अचंबित
अचंबित


आज उठायला उशीर झाला होता.रमेशला डबा द्यायचा होता. रमाने भरभर कामाला सुरुवात केली. भाजी चिरली कणिक मळले आणि चपात्या करायला सुरुवात केली."लवकर डबा कर मला उशीर होतोय" रमेश म्हणाला. "हो करते" असे म्हणत मनातल्या मनात हसत घड्याळ पाहिलं. घड्याळ्यात वार व दिवस होता. पण त्याचं लक्ष नव्हतं. आज लग्नाचा वाढदिवस होता. पाच वर्ष झाले होते. त्याच्या लक्षात नाही हे पाहून राग येत होता. आज मी आठवण करून देणारच नाही बघू किती लक्षात राहते ते असे म्हणत तिने डबा भरला. काही न बोलता डबा हातात दिला. तोही निमूटपणे निघून गेला. तिचा चेहरा रडवेला झाला. घरातले काम हळूहळू करू लागली. मनात मात्र विचारांचे काहूर माजले. आपलं नशीबच फाटकं असं म्हणून पलंगावर आडवी झाली. घड्याळ्याची घंटा वाजली अकरा वाजले होते. रागाने तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. आज आपल्याला बाहेर जेवायला तरी न्यायला हवं होतं
उलट काहीच न बोलता कामावर गेला होता. शुभेच्छा तरी द्यायच्या होत्या. तिला रडू आवरेना. तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. घड्याळात बाराला दहा कमी होते. तिचे डोळे घड्याळाकडे होते. इतक्यात दारावरची बेल वाजली. तिने डोळे पुसले. दार उघडले. रमेश दारात पुष्पगुच्छ जेवण, भेटवस्तू घेऊन उभा होता. तिने त्याला मिठी मारली. "अगं वेडे मी कसा विसरेन लग्नाचा वाढदिवस!" तेवढ्यात घड्याळाचे ठोके पडले घड्याळात बारा वाजले होते. खऱ्या अर्थाने लग्नाचा वाढदिवस आज साजरा झाला होता.