आठवण पदार्थाची
आठवण पदार्थाची
कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गोव्यात तुळशीचे लग्न असते. रात्री भटजी येऊन मंगलाष्टके वगैरे म्हणून तुळशीचे लग्न लावले जाते. लग्नात एक देवकार्याचा विधी असतो. तसा तुळशीच्या लग्नात ही केला जातो. दुपारी गोडाचा स्वयंपाक असतो. गोड खीर, पुऱ्या वगैरे. पण त्या दिवशी एक खास पदार्थ असतो तो म्हणजे मुगा गाठी.
मुगा गाठी म्हणजे, अख्या मुगाची रस्सा भाजी. आधी मूग भिजवून त्यांना कोंब काढतात. नंतर त्याची सगळी हिरवी सालं काढतात. खोबरेल तेलात मोहरी, हिंग व कढीपत्त्याची फोडणी देवून त्यात ते मूग घालून शिजवतात. त्यात मग ओले खोबरं, चिंच, तिखट, हळद याचं वाटण घालतात. वरुन खोबऱ्याचे लहान तुकडे घालतात. मीठ व चवी पुरता गूळ घातला की झाली मुगा गाठी तयार. आज काल त्याच्यात काजू ही घालतात पण मला मात्र तीच चुलीवर शिजवलेली, पाट्यावर मासाल वाटलेली आणि माझ्या आईच्या हातची मुगा गाठीच खूप आवडायची. वाह! आता सुध्दा तोंडाला पाणी सुटले.
मी तेव्हा खूपच लहान होते. आमच्याकडे एक छोटी परात ह
ोती. मी त्या परातीला ताट म्हणायचे. भाजी शिजताना ऐवढा घमघमाट सुटायचा की भूक जास्तच चाळवायची. मी आईला सांगायचे 'आज ना मला मुगा गाठी ताट भरून दे". "हो, देईन हं" असे आई ही म्हणायची व मला त्या परतीत ती पातळ भाजी एक मोठा डाव भरून द्यायची. त्या भाजीला पुरी लावून मी खायचे. खूप मस्त लागयची. अशी भाजी श्रावण महिन्यात व गणेश चतुर्थीला ही व्हायची, पण मला आवडणारी म्हणजे तुळशीच्या लग्नाच्या देवकार्याची.
ह्या माझ्या आवडीचा प्रसार एवढा झाला की घरातले सगळे मला चिडवायचे. माझ्या घरातली आणि वाड्यातली माणसं पण मला चिडवायची. "ये गं, जेवायला. आज मुगा गाठी केलीय. परात घेऊन ये" असा म्हणायचे. मला लाज वाटत होती. भाजी आवडायची, पण परातीत घालून खायची म्हणजे जरा अतीच होते. माझे लग्न झालं तरी भाऊ बहीण मला 'परातभर मुगा गाठी द्या रे तिला' म्हणून चिडवायचे.
लहानपणी ती भाजी खरंच खूप आवडायची. आता ही आवडते पण त्याची चव, स्वाद तो तेव्हाचाच आठवतो, तो ही माझ्या आईच्या हातचा. अगदी अप्रतिम!