे. प्रेम हे रंग, रुप पाहून होत नसतं. प्रेम व्यक्तिच्या अंतरात्म्यावर, गुणावर केलेल प्रेम, हे खरं प्रेम असतं."

  

  'ऊस ढोंगा परी रस नोहे ढोंगा, काय भुललासी वरलिया रंगा'

   प्रवचनकार तो ... बराच वेळ असं छान छान बोलत होता. जस त्याच बोलणं तसचं त्याच वागणं असायचं. दोघांची ही मनं जुळायला वेळ लागला नाही. तो म्हणायचा एक विठुमाऊली आणि एक तु दोघींवर श्रध्दा,भक्ती अन प्रेम आहे माझं. नुसत प्रेमचं नाही तर खुप श्रध्दा होती आमची एकमेकांवर. मला ठेस लागली तर त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. मीरा पुढे सांगत होती, एकदा मला काविळ झाली होती तर, त्यानं माझ्यासाठी कुठून, कुठून आयुर्वेदीक औषध आणली होती. त्या आजारपणाच्या काळात माझी काळजी घेत, पथ्यपाणी बघत तो माझ्याजवळ बसुन रहायचा. आमच्या दोन्ही ही घरातून आम्हाला विरोध नव्हता. आमची जोडी घरातल्या लोकांना मान्य होती. माझं ग्रॅज्युएशन पुर्ण झाल्यावर आमचं लग्न होणार होतं.

    

         मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होते. तेव्हाचा एक प्रसंग, तो उरणला प्रवचनाला निघाला होता. जाताना तो घरी आला होता. त्यादिवशी एकादशी होती. मी त्याला चहा दिला, तो त्याने घेतला. काही तरी कारणावरून मी त्याच्यावर लटकेच रागावले होते. चहा घेऊन तो प्रवचनासाठी निघून गेला.

    

          तासाभरातच आमच्या घरातलं वातावरण बदललं होतं. सगळ्यांचे चेहरे दु:खी झाले होते. 'काय झालय' ते कोणी मला सांगत नव्हत. कसं सांगावं हिला असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. शेवटी त्यांना मला सांगावचं लागलं. उरणला प्रवचनासाठी गाडीवरून जाताना, मागून त्याच्या गाडीला कंटेनर ने धडक दिली होती. तो जागीच गतप्राण झाला होता. हे ऐकुन मी कोलमडून गेले. अवघे आभाळ कोसळले होते माझ्यावर. आक्रोश करुन माझी शुध्द हरपली होती. सगळ संपलं होत आता. एक वर्ष मी डिप्रेशन मध्ये होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ञाकडे मला ट्रिटमेंट घ्यावी लागली.

      

         "चांगली माणसं देवाला आवडतात का गंमीरा बोलत होती. तो गेला तो दिवस होता १४ फेब्रुवारी ,अस सांगून मीरा रडू लागली. गीताच्या खांद्यावर डोक ठेऊन मीरा ढसाढसा रडू लागली. तिच्या अश्रूंनी गीताचा खांदा भिजून गेला होता. तिने तिला तशीच रडू दिली. तिचं मन मोकळ, हलकं होईपर्यंत. हलकेच थोपटत थोपटत तिला गिताने शांत केलं. मीराच्या आयुष्यातला एक हळवा कोपरा......खरं प्रेम हेच असत ना?......एका हृदयातून दुसऱ्या हृदयाला थेट जाऊन भिडणारं. कसलीही अपेक्षा न ठेवता केलेल निर्व्याज प्रेम'.तीचे प्रेम सत्ययुगातल्या मीरा सारखं भक्ती, श्रध्दायुक्त प्रेम गीताला वाटले. मीराच्या प्रेमाची कहाणी गीताच्या ह्रदयाला चटका देऊन गेली........


Rate this content
Log in