आठवणीतील खिडकी
आठवणीतील खिडकी


खिडकीभोवताली... गुरफटलय माझं विश्व सारं....आठवणीच्या घटनांची ती साक्षीदार...लहापणापासून खिडकी हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे.
खिडकी....माझ्या आठवणीतील पहिली खिडकी माझ्या शाळेची... वर्गात भिंतीकडेला बसायला जागा होती माझी.मजा वाटायची मला खूप का माहितेय..? खूपच दंगा करायला मिळायचा..अशी मी खूप हुशार होतेच दंगेखोर पण होते.दंगा करावा आणि बाई/गुरुजी खिडकी तून दिसले की गप्प बसायचे. जणू मी काही केलेले नाही. मग जी मुले दंगा करताना सापडायचे त्यांच्या गंमत बघत बसायचे. शेजारच्या वर्गातील मैत्रीण चिंचा, बोरे खिडकीतून द्यायची. बाई फळ्यावर लिहायला वळल्या की चोरून चोरून खायचे. न कचरा कागदाच्या पुडीत बांधायचा.. लई भारी वाटायचं राव...
माझ्या आठवणीतील दुसरी खिडकी? एस टी बसची. कॉलेजमध्ये एसटीने जायची. सकाळी जाताना नोकरदार, विद्यार्थी यांची गर्दी असायची. उभे राहूनच जावे लागायचे पण दुपारी येताना मात्र एसटी पूर्ण रिकामी असायची. मग खिडकी कडेला बसायचं... डबा शिल्लक ठेवलेला असायचा तो खायचा अन् मस्त खिडकीतून डोकावून बघायची.
आता म्हणाल रोजच काय बघत असेल मी... तर त्यालाही कारण आहे... कॉलेजला आम्हाला डोंगराच्या घाटातून जावे लागायचे... त्यामुळे रोजच नवीन वातावरणाचा अनुभव घ्यायला मिळायचा.. तीनही ऋतूत वेगवेगळा अनुभव. वसंत ऋतूत फुललेला निसर्ग, पावसाळ्यात कोसळणारा धबधबा, उन्हाळ्यात खिडकीतून येणारा वारा... मुळातच मी निसर्गप्रेमी असल्याने मला या सगळ्यात नेहमीच अप्रुप वाटायचं.
माझ्या आठवणीतील तिसरी खिडकी माझ्या आजीच्या (आईची आई) घराची. मैत्रिणीकडे गेले, यायला उशीर झाला की आजी खिडकीतूनच हाका मारायची जोराने... शाळेला आजीकडे होते न... लग्न होईपर्यंत... सांगायचं म्हणजे... लग्नासाठी मुलगा बघायला आला की मान वर करू बघायची हिम्मत नाही व्हायची.. मग मुलाकडची मंडळी जायला निघाली की खिडकीतून मुलाला बघायची...
माझ्या आठवणीतील चौथी खिडकी माझ्या सासरची. नवीन लग्न झाले... काही दिवस करमायचं नाही.. मग खिडकीत पुस्तके वाचत बसायचे... नवरोजीना यायला उशीर झाला की... खिडकीपाशी उभे राहून वाट बघायचे.. आता आठवलं की हसू येते
माझ्या आठवणीतील पाचवी खिडकी... माझी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट...जिथे माझे स्वप्न पूर्ण झाले. शिक्षिका व्हायचं स्वप्न... शाळेची शिक्षिका नाही होता आले. परिस्थितीमुळे...पण सासरच्या लोकांनी पाठिंबा दिला त्यामुळे कॉम्प्युटरची शिक्षिका झाले... मी जिथे बसायचे तिथेही खिडकी होती... पहिल्या मजल्यावर क्लास होता आमचा... रिकाम्या वेळी खिडकीतून बाहेर पाहिले की शाळेची मुलं, शेतावर जाणारी लोकं, गुरंढोरं बघायला मिळायची...
आणि सगळ्यात महत्त्वाचे... खिडकीवर छानसा मोगऱ्याचा वेल चढवलेला होता... इतका सुंदर होता... मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे दरवळत राहायचा... खूप खूप प्रसन्न वाटायचं... त्या खिडकीपाशी बसूनच आम्ही... स्टाफ मेंबर्स आणि स्टुडंट मिळून एकत्रितपणे डबा खायचो... जेवताना एखाद्या कथा किंवा कादंबरीवरून चर्चा व्हायची... कधी लाईट नसेल तेव्हा अंताक्षरी रंगायच्या... आणि या सगळ्याची साक्षीदार होती खिडकी... खूपच आठवण येते क्लासची...
आजही मी या सगळ्या आठवणींमध्ये रमते... ते देखील माझ्या घरातील खिडकीमध्ये बसूनच...