आनंद सापडला....
आनंद सापडला....
हा आनंद ना कधीही हरवतो हो. त्याला हरवायची फार सवय आहे.
एकदा का चेहऱ्यावरून, मनातून हरवला तर लवकर सापडत नाही.
आनंदाला न खरेच दोरीने बांधून ठेवावे का? पण बांधले तरी हरवणारच.तो स्वच्छंदी आणि कोणाच्या ओझ्याखाली राहत नाही. तो आपल्या मनाचा राजा आहे.
माझ्याच मनाच्या आनंदाला समजावले बाबा असा रुसून जावू नकोस. तू नसलास की सर्वजण बिथरतात. चिडचिड करतात. एकमेकांना नुसते बोलतात. वाद वाढत जातात.
तू आमच्या जवळून अजिबात हालू नको. तुला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. बाबा लवकर परत येते. तुझी आम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत आहोत.
अरे सापडला चोर.... कुठे कुठे म्हणून काय विचारता!!
पाऊस पडतोय सध्या मस्त फिरायला गेले होतो तिथे आनंद विहारच होता.त्याला घेऊन आले. त्याच्या बरोबरच खूप हसले, फिरले आनंदी झाले. निसर्गाशी गप्पा देखील मारल्या.
जुनी पुस्तके शोधली. त्यात माझं मोरपीस सापडले. गुलाब फूल सापडले. माझ्या त्या जुन्या आठवणीत मला आनंद सापडला. मन पिसारा फुलवून नाचू लागले.
समुद्रावर कुटुंबासहीत गेले. तेथे हा फिरत होता. त्याला बोलले "लबाडा तुला मी शोधत आले. तू इथे लपून बसलाय हो "
मूड जरा बरा नव्हता.जुनी गाणी ऐकत बसले.तर तिथे हे महाराज सापडले. मूड फ्रेश झाला.
मैत्रीच्या मेळाव्यात तो नाचत होता. तिथून त्याला पकडले आणि आणले.
अशी आनंद सापडतो ती ठिकाणे खूप आहेत. आपण त्याचा शोध घेणे महत्वाचे आहे.
आपला आनंद आपल्यातच हरवलेला असतो. त्याला शोधण्यासाठी फक्त जरा मागे वळून पहावे.गत स्मृतीत जरा फिरून यावे.
ट्रीपला जावे, पावसात भिजावे. मस्त गरम भजी खावीत. जुन्या किंवा आपल्या आवडीच्या गाण्यात एकरूप व्हावे. हिंदोळ्यावर बसून मनसोक्त झुलावे. मित्रपरिवारात रमावे. बघा हरवलेला आनंद निश्चिचित आपल्याला सापडेल. अशा कृती कराव्यात की लहान मुलंच आहोत. मग आपल्याला निखळ आनंद लगेचच सापडतो. आपण खूप मोठे झालो हा विचारच नको करायला. हो ना!!
आपण सर्वांबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात रमावे.काहीतरी मस्त लेखन करावे. लिहिलेले पुन्हा पुन्हा वाचावे.त्या क्षणाचा परत आनंद घ्यावा.. इतके सोपे आहे.
मान्य आहे काही गोष्टी आपल्या जीवनात अशा घडतात की आपल्याला आनंद आपल्या जीवनातला हरवलाय असेच वाटते. परंतु आपले जीवन आहे, जीवन देवाने एकदाच दिले आहे या दिलेल्या जीवनाचा आपण पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे आणि आनंदात जगायचे. मस्त जीवन आनंद घेत...
आनंद या जीवनाचा
सुगंधापरी पसरावा
पाव्यातला मृतगंध जैसा
ओठातुनी पाघळावा.....
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा - पुणे*
*मो. नं. 9823582116*
