आजचा ग्रामीण भारत
आजचा ग्रामीण भारत
ग्रामीण भारत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर घुंगराची बैलगाडी, हिरवेगार शेतीवाडी, आणि रहाट गाडग्याचे पाणी आणि शेतावर काम करणारी गावातील ग्रामीण मंडळी असे सिनेमात पाहिलेली दृश्ये आपल्या डोळ्यासमोर येतात पण, तो साठ-सत्तर वर्षांपूर्वीचा ग्रामीण भारत आहे. आताचा ग्रामीण भारत असा राहिलेला नाही. स्थित्यंतर हा जगाचा नियम आहे व तो ग्रामीण भारताला देखील लागू होतो. त्यावेळी गांधीजींनी खेड्याकडे चला अशी घोषणा दिली होती त्याचा अर्थ शहरातील शिकलेल्या बांधवांनी उदाहरणार्थ डॉक्टर शिक्षक वकील यांनी गाव पातळीवर जाऊन सेवा द्यावी आणि गावच्या जनतेला शहाणे करावे आपला देश 70 टक्के शेतीवर अवलंबून असणारा विकसनशील देश होता त्यामुळे सारी अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून होती.
हळूहळू ग्रामीण भारत बदलला त्या बदलत्या संघर्षाचे चित्रण नया दौर, तर मराठीमध्ये नटरंग या सिनेमादेखील दाखवले गेले आहे आता मोठ्या खेड्यांच शहरात रूपांतर झालंय. तर छोट्या खेडेगावांच विकसित गाव म्हणून रूपांतर झालय . शेतीचा व्यवसाय कोणालाच करायचा नाही ,लोकांचे लोंढेच्या लोंढे रोजगारासाठी शहराकडे धावत आहेत. शहरे बकाल झाली तर, खेडी भकास झालीत. शेतीच्या क्षेत्रातील जमीन हळूहळू कमी होतेय. कायद्यातील पळवाटा शोधून ती जमीन पडीक दाखवायची ,आणि मग तिथे प्लॉट पाडून घरासाठी विकायचे. एखाद्या गावावरून हमरस्ता गेला की हळूहळू आजुबाजुच्या शेतीचे प्लॉट पाडून घरांसाठी विकायचे त्या जमिनीवर घरे बांधली जातात व गावाचे काँक्रिटीकरण होते.
"जिवाचे रान करणे"अशी म्हण आपल्याकडे आहे.रान म्हणजे पिकलेले फुललेले शेत, व ते फुलवण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात, त्यात जीव ओतावा लागतो. आता असा जीव कोणाला ओतायचा नसतो. गावे सुधारली, गावांमध्ये वीज पाणी सारख्या सुविधा पोहोचल्या पण गावातील माणसांना त्याची किंमत नाही गावातील पाणी वीज ते जपून वापरत नाहीत. रासायनिक खतांच्या अति माऱ्याने जमीन नापीक झालेली आहे त्यातून पावसाचा लहरीपणावर शेती अवलंबून आहे.
पूर्वीच्या बारा बलुतेदार पद्धतीमुळे गाव गाडा एकमेकावर अवलंबून होता त्यामुळे सलग बारा वर्षे दुष्काळ पडला तरी, शेतकरी आत्महत्या करीत नव्हता. आता ग्रामीण भागातील चित्र असे आहे की, रिकामटेकडी मंडळी गावाच्या पारावर, एसटी स्टँडवर, रिकामटेकड्या गप्पा व बेंबीच्या देठापासून राजकारणावर चर्चा त्यात गावातील छुपे राजकारण, धार्मिक उत्सवात वर्गणीसाठी दादागिरी, हातभट्ट्या दारू, व्यसन यातच गुरफटलेला आहे. म्हातारा बाप शेतावर राबत असतो आणि पोरगा भट्टीचे कपडे घालून कोणाचा तरी कार्यकर्ता होऊन फिरत असतो. बायको घरकामदेखील बघते व शेतावरदेखील राबते.
तरुण पिढीच्या अशा वर्तनाने देशाची उत्पादनक्षमता कमी झालेली आहे. उरलीसुरली मंडळी मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेलेली आहेत. जर ग्रामीण भारताचे चित्र बदलायचे असेल तर शहराकडे येणारे लोंढे थांबविले पाहिजेत. खेड्यातील तरुणाला गावाकडेच शेती व जोडधंदा यासाठी अनुदान, कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. पण शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय आमच्यातच राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लावलेली आहे. ती बंद केली पाहिजे. फुकट घेण्याची वृत्ती फोफावली आहे.
गावातील पतपेढ्या, बँका, साखर कारखाने स्थानिक राजकारण्यांनी बळकावलेले आहेत. त्याचा फायदा ते व त्यांचे नातेवाईक घेतात तिथे सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. साऱ्या गोष्टी सोई-सुविधा अनुदाने खरोखरी तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. नुसते कागदोपत्री नकोत यासाठी ऑनलाईन हा पर्याय उत्तम आहे.
तरच ग्रामीण भारताचे चित्र आशादायक होईल व जगभर चालणाऱ्या आर्थिक मंदीच्या लाटेत आपली नैय्या बुडणार नाही.