अबोल प्रीत
अबोल प्रीत
'प्रीत' प्रीत असते. ती बहरते, मोहरते, दरवळते. बोलकी प्रीत सर्वांना दिसते अथवा माहीत होते. पण 'आबोल' प्रीत ही अबोल असते. ती ओठातून शब्दाद्वारे कधीच बाहेर प्रगट होत नसते. अबोल प्रीत ही जीवन सुखद, उत्साही, उल्हासी आणि आनंदमय बनवते. अबोल प्रीत बोलत नाही पण ती अंतर्मनाला साद घालते. अबोल प्रीत ही हवेत तरंगते. ती प्रत्येक गोष्टीत सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते. तिच्या दृष्टीने सारे विश्व सुंदर प्रफुल्ल भासते.
अबोल प्रीत व्यक्त होत नसते. ती लाजते, ओशाळते, बावरते, कसं सांगू? काय सांगू? काय म्हणेल? अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी ती ग्रासून जाते. आतल्या आत अंतर्मनात प्रीतिला पुजते, त्या प्रीतिची ओढ, भक्ती, श्रध्दा, चेतना, करुणा, शक्ती, आसक्ती दिवसेन दिवस वाढत असते पण ती अबोल असते. ह्या अबोलपणामुळे ही प्रीत कोणाच्याच लक्षात येत नसते.
कधीकधी समोरच्या व्यक्तीची ही प्रीत अबोल असते. ह्या प्रीती सारखी तिची ही स्थिती असते तेव्हा धमाल उडते. एकमेकांची वाट पाहत असते. "पहले तुम, पहले तुम" अशातच राहतात. अबोल प्रीतीला अपेक्षा असते समोरून आज ना उद्या येतील शब्द ओठांद्वारे. मग मी ही शब्द बोलेन. अशा विचारात ती प्रीत असल्याने मनातल्या मनात त्या प्रीतीची जोपासना करते. ही प्रीत आपल्या वागण्यात, कृतीत बरेच संकेत देत असते किंवा ते आपसूकच होत असतात. तेव्हा लोकांना कळेल म्हणून प्रीत घाबरते.
कधीकधी ही अबोल प्रीत आयुष्यभर अंतर्मनातच बंदिस्त असते. कुणालाच तिचा थांगपत्ता लागत नसतो. त्या अबोल प्रीतीला आतल्या आत गोंजारले जाते. ध्यानी मनी त्या अबोल प्रीतीचा विचार चालूच असतो.
अबोल प्रीत तुझी रे
अबोल प्रीत माझी रे
सांग कसे जुळायचे ?
झुरत झुरत राहायचे.
अबोल मी अबोल तू
अबोल कसे जगायचे?
