STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Others

3  

Vaishnavi Kulkarni

Others

आंबट गोड नाते

आंबट गोड नाते

5 mins
455

अहोsss, अहो कुठे आहात ? गेले कुठे हे ? अहो.....अय्या , तुम्ही आणि चक्क किचन मध्ये ? इतक्या सकाळी सकाळी ?"

" राणी सरकार , आपल्या दोघांसाठी फक्कड असे कशाय पेय , अर्थात चहा बनवत होतो , हा बघा , झाला देखील तयार."

"अगं बाई , आज सूर्य पश्चिमेकडून उगवला की काय ? चक्क आपण स्वयंपाकघरात प्रवेश केलात..."

"राणी साहेब , दिनकरराव त्यांच्या रोजच्या प्रघाताप्रमाणे पूर्वेकडूनच आसमंतात आले आहेत , पण मी विचार केला की आपल्या राणी सरकारांना आज जरा रोजच्या कामांच्या दगदगीतून उसंत द्यावी अन् आयता चहा स्वतःच्या हाताने पाजावा म्हणून एवढा सगळा प्रपंच. चला , आपण आता आपल्या आवडत्या सज्जात बसून अमृततुल्य अशा चहाचा आवड घेऊया"

" होय महाराज , चला"


तर रजनीताई आणि सुमंतरावांमध्ये घडत असलेला हा सुखसंवाद. सुमंतराव हे वर्षभरापूर्वीच निवृत्त झालेले तर रजनीताई ह्या गृहिणी. खरं तर एम.ए मराठी शिकलेल्या रजनीताईंना शाळेमध्ये शिक्षिका किंवा कॉलेजमध्ये मराठीची प्रोफेसर होण्याची खूप इच्छा होती. परंतु पूर्वीच्या काळी असलेले खटल्याचे कुटुंब , त्यात भरीस भर म्हणजे कडक स्वभावाचे सासू सासरे यामुळे रजनीताईंची इच्छा मनातच राहिली.

   सुमंतरावांसोबत लग्न झाल्यानंतर त्या आपल्या सासरी दुधात साखर विरघळावी तशा विरघळून गेल्या. सलील आणि सुजाता ही दोन अतिशय हुशार मुलं देवाने त्यांच्या पदरात घातली होती. सलील इंदौरला स्थायिक झाला होता तर सुजाता लग्न करून लंडनला गेली होती. आता एकमेकांसाठी उरले होते ते सुमंतराव आणि रजनीताई.

रजनीताई : व्वा ! काय अप्रतिम झाला आहे हो चहा ! मला कल्पना नव्हती की तुम्ही इतका सुंदर चहा बनवाल ते !

सुमंतराव : माणसाने एखादी गोष्ट शिकून घेतली ना की सवयीने ती आपोआप चांगली जमायला लागते.

रजनीताई : जसं माणूस आपल्या आसपासच्या बदलत्या वातावरणाला स्वीकारण्यास शिकतो तसाच...


सुमंतराव : खरंच ! रजनी , काळ किती भराभर पुढे सरकतो नाही ! असं वाटतं , नुकतेच तर आपण भेटलो आहोत , इतक्यातच तर आपण आपल्या संसाराला सुरुवात केली आहे आणि तेवढ्यात आपण म्हातारे देखील झालो ? आता आपल्या मुलांचे संसार सुरू झाले आहेत , आपल्याला आता मुलगा - सून , दादा - वहिनीची नाही तर आजी आजोबांची बिरुदं चिकटली आहेत. खरंच , तुझ्यासोबत सुरू केलेला हा सहजीवनाचा प्रवास जास्त खेळत , कधी ठेचकाळत , कधी रेंगाळत तर कधी वाऱ्याच्या वेगाने कसा पार पडला ते मला कळलंच नाही गं...

रजनीताई : आपल्याला समजून घेणारं , आपले अश्रू पुसून आपल्या ओठांवर चमचमतं हास्य फुलवणारं आपल्या हक्काचं माणूस आपल्या सोबत सदैव असलं ना की प्रवासाचा शिण जाणवत नाही. मग तो प्रवास आयुष्याचा का असेना , तो सुखकर होतोच.आता हेच पहा ना ! या घरात तुमची स्वामिनी बनून आले तेव्हा आपले आई आप्पा किती करड्या स्वभावाचे होते , त्यांच्यासोबत साधं बोलताना सुद्धा माझी किती भंबेरी उडायची मग अघळपघळ गप्पा मारणे तर दूरच...मला वाटलं होतं , त्यांच्या स्वभावातला करडेपणा , कडकपणा तुमच्यात देखील उतरला असेल , पण तुम्ही मात्र अतिशय शांत आणि हसतमुख स्वभावाचे निघालात. मला खूप छान समजून घेतलं हो तुम्ही....


सुमंतराव - अगं , आपली आजी होती ना , तिने मला कानमंत्र दिला होता की सुम्या, ती पोर तिच्या आई वडिलांचं अंगण सोडून आपल्या घरात येणार आहे आयुष्यभरासाठी. तिला या घरात रुळण्यासाठी , फुलण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.तेव्हा तिच्या पाठीशी खंबीरपणे तुलाच उभं राहायचं आहे. प्रत्येक सासू ही आजी झाली ना की थोडी मवाळ होतेच.

