आईचे मंगळसूत्र
आईचे मंगळसूत्र
बालपणीचा काळ सुखाचा
बालपण देगा देवा,
असे कवी म्हणतात,
पण हा काळ ज्या बालकाने उपभोगलाच नाही त्याचे काय?
अशीच एक मी. माझी बालपणीची आठवण म्हणजे केवळ माझ्या आईचे मंगळसूत्र.
मंगळसूत्र म्हणजे काय ? तर चार सोन्याचे मणी अनं दोन सोन्याचा वाट्या काळया मण्यात ओवलेल्या. माझी आई म्हणजे माझ्यासाठी एक ? चिन्ह तिच्या बाबतचे अनेक प्रश्न माझे अनुत्तरीतच राहिले. माझी आई म्हणजे एक सौंदर्याची मूर्ती गोरीपान ठेंगण्या बांध्याची मानेवर काळ्याशार केसांचा भरगच्च अंबाडा आणि गोऱ्यापान गळयात गळ्याला भिडून छोटसं मंगळसूत्र सगळ्यांच्या नजरेत भरणारे.
मी सगळ्यात लहान त्यामुळे जातायेता तिच्या मांडीवर बसणे हा माझा उद्योग मांडीवर बसले की नेहमी माझा हात तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर असे. कधी कधी ती चिडून म्हणायची देखील काय हे! सतत मंगळसूत्राशी खेळत असते मी उठून उड्या मारत हसत निघून जाई.
अचानक का कुणास ठाऊक त्या सुंदरशा मंगळसूत्राला
कुणाची नजर लागली ( आता वाटते माझी तर नसेल न ?) छत्र हरवले बाबा गेले.
बाबांचे सोपस्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आंघोळ घालणे, हार घालणे, नमस्कार वैगेरे वैगेरे.... आणि शेवटी आईचा आक्रोश! हे मी सर्व समोरच्या काकूंच्या गच्चीवरून पाहत होते मला काहीच कळेना मी केवळ घाबरून काकुला घट्ट धरून
बघत होते. माझ्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते.
सगळे आटोपल्यावर काकूंनी मला घरी सोडले. आईने मला मांडीवर घेतले माझ्या हात सवयी प्रमाणे गळ्यावर गेला बघते तर काय! आईच्या गळ्यात मंगळसूत्रच नव्हते. मला काहीच कळेना सगळं आटोपल्यावर मला व आईला मोठ्या काकांकडे पाठविण्यात आले.
काकांकडे आल्यावर आईचा दिनक्रम सुरू झाला सकाळी लवकर उठणे , विहिरीचे पाणी काढणे, जनावरांना चारापाणी शेणाचा भरपूर सडासावरण माझ्याकडे बघायला तिला आजिबात वेळच नसे. मी मात्र सतत तिच्या आजूबाजूला मिरवत असे.
असे म्हणतात प्रत्येक गोष्टीला काळ औषध असते. कालांतराने सगळे व्यवस्थित झाले. मंगळसूत्राची संकल्पना देखील मला कळली कोणी घालावे कोणी घालू नये.माझे लग्नसुद्धा झाले लग्न झाल्यावर मी आईसारखेच दुसरे मंगळसूत्र करवून घेतले पण..... पण हे काय? घालण्याची हिंमत मात्र माझी होईचना!कारण त्या मंगळसूत्रात माझी सुंदर आई मला दिसायची.
आता आईपण गेली. ते मंगळसूत्र माझ्याजवळ तसेच आहे.अजूनही ते हातात घेतले की माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईचा मंगळसूत्र घातलेला चेहरा तरळतो. जणू ती म्हणते अग ! मी तुझ्याचं जवळ आहे की! या मंगळसूत्राच्या रूपान. अनं लगेच मनात येतं.
काय सांगू आई तुझ्या
किती कशा त्या आठवणी
चेहरा तुझा समोर दिसता
डोळा माझ्या येई पाणी