आठवण रेझर ब्लेडची
आठवण रेझर ब्लेडची
हा फोटो व्हाट्सअपवर पाहिला आणि त्या एका रेझर ब्लेडची आठवण जागी झाली. त्यावेळी मी शालेय शिक्षण घेत होतो. वडील कामानिमित्त बाहेरगावी... प्रसंगाने मोटरसायकलवरून परगावी जायचे आणि प्रवासात वेगवेगळे अनुभव यायचे. त्यातलाच त्यांना आलेला एक अनुभव!
माझे बाबा मसराई पांढरे शुभ्र धोतर, ओपन पूर्ण बाहीचा शर्ट, कोट, काळी टोपी, विशिष्ट प्रकारचे चामडी चप्पल पेहराव म्हणून वापरायचे. हाती केमिचे घड्याळ आणि रांध्याच्या काडीचा जाडसर फ्रेमचा चष्मा असायचा.
ही गोष्ट कदाचित १९७४ -७५ सालातील असावी. त्यांना कोल्हापूरला जायचे होते म्हणून मोटरसायकलने जायचे ठरवून त्यांनी प्रवास सुरु केला. सोबत प्रवासाचे साहित्य घेतले आणि प्रवास सुरु झाला. पूर्वी इतके रस्ते व सोयी नव्हत्या. डांबरी रस्ता नशिबानेच पहायला मिळायचा. असलाच तर उपकार केल्यासारखा वाटायचा. त्या रस्त्यात खड्डे जास्त आणि सपाट भाग क्वचितच दिसायचा. उन्हाळ्यात खड्डे चुकवत गाडी धावायची, पण पावसाळ्यात खड्डा चुकवणे कसब वाटायचे, पाण्याच्या खोलीचा अंदाज यायचा नाही. पावसाळ्यात सगळेच तोल सावरत गांडूळ चालीने सर्कस करीत गाडी मारायचे. सगळेच जवळजवळ चिखलाने माखलेले असायचे.
जसा प्रवास सुरु झाला आणि गाडीने थोडा वेग घेतला आणि संकेश्वर सोडल्यावर स्तवनिधी (तवंदी घाट) घाट जवळ येऊ लागला आणि एक गाडी
थोडा जादा वेग पकडून जवळून पुढे गेली. काय होते हे समजण्याच्या आतच गाडीवरील मागच्या सीटवर बसलेली बाई तिरपाटून पडली आणि सारी साडीच मागच्या चाकाला गुंडाळली.
पावसाळा आणि खराब रस्ते आणि त्यात हा गोंधळ. गाड्या थांबल्या. बाबांनी बाईना सुखरूप बाजूस उभे रहाण्यास सांगितले, पिशवीतील धोतर नेसण्यास दिले. चष्म्याच्या केस मधून ब्लेड बाहेर काढले आणि अडकलेली सर्व साडी मागच्या चाकातून हळूहळू कापून बाहेर काढली आणि चाक, चेन मोकळी केली. पूर्वी भारत, सेव्हन ओ क्लॉक, टोपाझ आणि इतरही कंपन्यांचे दाढीचे रेझर ब्लेड मिळायचे. आताही मिळतात पण दर्शन कमी झाले इतकेच.
पूर्वीच्या लोकांना प्रवासात काही काही गोष्टी सोबत ठेवायची सवय असायची त्यातलीच ही सवय बाबांना होती. त्या सवयीचा असा उपयोग झाला.
आज फोटो पाहिल्यावर आठवण झाली म्हणून लिहावे वाटले. काळ बदलला, रस्ते चांगले झाले, सुविधा चांगल्या झाल्या, मोबाईल आले पण काहीकाही सवयी पण केव्हाकेव्हा धांदरटपणाचा कळस गाठतात आणि नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कितीही सुधारणा झाल्या तरी प्रत्येकाने जीवन अमूल्य आहे याची जाण सदैव मनात ठेऊन सावधानता बाळगून आनंदात जीवन जगावे हीच आंतरिक तळमळ वाटते म्हणून हा छोटासा शब्दप्रपंच...!
प्रवास करताना योग्य ती काळजी घेणे ही आजच्या काळाची गरज आहे यात तीळमात्रही शंका नाही.