रजनीताई - पण खरं सांगू ? आपले आई आप्पा मात्र शेवटपर्यंत अगदी नातवंडं मोठी होईपर्यंत ' मी म्हणेल तीच पूर्व , माझंच खरं ' याच तत्वाने जगले अन् त्यामुळेच......


सुमंतराव : त्यामुळेच तुझ्या नशिबी सासुरवास आला.....माझ्या नोकरीमुळे मी तुला हवा तसा वेळ देऊ शकलो नाही आणि तुझी थोडी चिडचिड होऊ लागली होती. नाही म्हणायला आपल्यात देखील लुटूपुटूची धुसफूस , रुसवेफुगवे झाले होतेच की

रजनी ताई : अहो, संसाराच्या नावेत बसलं की ह्या धुसफुसीच्या , रुसव्या फुगव्यांच्या लाटा तिला धडकणारच. परंतु ह्या नावेचं नियंत्रण आपल्या हातात होतं म्हणून आपण पेल्यातलं वादळ पेल्यातच शमवलं. मला एकच गोष्टीचं समाधान होतं की माझा नवरा ज्याच्या विश्वासावर मी या घरात पाऊल ठेवलं होतं तो माझ्या विश्वासाला कधीही तुटू देणार नाही आणि झालंही तसंच. आपल्या मुलांचे जन्म झाल्यानंतर तुम्ही माझ्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलात त्यामुळे आई आप्पांची वागणूक थोडी तरी बदलू लागली होती.


सुमंतराव : हो आणि त्याचमुळे पण थोडे तरी सुखाचे तर कधी निवांत असे क्षण अनुभवू शकलो , एकमेकांसोबत वेळ घालवू शकलो , काही गोड आठवणींचे प्याले पुन्हा रीचवू शकलो.


रजनी ताई : आधी आप्पा गेले अन् सहाच महिन्यांत आई गेल्या तेव्हा अगदी लहान मुलासारखे ओक्साबोक्षी रडला होतात तुम्ही. कसेही असले तरी आईवडिलांच्या मृत्यूचं , त्यांच्या विरहाचं दुःख हे इतर कुठल्याही दुःखापेक्षा मोठंच असतं.


सुमंतराव : आणि त्यावेळी तू माझी आई झाली होती , मला अगदी अलवार सांभाळलंस तू....आई गेल्यानंतर तिच्या आठवणींनी मला जेव्हा जेव्हा गहिवरून यायचं तेव्हा तेव्हा तू माझे अश्रू पुसत होतीस , मला तुझ्या पंखांखाली घेत होतीस.

रजनीताई : पर्वताचा एक कडा ढासळत असेल तर दुसऱ्या कड्याने त्याला सावरून, तोलून धरायला हवं. सगळेच कडे जर एकच वेळेस कोसळू लागले तर भूकंप होतो आणि आम्ही स्त्रिया ना जात्याच जरा सहिष्णू आणि सहनशील असतो. स्त्री ही क्षणाची पत्नी अन् अनंत जन्मांची माता असते ते काही उगीच नाही म्हणत.

सुमंतराव : हो ना ! सुरुवातीला आंबट , गोड , तिखट , खारट अशा निरनिराळ्या चविंनी बांधलं गेलेलं आपलं हे नातं मुरलेल्या लोणच्यात कधी रूपांतरित झालं हे कळलंच नाही. अनेक उन्हाळे पावसाळे आपण एकत्र पाहिले , सोसले पण एकमेकांची भक्कम साथ होती अन् सावरणारे हात होते म्हणून आपण कधीही कमकुवत नाही झालो.

रजनीताई : होय हो ! खूप आनंदात , कधी दुःखाच्या सरी झेलत , कधी वेदनांचा गहिवर आवरत , कधी हुंकार भरत निगुतीने संसार झाला आपला. सलील आणि सुजाता सुध्दा त्यांच्या संसारात सुखी आहेत. आता माझी एकच इच्छा राहिली आहे....

सुमंतराव : बोला राणी सरकार , काय इच्छा आहे आपल्या मनात ?


रजनीताई : मला ना , भारत भ्रमण करायची इच्छा आहे. भारतातल्या सगळ्या शांत निवांत अशा जागा , जिथे बसून आपण तिथल्या निसर्गाचा भरभरून आनंद ओंजळीत घेऊ शकतो , फुलापानांचा सुगंध आपल्या प्रत्येक श्वासात भरून घेऊ शकतो अशा ठिकाणी मला तुमच्या सोबतीने फिरण्याची इच्छा आहे.

सुमंतराव : एवढंच ना , त्यात काय ? आपण आज एक काम करू. मस्त नाटकाला जाऊ , बाहेरच जेवण करू आणि येताना ट्रॅव्हल एजंसी मध्ये जावून तुला आवडेल त्या ठिकाणाचं बुकिंग लगेच करून टाकू.

रजनीताई : अहो , बाहेर जेवण कशाला ?


सुमंतराव : इतकी वर्ष कर्तृत्व सिद्धीचं , कमाईचं समाधान देणाऱ्या लोकांच्या इच्छा पूर्ण करता करता जी आयुष्याचं समाधान देते आहे तिच्या इच्छांकडे हवं तसं लक्ष देऊ शकलो नाही पण आता मात्र हळुहळू सगळी भरपाई करणार आहे मी. हा सेवक आता तुमच्या सेवेत हजर आहे.

रजनीताई : इश्श्य !....



Rate this content
Log in