आव्हान
आव्हान
कविता नाव तिचं. खूप हुशार. तीन वर्षांची असल्यापासून पुस्तकांचे वेड होतं तिला. वडिलांची विशेष मर्जी होती तिच्यावर. खूप लाडकी होती ती त्यांची. लवकर घातलं तिला शाळेत.अभ्यासात नेहमी अव्वल असायची.सगळया शिक्षकांची आवडती विद्यार्थीनी होती ती. सातवीत असताना एक बारावीत असलेला मुलगा तिच्या मागे लागला. सतत पाठलाग करायचा तिचा. नकोनकोस झालं होत तिला त्याचं सततच चिठ्ठ्या देणं.घरी काही सांगावं तर पंचाईत.हे तिच्या आयुष्यात आलेलं पाहिलं आव्हान. पण नशिबाने साथ दिली आणि तिच्या वडिलांची बदली झाली दुसऱ्या गावाला. तिला वाटलं बर झालं कटकट गेली मागची.नवीन गावात चांगली रुळली ती. दहावी आली.बोर्डात नक्की येणार ती अस साऱ्यांनाच वाटे. तसा तिने अभ्यास पण सुरू केला.पण नियतीने दुसरंच काहीतरी लिहिलं.ह्यावेळी तिचं पडली एका मुलाच्या प्रेमात. वेडी झाली ती. म्हणतात ना प्रेम आंधळं असतं अगदी तसच काहीसं. झालं दहावीचा निकाल लागला.बोर्डात येऊ शकणाऱ्या मुलीला ८२% पडले. ती आणि सगळे नाराज तिच्यावर. अकरावीला सगळ्या तिच्या वर्ग मैत्रीणी पुण्याला शिकायला आल्या.तिने मात्र तिथेच तिची ११वी सुरू केली.या दरम्यान तिचा प्रियकर दुसऱ्या शहरात रहायला गेला.पण दोघांच्या गाठीभेटी चालूच होत्या.आता तिच्या मनाने पक्क ठरवलं की अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं. पण नशिबाने साथ सोडली तिच्या. तिच्या घरी कळलं तिचं प्रेमप्रकरण.कोणीच बोलत नव्हतं घरात तिच्याशी. वातावरण सगळं गढूळ झालं होतं.ह्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर झाला.आणि अर्थातच १२वी ला तिला खूप कमी मार्क्स मिळाले. वडील तिचे खूप नाराज झाले होते.बोलणं सोडून दिलं होतं त्यांनी तिच्याशी.बी.एस.सी. ला ऍडमिशन घेतलं तिने.इच्छा नसताना सुद्धा तिने ते शिक्षण पूर्ण केले.७२% मार्क्स मिळविले. बाबांनी कौतुक केलं तिचं. आता तिने हट्ट केला बाबांकडे एम.एस. सी.करायची.बाबांनी बळेच हो म्हटले.पण तुला पुण्याला आत्याकडे रहावं लागेल. पण कविताला ह्या गोष्टीचा आनंद झाला की आता आपल्या स्वप्नातील राजकुमार आपल्याला रोज भेटणार.एम.एस.सी पूर्ण झाली. फर्स्ट क्लास मिळाला.रोज प्रेमीयुगल भेटच होत एकमेकांना.आता नोकरी शोधायची होती कारण तिला लग्न करायचं होतं.नाहीतर घरातल्या लोकांनी तिचं लग्न लावलं असतं. सहा महिने झाले पण तिला जॉब मिळाला नाही.शेवटी एका लॅबमध्ये तिला आनलिस्टची नोकरी मिळाली आणि दोघांनी लग्न केलं.ती नोकरी दोन वर्षे करून झाली की त
िला दिवस गेले.नोकरी सोडावी लागली तिला. तिला सोडायची नव्हती पण तेही महत्वाचे होते.मग बाळाच्या संगोपनात तिने पुढील अडीच वर्षे घालवली.इतर नोकरी करणाऱ्या बायकांना पाहिलं की तिला ही वाटायचं आपण कधी करणार. शेवटी मुलाला शाळेत घातल्यावर त्याला पाळणाघरात ठेवून तिने अर्धवेळ नोकरी करायला सुरुवात केली. तिथे तिला नीट इंग्लिश बोलता येत नव्हतं.हसत होते सगळे. गॅपमुळे अस झालं होतं.पण हसतील त्याचे दात दिसतील असा विचार करून ती इंग्लिश बोलायला शिकली.रिसेशनमुळे तिला ती नोकरी सोडावी लागली. आता पुढे काय. सगळं संपल्यासारखं वाटलं तिला. नवरा दुसऱ्या शहरात नोकरी करायला गेला. ती आणि मुलगाच. मग तिने बी.एड.करायचे ठरवले. स्वाइन फ्लूचा थेंमान, अभ्यास, मुलाचं संगोपन एकटीचीच तारेवरची कसरत होत होती. सासरच्या लोकांशी पटत नव्हते तिचे. त्यामुळे ते जवळच रहायला असूनदेखील त्यांचा तशी तिला काही मदत होत नव्हती. बी.एड. कसेबसे पूर्ण झाले ७४% मार्क्स मिळाले तिला.नोकरी पण मिळाली तिला.एव्हाना तिचा नवरा तो जॉब सोडून कायमच घरी आला. त्याचा बॉस त्याला खूप त्रास देत होता.तिच्या पैशांवर घर चालत होतं. मग तिने मागे वळून पाहिलंच नाही. प्रिन्सिपॉलच्या पदावर बसली पण इतर लोकांना तिची ही प्रगती बघवली नाही.त्यांनी काड्या करून तिला नोकरी सोडायला भाग पाडलं.एक महिना घरी होती ती तब्बल आठ वर्षानंतर.रडत होती खूप.परत प्रयत्न करून प्रिन्सिपॉल झाली.पण एक वर्षानी तिथून तिची हकालपट्टी करण्यात आली.कारण काय तर पॉलिटिक्स आणि मस्का लावायची तिला नसणारी सवय. सहा महिने परत घरी बसावं लागलं तिला.नवरा खूप समजूतदार होता.पण तिला हा आघात सहन झाला नाही.तणावामुळे तिला उचक्यांचा त्रास सुरू झाला.त्याचे निदान डॉक्टर्सला पण करता आले नाही.सगळ्या टेस्टस करून झाल्यावरही.२००-३०० उचक्या देत होती ती.नवरा आणि मुलगा काळजी घेत होते तिची.अशीच लांब अंतरावर गाडीने मुलाखतीला गेल्यामुळे ती चक्कर येऊन गाडीवरून खाली पडली. कोच पडली तिला.संघर्ष काही संपत नव्हता. डोळा थोडक्यात वाचला तिचा.ती अजूनच खचून गेली.हूशार होती, पण नोकरी मिळत नव्हती. त्या काळात तिने परत लिहायला सुरवात केली. तिचा वेळ जायला लागला.आता परत तिच्या मनाने उभारी घेतली.परत जोमाने लागली ती नवीन नोकरीच्या शोधात.तिला बऱ्याचदा वाटायचं खऱ्याची नाही का ही दुनिया? सगळेच कसे मतलबी.पण हारायच नाही आता लढायचं अस तिने पक्के ठरवलं.आणि परत ती सज्ज झाली.