sunil sawant

Others

4.3  

sunil sawant

Others

आँसूभरी दास्तान

आँसूभरी दास्तान

3 mins
294


. . .ये आँसू मेरे दिल की जुबान है. . .मोहम्मद रफी आपल्या आर्त स्वरात गात होता. गाणं संपल आणि शब्दांचा अर्थ पहायला लागलो, पण त्यातला आँसु हा शब्द कुठंतरी टोचत होता. असं म्हणतात आपल्या खर्‍या भावभावना पहिल्यांदा डोळयांत उमटतात. त्यांचं स्वरुप तीव्र झालं की अश्रू, आसवं बनून वाहू लागतात. माणसाचे अश्रू, दु:खातही ओघळतात आणि आनंदातही बरसतात. काहींना अश्रुपात हे दुर्बलतेचे लक्षण वाटते तर काहींना हळव्या, भावनाशील स्वभावाचे. हमखास डोळयांत अश्रू यावेत असं काहींना वरदान असतं. माझ्या लहाणपणी अशा कितीतरी लोकांना मी पाहिलेय, साधा निरोप घेताना त्यांचे डोळे ओलावत. मग ते पुसतपुसतच निरोपाचं बोलणं होई.


कै. दादा कोंडके यांनी त्यांच्या आत्मचरित्रवजा पुस्तकात त्यांचे गुरू कै. भालजी पेंढारकरांबाबत लिहिलेय. एक ट्रॅजिक सीन करून दाखवताना भालजींनी फक्त संवाद ऐकून तो सीन करताना सलग २५/३० वेळा डोळयांतून अश्रू काढले होते. याउलट माझ्या मित्राच्याबाबत अशी घटना घडलीय. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा दु:खद प्रसंग घडला आणि तसं असूनदेखील त्याला रडू फुटलं नाही. तेव्हां तो आठवीत होता आणि त्याच्या आईचं दोन वर्षाच्या दिर्घ आजारानंतर निधन झालं होतं. त्याचे भाऊ, नातेवाईक, शेजारीपाजारीही रडत होते पण प्रयत्न करूनही त्याच्या डोळयांत अश्रू येत नव्हते आणि शेवटपर्यंत आले नव्हते. त्याने कितीतरी वर्षांनंतर एका संध्याकाळी आम्हा मित्रांना ही गोष्ट सांगितली आणि ती सांगताना तो इतका रडला होता की आमच्याही डोळयांत आसंव आली. त्यावेळेला आपल्याला का रडू आलं नाही हे त्याला उमगलं नाही. त्याची आई हे त्याचं सर्वस्व होतं, आजूबाजूची सर्व माणसं तीच्यासाठी रडत असताना तो रडला नाहीये हे दु:ख त्याला मरेपर्यंत छळणार आहे.


काहीकाही वेळा वाटतं, आनंदापेक्षा दु:खातच अश्रू जास्त मोकळे होतात. सुप्रसिद्ध गीतकार साहिर लिहून गेलाय....

अश्कों में जो पाया है, वो गीतों में दिया है,

फिर भी ये सुना है, कि जमाने को गिला है।

अश्रूंनी भरलेलं आयुष्य मिळालेल्या साहिरने तेच दु:ख आपल्या शायरीतून मांडलं आणि काही लोकांना ते स्वताचंच वाटलं तर काही जणांना ती शायरी बिल्कूल आवडली नाही. ते दु:खही त्या रसिकांसाठी त्याने शायरीतूनच व्यक्त केलं. शायरीत अश्रु या शब्दाचा समर्पक उपयोग साहिरच करू जाणे.


माझ्या लहानपणी शेजारच्या एक मामी होत्या. एकदम दिलखुलास स्वभावाच्या. पण कुठुनही 'गंगा जमुना डोळयांत उभ्या का? जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा..' हे गाणं ऐकू आलं की त्यांच्या डोळयांत आसवं जमा व्हायची. तसं पाहिलं तर त्यांना दोन्हीं मुलगेच होते. शेजारपाजारच्यांना नवल वाटायचं, तर काहींना हसूही यायचं. कोणीतरी त्यांना असं का होतं असं विचारलंही होतं. पण त्यांना नाही सांगता आलं होतं त्याचं कारण.


आमच्या शेजारी एक आजोबा रहातात. ऐंशी पार करूनसुद्धा फिट आहेत. भलामोठा प्रेमळ परिवार आहे त्यांचा. तरीही दुसर्‍यांची काम स्वतःहून मागून आवडीने करत असतात. मी कधीतरी विचारलं, 'या वयात कशाला एवढी धावपळ करता इतरांच्या कामासाठी?' तेव्हा आकाशाकडे बोट दाखवून म्हणाले, 'अरे आज ना उद्या जावं लागेल, तेव्हा हीच लोकं माझ्यासाठी दोन अश्रू काढतील. तेव्हा भरून पावेल सगळं.' मी निरुत्तर झालो. माझ्या त्या मित्राचं आमच्यासमोर रडणं मला आठवलं, त्याचं दु:ख माझ्यासाठी अजून गडद झालं.


याच आसवांतून मिळालेली तृप्ती, आनंद कवियत्री इंदिरा संत यांनी आपल्या कवितेतून यथार्थपणे वर्णन केलाय,

अजून नाही जागी राधा

अजून नाही जागे गोकुळ

अशा अवेळी पैलतीरावर,

आज घुमे का पावा मंजुळ?

मावळतीवर चंद्र केशरी

पहाटवारा भवती भणभण,

अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती

तिथेच टाकून अपुले तनमन

विश्वच अवघे ओठा लावून,

कुब्जा प्याली तो मुरलीरव

डोळ्यांमधले थेंब सुखाचे,

हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव...


Rate this content
Log in